उत्तराखंडमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यातच सतपाल महाराज यांनी अचानक भाजपमध्ये उडी घेतल्याने काँग्रेससाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. गेल्या वेळी राज्यात सर्व जागा जिंकलेल्या काँग्रेसला या वेळी संघर्ष करावा लागत आहे. मुख्यमंत्री हरीश रावत यांच्याकडून काँग्रेसला आशा आहे.
उत्तराखंडमध्ये गेल्या वेळी लोकसभेच्या पाचही जागा जिंकून काँग्रेसने चमत्कार केला होता. या वेळी मात्र राज्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर राज्यात धीम्या गतीने सुरू असेलेल्या मदतकार्याचा मुद्दा प्रचारात केंद्रबिंदू ठरला आहे. पुनर्वसनाचे आव्हान अजूनही मोठे आहे. जुलैमधील आपत्तीने राज्याच्या अर्थकारणाला फटका बसला. मदतकार्याला विलंब झाल्याचा ठपका ठेवत काँग्रेस नेतृत्वाने विजय बहुगुणा यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर केले. त्यानंतर उत्तम संघटक अशी ख्याती असलेल्या हरीश रावत यांच्याकडे राज्याची धुरा सोपवली, मात्र रावत यांनी तातडीने निर्णय घेण्यास सुरुवात करून काही प्रमाणात सरकारची प्रतिमा सावरली. मात्र सत्पाल महाराजांसारखा नेता निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. त्यांना मानणारे काही आमदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर लगेच राज्यात सत्तांतर घडवून आणण्याची स्वप्ने भाजपला पडू लागली आहेत. अर्थात भाजपमध्ये किमान अर्धा डझन मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत, त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला होता. राजकीय स्थिती अनुकूल वाटत असली तरी भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही. अनेक गटांमध्ये भाजप विखुरला आहे. सत्तेत असताना भाजपमध्ये अनेक वेळा राज्यातील नेतृत्वावरून पेचप्रसंग निर्माण झाला होता. या वेळी मोदींच्या बाजूने लाट असल्याचा फायदा आपल्याला मिळेल या आशेवर भाजप नेते आहेत. त्यातच शेजारच्या उत्तर प्रदेशातून मोदी लढत असल्याने ही बाब पथ्यावर पडेल, असा राज्यातील भाजप नेत्यांचा होरा आहे. मात्र उमेदवारी वाटपावरून निर्माण झालेली नाराजी पाहता सर्वाना बरोबर घेऊन कसे जाणार हा प्रश्नच आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये सर्व जागा जिंकू पाहणाऱ्या भाजपला पक्षांतर्गत ऐक्य घडवणे महत्त्वाचे आहे. जनमत चाचण्या जरी भाजपच्या दृष्टीने अनुकूल असल्या तरी ऐन वेळी काय होईल ते सांगता येत नाही. गेल्या वेळी विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता टिकवण्यात यश मिळेल असे वाटत होते. मात्र चुरशीच्या लढतीत काँग्रेसने विजय खेचून आणला होता. त्यामुळे आता भाजप सावधगिरी बाळगत आहे. भाजपने प्रमुख नेत्यांनाच लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. काँग्रेसकडे मात्र तुलनेत तगडे उमेदवार नाहीत.
काँग्रेसच्या दृष्टीने बिकट वाट
उत्तराखंडमध्ये काँग्रेसची कोंडी झाली आहे. त्यातच सतपाल महाराज यांनी अचानक भाजपमध्ये उडी घेतल्याने काँग्रेससाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-03-2014 at 12:49 IST
TOPICSउत्तराखंडUttarakhandभारतीय जनता पार्टीBJPलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttarakhand lok sabha hard way for congress