‘मतदान’ हा नागरिकांना मिळालेला हक्क आहे. त्याची वाट लागू नये, असे मनापासून वाटत असेल तर प्रत्येक सुजाण नागरिकाने या हक्काचा वापर जरूर करावा आणि योग्य लोकप्रतिनिधींना निवडून द्यावे. महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा हक्क बजावला म्हणजे कर्तव्य संपले, असे समजू नये. तर पुढील पाच वर्षांसाठी आपण ज्याला निवडून दिले आहे, तो योग्य प्रकारे काम करतो आहे की नाही यावरही लक्ष आणि अंकुश ठेवावा. लोकप्रतिनिधीला निवडून दिल्यानंतर आश्वासने तो पूर्ण करतोय का, नसेल तर का नाही याचाही जाब मतदारांनी त्याला विचारायला हवा. निवडणुकीनंतर अपवाद वगळता अनेक लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यात काहीच संवाद राहात नाही. लोकप्रतिनिधीने मतदारांशी संवाद ठेवणे गरजेचे आहे. दर तीन महिन्यांनी या दोघांत थेट संवाद, चर्चा झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी ते करत नसेल तर मतदारांनी त्याला तसे करण्यास भाग पाडावे. लोकप्रतिनिधी योग्य प्रकारे काम करत नसेल तर त्याला परत बोलाविण्याचा अधिकारही मतदारांना असला पाहिजे.
मतदान कशाला करायचे? आपण मतदान केले नाही तर काय फरक पडतो? असे काहींचे म्हणणे असते. पण मतदान न करता राजकारण आणि राजकीय परिस्थिती यावर नुसती चर्चा करणे अयोग्य आहे. मतदानाच्या माध्यमातून योग्य, सुशिक्षित लोकप्रतिनिधी आपण निवडून देऊ शकतो. प्रत्येकाने सारासार विचार करून मतदान करावे. कोणताही उमेदवार योग्य वाटत नसेल तर ‘वरीलपैकी कोणीही नाही’ (नोटा) या पर्यायाचा वापर करावा. पण मतदानच करणार नाही, असे करू नये. मतदानाच्या दिवशी सुट्टी असते. काही जण मतदान न करता ही सुट्टी ‘साजरी’ करतात. पण प्रत्यकाने अगोदर मतदान करावे आणि त्यानंतर सुट्टी साजरी करावी. निवडून आलेल्या उमेदवाराला किती मते मिळाली याची आकडेवारी जाहीर केली जाते, त्याचप्रमाणे किती मतदारांनी ‘नकाराधिकार’ वापरला त्याचीही आकडेवारी जाहीर केली पाहिजे.
मतदान करायला जायचे
मला आठवतोय, गुरुवार ३० एप्रिल २००९ चा मतदानाचा दिवस. माझे सासरे सुप्रसिद्ध नाटककार भालचंद्र रणदिवे हृदयविकाराचा झटका आल्याने आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट होते. आदल्या रात्री दवाखान्यात सोबतीला गेलेले माझे पती सकाळी घरी परतले की लगेचच आपण फारशी गर्दी वाढायच्या आत मतदान करायला जायचे, या विचाराने मी व सासुबाई भराभर आवराआवर करीत होतो. तेवढय़ात ह्य़ांचा फोन आला, ‘‘बाबा गेले.’’ दोन दिवसांपूर्वी आमच्याशी हसतखेळत गप्पा मारणारे बाबा लवकरच बरे होऊन घरी येतील, ठरल्याप्रमाणे १ मे रोजी नवीन घराची वास्तुशांती होईल, या भ्रमात असलेले आम्ही बाबांच्या जाण्याने शोकाकुल झालो.
दु:खद वातावरणात आप्तस्वकीयांच्या गर्दीत बाबांना शेवटचा निरोप दिला. साहजिकच मतदानाचे साफ विसरून गेलो होतो. अचानक सासुबाईंना दुपारी ४.३० वा. आठवले, आज मतदानाचा दिवस होता. त्यांनी आम्हाला दोघांना व नातीला (जिला आयुष्यात पहिल्यांदा मतदानाची संधी आली होती) मतदान करून येण्यास सांगितले. खरे तर सकाळी बाबा गेले आणि आपण आजच मतदानासाठी बाहेर पडायचे, हे कुठेतरी खटकत होते; पण सासुबाईंनी आम्हाला बाबांच्या संस्कारांची, उत्तम नागरिकाच्या कर्तव्याची आठवण देऊन मतदान कराच, असा आग्रह केला.स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून मुला-सुनेला, नातीला कर्तव्याची आठवण करून देणाऱ्या आमच्या आई त्यानंतर महिन्याभराने निवर्तल्या.त्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीत केलेले ते मतदान आम्हाला, आमच्या घरातील युवा पिढीला आजही प्रेरणादायी वाटते.
धनराज देवीदास विसपुते, नवीन पनवेल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा