श्रीवर्धन मतदारसंघात मोठय़ा प्रमाणावर विकासकामे करूनही सुनील तटकरे यांना लोकसभा निवडणुकीत भरभरून मते मिळाली नाहीत, त्यामुळे तटकरे यांच्या पराभवाला श्रीवर्धनकरच जबाबदार असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. झाले गेले विसरून आता विधानसभा निवडणुकींच्या तयारीला लागा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटची त्यांनी खिल्ली उडवली.
ते रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार मेळाव्यात माणगाव येथे बोलत होते. लोकसभा निवडणुकीत तटकरे यांना श्रीवर्धनपेक्षा अलिबाग मतदारसंघात जास्त मते मिळाली. मात्र ज्या श्रीवर्धन मतदारसंघात त्यांनी विकासकामांचा डोंगर उभा केला, तिथे कमी मते मिळाली. त्यामुळे तटकरे यांच्या पराभवाला श्रीवर्धनकर जबाबदार आहेत, असा ठपका त्यांनी ठेवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात दुष्काळाबद्दल अवाक्षरही काढले नाही, त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.प्रत्येक वेळी यश येईलच असे मानण्याचे कारण नाही. पण झाले गेले विसरून जा, मरगळ झटकून कामाला लागा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही काँग्रेसच्या जागावाटपाचा निर्णय केंद्रीय पातळीवर होणार असला तरी रायगडमध्ये राष्ट्रवादीला किमान चार जागा मिळाल्याच पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्य़ात पक्षाची ताकद मागील वेळेपेक्षा वाढली आहे असे सांगताना त्यांनी जिल्ह्य़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाची स्थिती कथन केली. श्रीवर्धनच्या जागेबद्दल सर्वानाच कुतूहल आहे, पण त्याबाबतचा निर्णयदेखील कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारून विकासाच्या मुद्दय़ावर आगामी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी राज्यातील आघाडी सरकारने केलेली विकासकामे सोशल मीडियाच्या माध्यमातून गावागावांत, वाडय़ावस्तींवर पोहोचवा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
रायगडचे पालकमंत्री सचिन अहिर यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आमदार सुरेश लाड, आमदार अनिल तटकरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते राजीव साबळे, प्रतोद महेंद्र दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा