दिल्लीतील सत्ता गमावल्यानंतर आणि लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही आम आदमी पार्टीच्या (आप) मागे लागलेले शुक्लकाष्ठ अद्याप संपलेले नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि हरयाणा राज्य निमंत्रक नवीन जयहिंद यांनी पक्षातील पदांचे राजीनामे दिले आहेत. मात्र उभयतांनी पक्षातील पदांचा राजीनामा दिला आहे, पक्षाचा नव्हे असे स्पष्ट करण्यात आले आहे.
आपचे नेते योगेंद्र यादव यांनी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचा तर जयहिंद यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला आहे. मात्र, ते अद्यापही पक्षातच आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते आणि दिल्ली विभागाचे चिटणीस दिलीप पांडे यांनी म्हटले आहे. याबाबत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल तेव्हा चर्चा करण्यात येईल, असे राष्ट्रीय चिटणीस पंकज गुप्ता म्हणाले.

Story img Loader