भारतीय मतदार भावनिक आहे. देवा-धर्माच्या, जाती-पातीच्या आधारावर त्याच्या भावनांना हात घातला की एकगठ्ठा मतांची तजवीज झालीच म्हणून समजा. राजकीय पक्षांची ही पंचवार्षिक वैचारिक बैठक गेल्या कित्येक निवडणुकांच्या माध्यमातून पक्की झाली आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या अलीकडे-पलीकडे जात-पात-धर्म-प्रांत या चार मुद्दय़ांच्या आधारावर हाकाटी करून मतांचे ध्रुवीकरण करायचे आणि त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही पद्धतच दृढ झाली आहे. मात्र, गेल्या दोन दशकांत यात हळूहळू का होईना बदल होत आहे. राजकीय पक्षांच्या नव्हे तर मतदारांच्या मानसिकतेत. धर्म-जातीपेक्षा आर्थिक विकासाला भारतीय मतदार प्राधान्य देऊ लागला आहे!
धर्म-जात-पातीऐवजी आता आर्थिक विकास किती झाला आहे. आपल्याला रोजगाराच्या संधी मिळू शकतात का. आपले आर्थिक हित जपले जाईल का, या मुद्दय़ांचा विचार करूनच मतदार मतदानासाठी वळत आहेत. हे निरीक्षण मांडले आहे लोक फाऊंडेशन आणि पेनसिल्व्हानिया विद्यापीठाच्या सेंटर फॉर अॅडव्हान्स स्टडी ऑफ इंडिया (कासी) या दोन संस्थांनी. या दोन्ही संस्थांनी गेल्या वर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २४ राज्यांच्या ७० हजार लोकांशी त्यांनी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर चर्चा केली. या पाहणीच्या आधारे वरील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. या पाहणीचा अहवाल नुकताच नवी दिल्लीत प्रसिद्ध करण्यात आला. उत्तरेकडील विशेषत उत्तर प्रदेश व बिहारमधील मतदारांनी बेरोजगारी व भ्रष्टाचार हे दोन मुद्दे निवडणुकीत महत्त्वाचे वाटते, असे म्हटले तर दक्षिणेकडील मतदारांना नागरी विकासाविषयी अधिक चिंता वाटत असल्याचे या पाहणीत निदर्शनास आले.
रालोआला प्राधान्य
लोक फाऊंडेशन आणि कासी यांनी केलेल्या पाहणीत ३१ टक्के मतदारांनी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला प्राधान्य दिले. तर २३ टक्के लोकांनी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर विश्वास दाखवला.
मुस्लिमांनाही विकासाची आस
काँग्रेस वा अन्य धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या मुस्लिम समाजानेही आता स्वत:चा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी चांगली आर्थिक धोरणे राबवणाऱ्या पक्षालाच प्राधान्य दिल्याचे या पाहणीत आढळून आले. त्यामुळे ज्या राजकीय पक्षांच्या अजेंडय़ावर आर्थिक सुधारणांना वाव असेल त्यांनाच हा समाज पाठिंबा देणार असल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे.
गुन्हेगारी पाश्र्वभूमी चालते
अनेकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवाराची पाश्र्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असते. मात्र, मतदारांना त्याने केलेल्या गुन्ह्य़ांपेक्षा त्याची जात महत्त्वाची वाटते व त्या उमेदवाराला जातीच्या आधारावर मते मिळतात, असेही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. पाहणी केलेल्यांपैकी ४८ टक्के लोकांनी गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या उमेदवाराला पसंती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा