गेल्या साडेचौदा वर्षांत काँग्रेसचे चार मुख्यमंत्री झाले. चौघांची तुलना करता मित्रपक्षांना विश्वासात घेणे, जनतेची कामे पटापट मार्गी लावणे व निर्णयक्षमता यात विलासराव देशमुख हे सर्वात समंजस होते, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.
विलासराव देशमुख दोनदा, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि आता पृथ्वीराज चव्हाण या चारही मुख्यमंत्र्यांबरोबर आपण काम केले. मधले दोन महिने वगळता १९९९ पासून सतत लोकशाही आघाडी सरकारमध्ये काम करीत आहे. आता आपल्या सडेतोड काम करण्याच्या पद्धतीबद्दल टीका केली जाते. पण आपली कामे लवकर मार्गी लागली पाहिजेत, अशी सर्वसामान्यांची नेत्यांकडून अपेक्षा असते. सरकारमध्ये निर्णयच लवकर होत नसल्यास त्याबद्दल परखडपणे मते मांडावी लागतात. चारही मुख्यमंत्र्यांची तुलना केल्यास विलासराव देशमुख हे सर्वाना विश्वासात घेऊन काम करायचे, असे अजित पवार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
एखाद्या निर्णयावरून तात्कालिक मतभेद झाले असतील. वैयक्तिक पातळीवर आपले सर्वच मुख्यमंत्री वा अधिकाऱ्यांशी उत्तम संबंध राहिले आहेत. मधल्या काळात सरकारमध्ये निर्णय होण्यास विलंब लागत असल्यानेच राष्ट्रवादीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. बहुधा यामुळेच नंतरच्या काळात सरकारमध्ये निर्णय पटापट घेण्यात आले. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आपले काहीही वैयक्तिक मतभेद नाहीत. उलट आम्ही दोघे एकत्र काम करतो, असा दावाही पवार यांनी केला.
१९९९, २००४ आणि २००९ची तुलना करता यंदा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश मिळेल, असा दावाही पवार यांनी केला. राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये योग्य समन्वय राखला गेला पाहिजे, अशी आपली ठाम भूमिका आहे. अगदी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे स्थानिक पातळीवर काही चुकत असल्यास आम्ही ते दुरुस्त करू, असेही स्पष्ट केले.
भाजपला डॉ. गावित आता कसे चालतात?
डॉ. विजयकुमार गावित यांनी लाल दिव्याचा त्याग केला म्हणजे राजकीयदृष्टय़ा ते नक्कीच नंदुरबारच्या राजकारणाला विटले असणार. पक्षाध्यक्ष शरद पवार, मी स्वत:, आर. आर. पाटील यांनी त्यांची गेला महिनाभर समजूत काढली. पण काँग्रेसचे स्थानिक नेते आपल्याला राजकीयदृष्टय़ा संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी त्यांची तक्रार होती. डॉ. गावित यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी केवढे आरोप केले होते. त्यांच्या राजीनाम्यासाठी सभागृह बंद पाडले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. गावितांच्या बाबतीच हेच झाले. आता हेच डॉ. गावित भाजपला कसे चालतात, असा सवालही अजित पवार यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा