विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता येणारच, असा ठाम दावा युतीचे नेते करीत असले तरी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झालेल्या विनोद तावडे यांनी सहा वर्षे या पदावर चांगले काम करावे, कारण पुन्हा सत्ता आघाडीचीच येणार असल्याचा चिमटा सत्ताधारी बाकावरून गुरुवारी काढण्यात आला.
विधान परिषदेच्या सभापतीपदी शिवाजीराव देशमुख यांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण झाल्यावर विरोधी पक्षनेतेपदी तावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी नव्या सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचे स्वागत करताना विरोधकांना चिमटा काढला, तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना सुनावण्याची संधी सोडली नाही.
विधानसभा निवडणुकीनंतरही आम्हीच पुन्हा सत्तेत येणार आहोत. तेव्हा खडसे यांच्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधी मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच बहुधा विनोद तावडे यांनी विधान परिषदेवर जाणे पसंत केलेले दिसते, असा टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मारला. विरोधी पक्षनेते म्हणून चांगले काम करा, अशा शुभेच्छा सत्ताधारी बाकावरून देण्यात आल्या असता सभागृहात हंशा पिकला. विधानसभा निवडणुकीपर्यंत म्हणजे पाच-सहा महिनेच तावडे विरोधी पक्षनेते राहणार आहेत, अशी सारवासारव शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी केली. तर या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. मी या पदावर किती काळ राहावे हे जनताच ठरवेल, असे प्रत्युत्तर तावडे यांनी दिले.
विधान परिषद निवडणुकीत होणारा घोडेबाजार टाळण्याकरिता राज्यसभेच्या धर्तीवर विधान परिषद निवडणुकीतही खुल्या मतदानाची पद्धत सुरू झाली पाहिजे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करू, असे सभापतीपदाची हॅटट्रिक करणारे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले. सभापतीपदी तिसऱ्यांदा निवड होत असताना तिन्ही वेळा पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती वसंत डावखरे हे होते. हा योगायोग असल्याचे देशमुख म्हणाले. शिवाजीरावांच्या कारकिर्दीत विधान परिषदेच्या कामकाजाचा दर्जा अधिक उंचावेल, असा विश्वास सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी व्यक्त केला.