लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसला चोहोबाजूने घेरले गेले आहे. स्वपक्षीय आणि मित्रपक्षही पराभवाबद्दल नेतृत्वाला दोष देऊ लागले आहेत. राज्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुनावण्याची संधी स्वपक्षीयांनी सोडली नसतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीने काँग्रेस नेत्यांची इंग्रजीतील भाषणे पराभवास कारणीभूत ठरल्याचा शोध लावला आहे.
दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांवर फोडले. त्यावर देवरा हे दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. देवरा व्टिटरच्या माध्यमातून एखादी भूमिका मांडायचे आणि नंतर राहुल गांधी त्यावर अधोरेखित करायचे हे अनेकदा घडले आहे. देवरा हे सुद्धा गांधी यांचे निकटवर्तीय होते, असेही मलिक यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या वाईट कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार, ममता बँनर्जी या एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्यांनी पुन्हा पक्षात परतावे, असे मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी मांडले असले तरी सिंग यांचे हे मत राष्ट्रवादीने फेटाळून लावले.
यूपीए सरकावर अनेक आरोप झाले. आरोप करताना भाजपच्या नेत्यांची हिंदीमध्ये संसदेत भाषणे झाली. मात्र त्याला उत्तर देताना पंतप्रधान, अर्थमंत्री किंवा सोनिया गांधी यांची भाषणे इंग्रजीतून झाली. इंग्रजीतील भाषणे सर्वसामान्यांना समजलीच नाहीत, असा आक्षेप राष्ट्रवादीने घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा