काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि महायुतीपासून दूर असलेला रिपब्लिकन पक्षाचा गवई गट आणि अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बमसं यांच्यात युती होण्याची शक्यता असून खासदार असद्दून ओवेसींच्या ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम) या पक्षासोबतदेखील गवई गटाने संपर्क साधला आहे.
रिपाइंने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असला तरी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघासोबत युती करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असे रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे नेते डॉ. राजेंद्र गवई यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मोठय़ा पक्षांसोबत युती करण्यापेक्षा भारिप-बमसंला आपले प्राधान्य राहणार आहे. आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करताना कमी जागांवर समाधान मानून आम्ही स्वत:च्या हाताने नुकसान करून घेतले आहे असे ते म्हणाले. खासदार असद्दून ओवेसी यांच्या एआयएमआयएम या पक्षासोबतदेखील आमची बोलणी सुरू आहे. त्यांना सोबत घेण्याच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल, असे डॉ. गवई यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जायचे की नाही, हा निर्णय कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, पण कमी जागांवर समाधान मानणार नाही. आपण स्वत: निवडणूक लढणार नाही. अमरावती जिल्ह्य़ातील सर्व आठही जागांवर रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाचे उमेदवार राहणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चेचा पर्याय आपण खुला ठेवला असला, तरी किमान ६० जागा मिळाव्यात अशी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा