देशभरातील जनतेची गरज भागविणाऱ्या ए-२ दुधाचे महत्त्व वाढते आहे. साहजिकच त्यामुळे गावठी गायींचाही उदोउदो सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर देशी गोवंशाचे नवीन दुधाळ वाण शोधून काढण्याची लगबग सर्वत्र सुरू आहे. कर्नाल-हरयाणातील केंद्रीय गोवंश संवर्धन केंद्राने आता कोकणातही ही मोहीम हाती घेतली असून गेल्या तीन वर्षांपासून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या समन्वयाने सुरू असलेली ही संशोधन मोहीम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
मुळात कोकणात वाढणाऱ्या डांगी गोवंशाची अनुवांशिक नोंदणी कर्नालमध्ये यापूर्वीच झालेली आहे. पण हा गोवंश प्रामुख्याने नांगरणी कामातील उपयुक्ततेसाठी महत्त्वपूर्ण आहे. हळूहळू चालणारे आणि रुंद पाय असणारे हे वाण दुधासाठी मात्र फारसे प्रचलित नाही. साहजिकच शेतीतील यांत्रिकीकरणाच्या सरकारी धोरणामुळे हा गोवंश सध्या कालबाह्य़ ठरण्याच्या उंबरठय़ावर आहे. डांगीसह येथे कोकण गिड्डा हा गोवंशही विशिष्ट लक्षणांमुळे सर्वपरिचित आहे. मात्र त्याची संशोधनपूर्वक नोंदणी अद्याप झालेली नाही. या भागातील दुग्धोत्पादन क्षमता खूपच कमी आहे. माणसी २४० मिलीलिटरची गरज असताना जेमतेम ११० मिलीलिटर दुधाची गरजच सध्या येथे भागवली जाते. त्यामुळे या भागात यंत्रणांनी आतापर्यंत गुणवत्तेपेक्षा उत्पादन वाढविण्यावर भर दिला होता. आता दुग्धोत्पादनाची परिस्थिती सुधारत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. या पाश्र्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय गोवंश संवर्धन केंद्राच्या समन्वयाने तीन वर्षांपूर्वीपासून देशी दुग्धोत्पादनाची गुणवत्ता वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
मुळात या मोहिमेची सुरुवात चार वर्षांपूर्वी झाली. येथील पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी कोकणातील दूध उत्पादनासह बहुउपयोगी स्थानिक गायींबाबतचा शोधनिबंध राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादात सादर केला होता. त्यातील मुद्दे लक्षात घेऊन राष्ट्रीय गोवंश संवर्धन केंद्राने त्यादृष्टीने विद्यापीठाकडून प्रस्ताव मागवला होता. कोकण गिड्डाची दुग्धोत्पादन क्षमता तीन ते आठ लिटपर्यंत असल्याचे विद्यापीठातील शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. काळसर, गडद तपकिरी रंगाच्या या वाणाची शेपूट लांबसडक असून ही संपूर्ण कोकणात सर्रास आढळून येते. या वाणाची सर्व बाह्य़ लक्षणे नोंदवून यातील जातिवंत गाय आणि बल विद्यापीठाने शोधून काढले आणि पदाशीसाठी आपल्या प्रक्षेत्रावर आणले आहेत. यातूनच त्यांचे आनुवंशिक गुणधर्म, डीएनए मॅिपग करून केंद्रीय गोवंश संवर्धन केंद्राकडे सादर करण्यात आले आहेत. त्यामुळे या नवीन गोवंशावर सध्या कर्नालस्थित केंद्रात अभ्यास सुरू आहे. या गोवंशाचे वेगळेपण सिद्ध झाल्यास कोकणाला आणखी एक गोवंशाचे नोंदणीकृत वाण मिळेल.
हे वाण दुधासाठी चांगले असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे एका बाजूला ए-२ युक्त दूध आणि दुसऱ्या बाजूला दुग्धोत्पादनात वाढ असा दुहेरी फायदा येथील शेतकऱ्यांना स्थानिक गायींच्या उपलब्धतेतूनच मिळण्याची शक्यता आहे. परिणामी, गोपालनापासून दूर जाणाऱ्या शेतकऱ्याला पुन्हा या मार्गाकडे वळवण्यात यश मिळेल, असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. केंद्रीय गोवंश संवर्धन केंद्राकडून या नवीन वाणावर शिक्कामोर्तब झाल्यास विद्यापीठासह यंत्रणांना या गोवंश प्रसारासाठी पुढाकार घेणे शक्य होणार आहे.
जर्सी गाईंच्या धर्तीवर रेतन
सध्या दुग्धोत्पादनासाठी जर्सी गायींचे कृत्रिम रेतन करून पुढील पिढी आणि वाण जपण्याचे काम यंत्रणांकडून सुरू आहे. त्याच धर्तीवर या नवीन देशी वाणाचे वीर्य साठवणूक, त्यांचे कृत्रिम रेतन करण्याच्या पद्धतीही विकसित होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. त्यादृष्टीने यावर्षीपासून प्रयत्न सुरू झाल्यास पाच सहा वर्षांत या वाणाचे निश्चितीकरण आणि कृत्रिम रेतनासाठी आवश्यक वीर्य संकलनाची सुरुवात शक्य होईल, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे.
गिड्डा नव्हे कपिला!
प्राचीन ग्रंथात काळ्या कपिला गायीचा उल्लेख आढळलेला आहे. कोकणात अतिशय प्रतिकूल म्हणजेच अधिक पाऊस आणि उन्हाळ्यातील वेगवेगळे ताण सहन करणारा हा गोवंशदेखील कपिलेसारखाच काळ्या रंगाचा आहे. त्याची दुधासह नांगरणी कामातील बहुउपयुक्तता खूपच महत्त्वपूर्ण आहे. त्यातच गिड्डा नावाने देशात आणखी एका गोवंशाचा उल्लेख केला जातो. ते नामसाधम्र्य वेगळे करावे, या हेतूने या नवीन वाणाचे नाव कपिला करावे, असे प्रयत्नही होत आहेत.
rajgopal.mayekar@gmail.com