राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पाश्र्वभूमीवर आतापर्यंत न दिसलेले नेतेही बाहेर पडले असून त्यांच्या कोरडय़ा सहानुभूतीची शेतकऱ्यांना गरज नाही. त्यांच्या ‘ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम’ला अर्थ नाही. शरद पवारांचा मदत देण्याचा आठवडा केव्हा सुरू होणार हे अजूनही समजलेले नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केली.
शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेआधी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. आजपर्यंत जे खिजगिणतीतही नव्हते, असे नेतेही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बाहेर पडले आहेत, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना पक्ष म्हणून आम्ही सातत्याने प्रयत्न केले आहेत. आम्ही थेट मदतही केली आहे. सरकारी पंचनामे केव्हा होणार, अहवाल केव्हा जातील आणि शेतकऱ्यांच्या हाती मदत केव्हा पोहचेल, हे अजूनही स्पष्ट नाही. कृषीमंत्री शरद पवार यांनी एका आठवडय़ात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले होते, पण त्यांचा आठवडा अजूनही सुरू झालेला नाही. शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ मदत दिली पाहिजे, त्याचवेळी कर्ज माफ करून पुढल्या हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे. महायुतीचे नेते शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. पंचनामे व्यवस्थित होत आहेत की नाहीत, यावर लक्ष ठेवून आहेत, असे ते म्हणाले.
शिवसेनेचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार राहूल नार्वेकर यांनी न विचारता माघार घेतल्याच्या संदर्भात पत्रकारांशी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले, या विषयाचा गारपिटीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीसंदर्भात आपण आधीच मतप्रदर्शन केले आहे. राज ठाकरे शत्रू नव्हेत, गडकरींनी त्यांना भेटू नये, असे आपण कधीही म्हटले नाही, पण आता देशात महायुतीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे. सत्ताधाऱ्यांना यावेळी पराभूत करायचेच आहे. पण जनतेत संभ्रम निर्माण होऊ देता कामा नये, असेच आपले म्हणणे होते. देशाला खमक्या पंतप्रधानाची गरज आहे. यावेळी आमची सत्ता येणारच, पण दुर्देवाने घात झाला आणि पुन्हा दुबळे सरकार आले, तर देश अराजकतेच्या खाईत लोटला जाईल. महायुतीसमोर कोणतीही अंतर्गत आव्हाने नाहीत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेही उपस्थित होते. मनसेने काही ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत, पण मराठी मतांमध्ये फूट पडून नुकसान आपलेच होते, हे जनतेने ओळखले आहे, त्यांना या निवडणुकीत स्थान मिळणार नाही, असा दावा रामदास आठवले यांनी केला.