ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कार प्रवासादरम्यान संरक्षक पट्टय़ाचा वापर केला असता तर त्यांचे प्राण वाचले असते, असे मत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी येथे व्यक्त केले. वाहने चालविताना चालकांनी संरक्षक उपाययोजना करण्यासंबंधी अधिक जागरूक व्हावे, म्हणून पुन्हा एकदा व्यापक मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचेही डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी जाहीर केले. संरक्षक पट्टे न वापरणारे कारचालक आणि हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीधारकांना शिक्षा करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.
गाडय़ांमध्ये अद्यापही संरक्षक पट्टे वापरले जात नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब असून लोकांना केवळ ती सजावटीची बाब वाटते. मागच्या बाजूस बसणाऱ्या लोकांची मानसिकता विशेषत्वे अशा प्रकारचीच असते, याकडे लक्ष वेधून गोपीनाथ मुंडे यांनी संरक्षक पट्टा वापरला असता तर ते निश्चितच बचावले असते, असे हर्षवर्धन ठामपणे म्हणाले.  
कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाने हा पट्टा वापरणे अत्यंत आवश्यकच आहे. त्यामुळे आणीबाणी काळात प्राण वाचू शकतात, याकडे हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले. वाहन चालविताना सुरक्षात्मक काळजी घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच पुढाकार घेणार आहे, असेही ते म्हणाले. त्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रचारमोहिमेत सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. अपघातांचे बळी ठरणारी लहान मुले किंवा अशा प्रकारच्या अपघातांमध्ये ठार होणाऱ्या आईवडिलांचीही उदाहरणे त्याद्वारे लोकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे यांच्या कारला अपघात झाल्यानंतर काही सेकंदांतच त्यांचा मृत्यू ओढवला. या अत्यंत अवेळी आणि दुर्दैवी झालेल्या मृत्यूमुळे सर्वच वाहनमालकांसमोर एक प्रकारची धोक्याची घंटाच वाजली आहे, असा इशारा त्यांनी दिला. मुंडे यांच्या कारला बसलेला धक्का मोठा नव्हता, परंतु त्या धक्क्य़ामुळे मेंदूच्या दिशेने होणारा रक्तपुरवठा विस्कळीत झाला आणि त्यामुळे त्यांची हृदयक्रिया बंद पडण्याचे ते एक प्रमुख कारण ठरले, याकडे हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले. याखेरीज त्यांच्या यकृतासही मोठी इजा होऊन अंतर्गत रक्तस्राव झाला, असे त्यांनी सांगितले.
लोकांनी संरक्षक पट्टय़ाचे महत्त्व दुर्लक्षित केल्यामुळेच कार अपघातात त्यांचा बळी जातो, हे आता आपल्या चांगलेच लक्षात आले आहे, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या संरक्षक उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या अनेक अपघातांची उदाहरणे त्यांनी सांगितली.
 ब्रिटनच्या युवराज्ञी प्रिन्सेस डायना यांचे उदाहरण देऊन अपघात घडला, त्यावेळी डायना आणि अन्य तिघांनी संरक्षक पट्टा न वापरल्यामुळेच त्यांचा बळी गेल्याकडे हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांनीही संरक्षक पट्टय़ाचा वापर न केल्यामुळे कार अपघाताचेच बळी ठरले असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली. संरक्षक पट्टे योग्य रीतीने वापरले तर निश्चितपणे प्राण वाचू शकतात, असा दावा त्यांनी केला.
संरक्षक पट्टय़ांखेरीज अलीकडे मोबाइलवरून बोलत वाहने चालविणारे अत्यंत धोकादायक ठरत असल्याकडेही हर्षवर्धन यांनी लक्ष वेधले.