कोकणात घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका खरीप हंगामावर फारसा झाला नसला तरी रब्बी हंगामावर याचा परिणाम दिसून आला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक लागवडीपासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्रात तब्बल ३० हेक्टर घट झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले होते. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यात यश संपादित केले आहे.
रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र या वेळेस यात सरासरी हजार मिलीमीटर पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या परिस्थितीचा खरिपातील भात लागवडीवर फारसा परिणाम झाला नसला तरी रब्बी हंगामातील वाल, पावटा, चवळी, पांढरा कांदा यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. अलिबाग तालुक्यात दरवर्षी २५५ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते, मात्र या वर्षी २२५ हेक्टर क्षेत्रामध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. परंतु, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३० हेक्टर क्षेत्रामध्ये कांदा लागवडीची घट झाली. अलिबाग तालुक्यात काल्रे, खंडाळा, बहिरोळे, वावे, चौल, ढवर, बामणगाव परिसरांत या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ातील बाजारात चढय़ा दराने याची विक्री केली जाते. भातकापणी झाल्यानंतर तात्काळ कांद्याची लागवड केली जाते. अक्टोबर ते जानेवारी हा लागवडीचा कालावधी असतो. साधारणपणे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मे अखेपर्यंत हा कांदा बाजारात विकला जातो. दर्जेदार कांद्याला किलोमागे ७५ रुपयांपर्यंतचा दरही मिळतो. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेतीनंतरचे दुबार पीक म्हणून कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करत असतात.
कांद्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक केली जाते. मात्र पर्जन्यमान घटल्याने जमिनीत पिकासाठी उपयुक्त ठरेल अशी आर्द्रता दिसून आली नाही. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीपासून दुर राहिले. मात्र पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते. कांदा लागवडीसाठी वाफा आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याची सूचना करण्यात आली होती. याशिवाय पाणी पुरवठय़ासाठी सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन आणि स्पिं्रक्लर पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. याचा पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनावर चांगला परिणाम झाल्याचे आता समोर आले आहे. शेतकऱ्यांनी एकरी चोवीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. बाजारात कांद्याची एक माळ १०० ते १५० रुपयेपर्यंत विकली जात असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे.

अलिबाग तालुक्यातील २५० हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. हे पीक भौगोलिकदृष्टय़ा इथेच चांगल्या पद्धतीने घेतले जाऊ शकते. त्यामुळे जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या पिकाची लागवड करायला हवी, कमी पावासामुळे लागवडीचे क्षेत्र घटले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे उत्पादन मात्र वाढले आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो आहे.
– बी. आर. जानुगडे, तालुका कृषी अधिकारी अलिबाग.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Rabi onion cultivation will increase by lakh hectares Mumbai
रब्बी कांदा लागवड लाख हेक्टरने वाढणार; जाणून घ्या, देशभरातील रब्बी लागवडीचा अंदाज
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Child dies in husband-wife fight Crime of culpable homicide against man
पतीने रागाच्‍या भरात पत्‍नीला मारली लाथ, कडेवरील चिमुकलीचा खाली पडून…

पांरपरिक पद्धतीबरोबरच वाफा पद्धत आणि मल्चिंग पद्धतीचा त्यांनी वापर केला. कांद्याला पाणी देण्यासाठी स्प्रिंक्लर आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला. याचा चांगला परिणाम पांढऱ्या कांद्याच्या पिकावर दिसून आला. त्यामुळे दोन एकरांत जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
– सतीश म्हात्रे, शेतकरी.
हर्षद कशाळकर  – meharshad07@gmail.com