कोकणात घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका खरीप हंगामावर फारसा झाला नसला तरी रब्बी हंगामावर याचा परिणाम दिसून आला. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक लागवडीपासून दूर राहणे पसंत केल्याचे दिसून येत आहे. अलिबाग तालुक्यातील पांढऱ्या कांद्याच्या लागवड क्षेत्रात तब्बल ३० हेक्टर घट झाल्याचे कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात समोर आले होते. मात्र अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यात यश संपादित केले आहे.
रायगड जिल्ह्य़ात दरवर्षी सरासरी साडेतीन हजार मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. मात्र या वेळेस यात सरासरी हजार मिलीमीटर पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. या परिस्थितीचा खरिपातील भात लागवडीवर फारसा परिणाम झाला नसला तरी रब्बी हंगामातील वाल, पावटा, चवळी, पांढरा कांदा यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. अलिबाग तालुक्यात दरवर्षी २५५ हेक्टरवर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते, मात्र या वर्षी २२५ हेक्टर क्षेत्रामध्ये पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. परंतु, म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी ३० हेक्टर क्षेत्रामध्ये कांदा लागवडीची घट झाली. अलिबाग तालुक्यात काल्रे, खंडाळा, बहिरोळे, वावे, चौल, ढवर, बामणगाव परिसरांत या कांद्याची लागवड केली जाते. रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने तालुक्यातील पांढऱ्या कांद्याला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे जिल्ह्य़ातील बाजारात चढय़ा दराने याची विक्री केली जाते. भातकापणी झाल्यानंतर तात्काळ कांद्याची लागवड केली जाते. अक्टोबर ते जानेवारी हा लागवडीचा कालावधी असतो. साधारणपणे फेब्रुवारीच्या सुरुवातीला कांदा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मे अखेपर्यंत हा कांदा बाजारात विकला जातो. दर्जेदार कांद्याला किलोमागे ७५ रुपयांपर्यंतचा दरही मिळतो. त्यामुळे अलिबाग परिसरातील शेतकरी भातशेतीनंतरचे दुबार पीक म्हणून कांद्याची मोठय़ा प्रमाणात लागवड करत असतात.
कांद्याची लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक केली जाते. मात्र पर्जन्यमान घटल्याने जमिनीत पिकासाठी उपयुक्त ठरेल अशी आर्द्रता दिसून आली नाही. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील शेतकरी कांदा लागवडीपासून दुर राहिले. मात्र पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन या वर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले होते. कांदा लागवडीसाठी वाफा आणि मल्चिंग पद्धतीचा वापर करण्याची सूचना करण्यात आली होती. याशिवाय पाणी पुरवठय़ासाठी सेंद्रिय खत, दर्जेदार बियाणे, ठिबक सिंचन आणि स्पिं्रक्लर पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. याचा पांढऱ्या कांद्याच्या उत्पादनावर चांगला परिणाम झाल्याचे आता समोर आले आहे. शेतकऱ्यांनी एकरी चोवीस टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. बाजारात कांद्याची एक माळ १०० ते १५० रुपयेपर्यंत विकली जात असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत झाली आहे.
अलिबागचा पांढरा कांदा शेतकऱ्यांसाठी वरदान
कोकणात घटलेल्या पर्जन्यमानाचा फटका खरीप हंगामावर फारसा झाला नसला तरी रब्बी हंगामावर याचा परिणाम दिसून आला.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 31-03-2016 at 00:58 IST
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alibaug white onion a boon to farmers