लक्षवेधी लढती
वाराणसीत १६ लाख मतदार असून त्यातील तब्बल १८ टक्के मतदार मुस्लिम आहेत. केजरीवाल यांच्या उमेदवारीमुळे, येथील मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाची भीती वर्तवली जात आहे. केजरीवालांनी वाराणसीतील मुस्लिम धर्मगुरु गुलाम नाझिर, वाल्मिकी समाजाचे नेते आणि दलित समाजाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे काँग्रेसविरोधी लाट आणि मुस्लिम मतदारांची मोदीविरोधी भावना यांचा फटका काँग्रेसचे अजय राय आणि भाजपचे नरेंद्र मोदी यांना बसू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. गंगेच्या पाण्याचे शुद्धिकरण, प्रसिद्ध बनारसी रेशमी साडय़ा तयार करणाऱ्या विणकरांचे प्रश्न, रोजगार आणि पर्यटन उद्योगासाठी सुविधा आणि सांडपाण्याचा निचरा हे येथील प्रमुख प्रश्न आहेत.
अरविंद केजरीवाल
प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीत उतरणाऱ्या केजरीवालांना काँग्रेसविरोधी लाट फायद्याची ठरू शकते. भाजपविरोधी मतदारांना ‘आप’चा पर्याय उपलब्ध झाला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांची पाश्र्वभूमी, व धर्मनिरपेक्ष प्रतिमा ही आपची शक्तीस्थाने तर, काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप, सत्ता सोडण्याचा निर्णय या विरोधातील बाबी आहेत.
नरेंद्र मोदी
गतीमान निर्णय, विकासाभिमुख प्रतिमा, युवकप्रियता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व कॉर्पोरेट जगताचा पाठिंबा ही प्रमुख बलस्थाने आहेत. तर, ‘मुस्लिमविरोधी’ प्रतिमा, पाळत प्रकरण व ‘विवाहित’ असल्याची कबुली या विरोधी बाबी आहेत.
अजय राय (काँग्रेस)
स्थानिक आमदार, तेथील समस्यांची जाणीव, जनसंपर्क आणि ‘स्वयंसेवक’ म्हणून केलेले काम या बाबी पथ्थ्यावर. ‘स्थानिक विरुद्ध उपरे’ असा रंग देण्यात राय यशस्वी.