भारतीय जनता पक्षातील अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी या ज्येष्ठ नेत्यांचे पर्व आता संपुष्टात आले आहे. आता भाजपमध्ये नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह आणि अन्य काही मंडळी असे नेत्यांचे वैयक्तिक गट पक्ष चालवितात, असे करुणा शुक्ला यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षे भाजपामध्ये कार्यरत असलेल्या करुणा शुक्ला या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी असून अलिकडेच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
सातत्याने वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करून गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये करुणा शुक्ला भाजपामधून बाहेर पडल्या. ३२ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर भाजपामधून बाहेर पडण्याचा निर्णय क्लेशदायक होता. वॉर्डपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत आपण सर्व स्तरावर भाजपाची पक्ष कार्यकर्ती म्हणून काम केल्याचे त्यांनी सांगितले.
आता करुणा शुक्ला छत्तीसगडमधील बिलासपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात एकच जागा जिंकता आली होती. परंतु, या वेळी काँग्रेस किमान चार जागा जिंकेल असा विश्वास करूणा शुक्ला यांनी व्यक्त केला.