आपण लवकर निर्णय घेत नाही, असा तक्रारींचा सूर लावला जात असला तरी जनतेच्या हिताचे वर्षांनुवर्षे रखडलेले अनेक निर्णय घेतल्याकडे लक्ष वेधतानाच राजकारणी आणि ठेकेदारांच्या अभद्र युतीवर अंकुश आणल्याने हितसंबंध दुखावले गेलेले आपल्या विरोधात तक्रारी करीत असल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी नवी दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे केल्याचे समजते.
सिंचन घोटाळ्याची चौकशी केल्यानेच राष्ट्रवादीचे नेते संतप्त झाले. जनतेपुढे सत्य यावे या हेतूनेच चौकशी करण्यात आली. काही निर्णय लवकर घेतले जावेत, असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. पण मित्र पक्षाला अभिप्रेत असलेले निर्णय घेण्यात काही तांत्रिक तसेच कायदेशीर अडचणी आहेत. या त्रुटी दूर झाल्याशिवाय निर्णय घेता येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी तसेच ए. के. अ‍ॅन्टोनी आणि अहमद पटेल यांच्याकडे स्पष्ट केल्याचे समजते. राजकारणी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीला झटका दिला. तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा घातला. यामुळे काहींचे हितसंबंध आड आले. याच मंडळींनी आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा युक्तिवाद मुख्यमंत्र्यांनी केला.
मुंबईतील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले. ईस्टन फ्री वे तसेच सांताक्रूझ-चेंबूर जोड रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी कमी झाली. नागपूरचा नझूल जमीन, मुंबईतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास हे वर्षांनुवर्षे रखडलेले प्रश्न मार्गी लावले. आरोग्य खात्यात राजीव गांधी जीवनदायी योजना तसेच रुग्णवाहिका यासारख्या योजना राबविल्या. शिक्षण खात्यात करण्यात आलेल्या सुधारणांकडे लक्ष वेधले.