पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांना शुक्रवारी युवकांच्या एका गटाने काळे झेंडे दाखविले. या प्रकाराने संतप्त झालेल्या सिन्हा यांच्या समर्थकांनी सदर युवकांना मारहाण केली.
सदर युवक हे लोकहित विकास मंच या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते होते आणि त्यांनी सिन्हा यांना कारगिल चौकात काळे झेंडे दाखविले. हे राजकीय प्रतिस्पध्र्याचे कृत्य असल्याचा आरोप भाजपचे आमदार नितीन नवीन आणि प्रेमरंजन पटेल यांनी केला आहे. मात्र सिन्हा यांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
सदर स्वयंसेवी संस्थेचे बहुसंख्य कार्यकर्ते तरुण होते आणि त्यांनी काळे झेंडे दाखविण्याचे कारण दिले नाही. हे कार्यकर्ते दारूच्या नशेत होते, असा आरोप पटेल यांनी केला. पक्षाने घेतलेल्या निर्णयाच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारीही सिन्हा यांच्याविरोधात पक्षाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली होती.
‘लढाई राव आणि रंकामध्ये’
पाटणासाहिब मतदारसंघातून भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा आणि काँग्रेसचे उमेदवार व भोजपुरी अभिनेते सुपरस्टार कुणाल सिंह यांच्यात लढत होणार आहे. मात्र हे दोन अभिनेत्यांमधील युद्ध नाही तर राजपुत्र विरुद्ध रंक अशी लढाई आहे, असे कुणाल सिंह यांनी म्हटले आहे. शत्रुघ्न सिन्हा हे आपल्याला मोठय़ा भावासारखे आहेत, मात्र हे दोन अभिनेत्यांमधील युद्ध आहे असे आपल्याला वाटत नाही. आपण स्टार नाही, तर आपण बिहारचे भूमिपुत्र आहोत, असे कुणाल सिंह  म्हणाले.