गिरीश कुलकर्णी, अभिनेते
लहानपणापासून मला मतदान अधिकाराबद्दल अप्रूप वाटत आले आहे. स्वत:ची जबाबदारी पूर्ण पेलू शकण्याची जाणीव झालेला माणूस मतदानास प्राप्त असला पाहिजे असे मला वाटायचे. ही माझी भावना तेव्हा निरागस असली तरी त्यामध्ये सत्यांश होता. देशाच्या आणि देशातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाला पोषक अशी राजकीय व्यवस्था स्वीकारलेली असते. या राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येकाला आपल्या आशा-आकांक्षांचे प्रतििबब शोधण्याची गरज निर्माण होते. अर्थात त्यामध्ये काही गोष्टी नकोशा वाटणाऱ्या आणि अप्रिय वाटणाऱ्या जरूर आहेत. या नको असलेल्या गोष्टी बदलाव्या वाटत असतील तर हक्काने बदलल्या पाहिजेत. हा अधिकारदेखील आपल्याला या व्यवस्थेनेच दिला.
मी मतदान करणार नसेन, तर देशातील राजकीय व्यवस्थेविषयी किंवा या व्यवस्थेच्या विरोधात बोलण्याचा अधिकार मला राहणार नाही. माणसाला जगण्यासाठी पर्यावरणाची गरज असते. अर्थात पर्यावरणाविषयीच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतील. त्यासंदर्भात सकसपणाने संवाद करून संकल्पना निश्चित करता येतील. या अभिसरणामध्ये समाविष्ट होणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. तरच, लोकशाही आणि ही राजकीय व्यवस्था माझी आहे याची जाणीव होईल. मतदान न करणे हे मला मूर्खपणाचे वाटते. आपण प्रत्येक जण या समाजाचा एक भाग आहोत. या समाजाची जी राजकीय व्यवस्था आहे त्यामध्ये भाग घ्यायचा नाही, तर केवळ हवा खाऊन माणूस स्वतंत्रपणे जगू शकत नाही. त्याच्याशी संलग्न होण्याची मतदान ही लोकशाहीतील महत्त्वाची प्रक्रिया आहे.
मतदान करणे म्हणजे कार्यकर्ता म्हणून राजकीयदृष्टय़ा सक्रिय झालो असे होत नाही, तर नागरिक म्हणून आपली ती जबाबदारी आहे. कोणत्याही विषयावरचे नेमके मत असणे, ते व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी भय, तिडीक आणि नको वाटावे असे वातावरण असू नये. तसे वातावरण ठेवणे हे राजकीय लोकांच्या सोईचे असते. पण, ती माणसेच आहेत.
माणसांतील हा व्यवहार गुंतागुंतीचा, रहस्यपूर्ण राहावा यासाठी प्रयत्न होणार असतील तर ते हाणून पाडले पाहिजेत. तरुणांची लक्षणीय संख्या, पूर्वग्रहविरहित, निर्भयतेने व्यक्त झाली तर सामान्यालाही मतदान करावेसे वाटेल. पैसे घेऊन मतदान करणारी माणसे या समाजात राहण्यास लायक नाहीत असेच मी म्हणेन. हा भ्रष्ट विचार संस्कारांनी दूर केला तर शंभर टक्के मतदान होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा