ज्यांनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, आपल्या दैवताकडे पाठ फिरवली तेच आज शिवसेनेला औकात दाखवण्याची भाषा करत आहेत. हिम्मत असेल तर औकात दाखवाच. शिवसेनेचे वाघ बघत बसणार नाहीत, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना दिले. काँग्रेसला जे हवे आहे तेच राज करत असून आमची लढाई काँग्रेसला गाडण्यासाठी असल्याने यापुढे राज यांच्या आरोपांना कोणतेही उत्तर देणार नाही, असेही उद्धव यांनी सांगितले.
दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारासाठी वरळी येथे आयोजित कार्यकर्त्यांत्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनी शिवाजी पार्कमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह देशभरातून शेकडो नेते आणि हजारो शिवसैनिक आले. परंतु शिवाजी पार्कलाच घर असलेले राज ठाकरे फिरकलेही नाहीत. टाळीसाठी जाहीरपणे हात पुढे केला जात नाही, तर फोन करून चर्चा होऊ शकते, असे हा आता सांगतो. परंतु ज्याने बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, तो माझे काय ऐकणार, असा सवाल उद्धव यांनी केला. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी राज न आल्याने तेथे शरद पवार व माझ्यात काय बोलणे झाले ते त्यांना माहीत असणे शक्य नाही. शरद पवार यांनीच जेव्हा बाळासाहेबांच्या स्मारकाचा प्रश्न उपस्थित केला तेव्हा सरकारकडे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या भूखंडासाठी मी भिक मागणार नाही, असे मी त्यांना सांगितले होते. त्यावर पवार यांनीच स्वत: पुढाकार घेण्याची तयारी दाखविल्यामुळेच तुम्हाला योग्य वाटेल ते करा, असे मी त्यांना सांगितले होते. शिवसेनेवर भूखंड विकल्याचा आरोप करणारे स्वत:च बिल्डर असून एकजरी भूखंड विकल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून निवृत्त होईन. याउपरही जर शिवसेनेने पालिकेतील भूखंड विकल्याचे राज यांचे म्हणणे असेल तर मग तेव्हा मनसेचे नगरसेवक काय तंबाखू चोळत बसले होते का, असा जळजळीत सवालही उद्धव यांनी केला.
आज हा काँग्रेसविरोधात लढण्याऐवजी माझ्यावर आरोप करत आहे. ही काँग्रेसची चाल आहे. त्यामुळे यापुढे त्याने कोणतेही बेताल आरोप केले तरी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत शिवसेनेच्या एकाही नेत्याने पडू नये असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत बुलंद करण्यासाठी मुंबईतील सहाही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader