महाराष्ट्रात भाजपचे निर्णय कोण घेणार, हा उद्धव ठाकरे यांचा सवाल आणि याच मुद्दय़ावरून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची नाराजी उघड झाल्याने, मुंडे व उद्धव या दोघाही नेत्यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनाच लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.
नितीन गडकरी यांच्या राजभेटीमुळे सेना नेतृत्वात निर्माण झालेली नाराजी अजूनही कायम आहे. भाजपचे प्रभारी राजीवप्रताप रुडी यांनी उद्धव यांची भेट घेतल्यानंतरही आज शिवसेनेच्या मुखपत्रातून ‘टेंगूळ अख्यान’ लावण्यात आले. उद्धव यांच्या तीव्र नाराजी व गडकरी यांच्यावरील टीकेनंतर भाजपमधून जी नाराजी व्यक्त झाली त्याचाही समाचार उद्धव यांनी घेतला असून भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी त्यांचे राष्ट्रीयपण राज्याराज्यातील शिवसेनेसारख्या पक्षांवर अवलंबून असल्याचा रोखठोक इशारा देण्यात आला आहे.  शिवसेनेला अंधारात ठेवून महाराष्ट्रात मनसेशी छुपी हातमिळवणी केल्याबद्दल भाजपतीलच एका गटात आश्चर्य व्यक्त होत असून भाजपातील गटबाजी उघड होत असल्याचे सेनेचे मत आहे.
सत्तेसाठी दुष्मनांचे डोके फोडण्याऐवजी स्वत:च्याच डोक्यावर काठी मारून टेंगूळ आणण्याचे काम भाजप करत असून ज्या राज्यातील मित्रांनी साथ दिली त्यांनाच खडय़ासारखे बाजूला साराल तर जनतेच्या मनातील अविश्वासाचा धोंडा पाडून आणखी मोठे टेंगूळ पाडून घ्याल असे उद्धव यांनी सुनावले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रातून होणारी ही टीका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘गडकरी उद्योगा’चा पुरता बंदोबस्त करण्याची तयारी असल्याचे मानले जाते.
उद्धव यांनी गडकरी यांच्यावर तोफ डागणे चालुच ठेवलेले असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे हेही आपली नाराजी जाहीर करण्याची एकही संधी दडवत नाहीत. भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीला गैरहजर राहून मुंडे यांनीही गडकरी विरोधातील आपला दबाव कायम ठेवला आहे. शिवसेना-भाजपसाठी लोकसभेचे मैदान अनुकूल असताना गडकरी यांनी टाकलेल्या मिठाच्या खडय़ामुळे दोन्ही पक्षांमध्ये कमालीची अस्वस्था निर्माण झाली असून रुडी यांच्या उद्धव भेटीनंतरही ती अद्यापि कमी झालेली दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा