उत्तर प्रदेशात मतदान व अफवा पसरणार नाही, असे कधीही होत नाही. मुस्लीमबहुल भागात मुख्तार अन्सारी, तर हिंदूबहुल भागात नरेंद्र मोदींच्या आगमनाची अफवा वाराणसीत पसरली होती. गुंड अन्सारी यांना तर वाराणसीत येण्यास प्रशासनाने मनाई केली होती. त्यातही अन्सारी अवघ्या दोनच दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटून बाहेर आलेत. त्यांच्या कौमी एकता दलाने काँग्रेस उमेदवार अजय राय यांना पाठिंबा दिला. त्यामुळे मुस्लिमांची मते मिळतील हा काँग्रेसचा भाबडा आशावाद. येथील प्रमुख मशिदीच्या इमामाने फतवा काढून रविवारी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला. त्यानंतर मध्यरात्री अन्सारीने फोनाफानी केली. तेव्हा कुठे इमामांनी प्रत्येकाने आपापल्या सदसद्विवेकबुद्धीचा वापर करून मतदान करावे, असा संदेश पाठवला. ही अफवा दुपारी दोन वाजेपर्यंत फिरत होती. त्यानंतर सुरू झाली चर्चा मोदींच्या आगमनाची. अल्पसंख्याक मतांचे ध्रुवीकरण होऊ नये म्हणून मोदीच वाराणसीत येत आहेत. एवढेच कशाला मोदींना निवडणूक आयोगाने वाहनातून उतरण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे ते फक्त आपल्या वाहनाच्या ताफ्यातूनच फिरतील, असेही भाजप कार्यकर्ते चौका-चौकात ‘फेकत’ होते. राहता राहिले ते समाजवादी पक्षाचे नेते. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सपाच्या कार्यकर्त्यांना निरोप पाठवला. सपाच्या मतदारांनी अरविंद केजरीवाल यांना मतदान करा. यामागे कोण याचा शोध लागला नाही, पण मतदान होईस्तोवर अशा किती तरी अफवा वाराणसीत पसरल्या होत्या.
हॉटेल खाली, घरे फुल्ल!
प्रचाराची मुदत संपल्यावर बाहेरून आलेल्यांना तातडीने वाराणसी सोडण्याचे आदेश देण्यात आले. शहरातील झाडून सर्व हॉटेल्स खाली करण्यात आले. पर्यटकांना स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच हॉटेल्स मिळत होती. भाजप वगळता अन्य सर्वच पक्षांचे बाहेरून आलेले समर्थक वाराणसीतून गेले, पण भाजपच्या बूथ यंत्रणेच्या माध्यमातून बाहेरून आलेल्यांची व्यवस्था स्थानिक कार्यकर्त्यांच्या घरी करण्यात आली. असेही कार्यकर्ते होते ज्यांना ना निवडणूक आयोगाची पर्वा होती ना स्थानिक प्रशासनाची. ते म्हणजे साधू महाराज. हे साधू महाराज भगवी कफनी गुंडाळून गळ्यात हर-हर..चा गमछा गुंडाळून फिरत होते, पण त्यांच्या वाटेला कुणीही गेले नाही. ना काँग्रेस ना आम आदमी पक्ष. ते अप्रत्यक्षपणे प्रचारच करीत होते. त्यांच्या वाटेला कोण जाणार. अंगाला भस्म फासलेल्या या साधूबाबांच्या वाटेला कुणीही जात नाही म्हणे. त्यांच्या वाटेला जाण्याचा प्रयत्न आम आदमी पक्षाने केला होता, पण गंगा तीरावर या कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्त्यांनी ‘प्रसाद’ दिल्यावर त्यांची बोलती बंद झाली.
लिट्टी-चोखा
मतदानासाठी आलेल्या हजारो कर्मचाऱ्यांना लिट्टी-चोखाचा आसरा होता. हा फारच मजेशीर पदार्थ आहे. इथल्या कष्टकऱ्यांचे खाद्य. कणकेचे दोन छोटेसे गोळे. त्यात सत्तूच्या पिठाचे स्टफिंग. गोळे भाजायचे. त्यात थोडंसं तूप. त्यासोबत वांगे व बटाटे भाजून केलेलं भरीत. भरिताला राईच्या तेलाची खमंग फोडणी. राईच्या तेलाच्या वासावरच या चोखाचा स्वाद ठरतो. लिट्टीसोबत खायचे. मतदानाच्या दिवशी वाराणसी अक्षरश: बंद होते. त्यात सरकारी यंत्रणा असल्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांना वेळेवर जेवणच मिळाले नाही. एका मतदान केंद्राच्या जवळ कळकट हातगाडीवर लिट्टी-चोखा मिळत होता. तेथे सुरक्षारक्षकांची झुंबड उडाली. एक-दोघांना कळाल्यावर त्यांनी इतरांनाही सांगितले. दिवसभराची कमाई केवळ दोन तासांत झाली. त्यामुळे तो हातगाडीवाला खूश झाला. म्हणत होता, मतदानाच्या दिवसाची मी यासाठीच वाट पाहत होतो, कारण याच दिवशी कमी वेळेत-श्रमात जास्त कमाई करता येते. निवडून कुणीही आला तरी आमच्या आयुष्यात काडीचाही फरक पडत नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा