प्रत्येकाच्या घरी फुलकोबीची भाजी शिजवली जाते. खाण्याचे प्रमाण कमी-अधिक असेल, भाज्यात बदल म्हणून ही भाजी खाल्लीच जाते. ती आरोग्याच्या दृष्टीने अतिशय हितकारक असून व्हिटॅमिन बी व सीचे प्रमाण अधिक आहे. वजन कमी करण्यासाठी आणि मधुमेह झालेल्यांसाठी ही भाजी हितकारक आहे.
आलू गोबी, गोबी मंच्युरियन याचे तरुणांना चांगलेच आकर्षण असते. जगभरात इटलीत कोबीचे उत्पादन १६००व्या शतकात घेतले जाऊ लागले. त्यानंतर फ्रान्स व नंतर आशिया खंडात याची सुरुवात झाली. आपल्या देशात पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, आसाम, हरयाणा, महाराष्ट्र या प्रांतांत फुलकोबीचे उत्पादन घेतले जाते. रब्बी हंगामात अधिक उत्पादन घेतले जात असून देशातील सरासरी उत्पादकता १८.३ टन आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ५३ हजार हेक्टरवर ही भाजी पिकवली जाते व उत्पादकता २९.३ टन इतकी आहे.
वास्तविक ही भाजी तिन्हीही हंगामात घेता येते. याच्या उत्पादनासाठी जमीन चांगल्या प्रतीची लागते. शिवाय जमिनीचा पीएच ५.५ ते ६ असावा लागतो. काही ठिकाणी शेतकरी लागवड करताना मिल्चगचा वापर करतात. जमिनीतील उष्णतेमुळे आतील किटाणू मरतात हा त्यामागील दृष्टिकोन आहे. साधारणपणे मे, जून किंवा जुल, ऑगस्ट किंवा सप्टेंबर, ऑक्टोबर अशा महिन्यांत कोबीची लागवड केली जाते. काही वाण लवकर, तर काही वाण उशिरा येतात. लवकर येणाऱ्या वाणात दोन रोपांतील अंतर ४५ सेंमी, तर उशिरा येणाऱ्या वाणात ६० सेंमीचे अंतर ठेवले जाते. रोपांना ठिबक सिंचनने पाणी देणे उत्तम. सरासरी २५ टन उत्पादन होते. १० रुपयांपासून ७० ते ८० रुपयांपर्यंत किलोला भाव मिळतो. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा व नेहमी चांगला बाजारभाव मिळणारा हा भाजीपाला आहे.
लातूर तालुक्यातील भुईसमुद्रा या गावातील अमोल रामचंद्र वाघमारे हा २६ वर्षांचा तरुण गेल्या सात वर्षांपासून शेती करत असून, आतापर्यंत त्यांच्याकडे वर्षांत तीन पिके घेतली जातात. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या अमोलने दहावीनंतर दोन वष्रे खासगी नोकरी केली आणि त्यानंतर अत्याधुनिक पद्धतीने शेती करण्याचा पर्याय निवडला. घरची चार एकर जमीन, दोन भाऊ, आई-वडील हा सर्व डोलारा शेती उत्पादनावर चालवावा लागत असल्यामुळे कायमच हाता-तोंडाची गाठ पडण्यास अडचण यायची. उडीद, तूर, सोयाबीन, मूग अशा पारंपरिक पिकांमुळे उत्पन्न बेताचे राहू लागले. अमोलने तत्कालीन कृषी अधिकारी रविकिरण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलकोबीची शेती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी १० ग्रॅम बियातून ३ हजार रोपे तयार केली व तीन गुंठे जमिनीत लागवड केली. ३ टन उत्पादन मिळाले व खर्च वजा जाता १६ हजार रुपये शिल्लक राहिले. त्यानंतर अमोलने दोन एकरांवर लागवड केली. उत्पादनात वाढ होत असल्यामुळे २०१४ मध्ये त्याने सर्व चार एकर जमिनीवर फुलकोबीची शेती केली. एकरी ४४ हजार रुपये उत्पादनाचा खर्च लागला व प्रति एकर ४ लाख रुपये त्याला निव्वळ नफा राहिला. अमोलची जमीन गावालगत आहे. २०१५ साली पाण्याची अडचण होती. २५ गुंठे कोबी, २५ गुंठे शेपू व २५ गुंठे कोिथबीर असे उत्पादन घेत त्याने ४ लाखांचा नफा कमावला.
अमोलचे सर्व कुटुंबीय दररोज शेतात तीन ते चार तास काम करतात. याशिवाय चौघांना रोजचा रोजगार ठरलेला आहे. राज्यात सर्वाधिक फुलकोबीला मागणी लातूर बाजारपेठेत आहे व स्थानिक बाजारपेठेतच आपला माल चढय़ा भावाने विकला जातो. लातूरच्या बाजारपेठेत बारामती, सोलापूर, पुणे या भागांतून भाजी येते. त्यामुळे या बाजारपेठेत राज्यातील सर्वाधिक भाव मिळतो, असे अमोलचे म्हणणे आहे. बाजारपेठेचा अभ्यास करून भाजीपाल्याची शेती केली पाहिजे. बाजारपेठेची मागणी वेगळी अन् आपले उत्पादन वेगळे असेल तर शेती परवडत नाही. राज्यात सर्वच ठिकाणी फुलकोबीला चांगला भाव मिळतो. हा भाव वर्षभर उत्पादकाला परवडेल असा असल्यामुळे ही शेती लाभदायक असल्याचे अमोलचे म्हणणे आहे.
फुलकोबीने अमोलच्या आयुष्यात आत्मविश्वास निर्माण केला असून आता परिसरातील शेतकरी शेतीला लागणारे भांडवल, पाणी आम्ही देऊ, तुम्ही आमची शेती कसा अशी विनवणी त्याच्याकडे करत आहेत. तोही आता आपल्या क्षमता वाढवण्याच्या तयारीला लागला असून यावर्षी आणखीन दहा एकरवर भाजीपाला घेण्याची तयारी करतो आहे. कमी पाण्यात शेती करता येते. आपल्या शेतीत रोज ३ हजार लिटर पाणी देता येईल इतकेच पाणी सध्या आहे. पाण्याचा अंदाज घेऊन शेती करत असल्यामुळे ती आपल्याला फायदेशीर ठरत असल्याचे त्याचे म्हणणे आहे.
पाला खत म्हणून उपयुक्त
देशभरात साधारणपणे रब्बी हंगामात फुलकोबी घेतली जाते, मात्र अमोलने गेल्या सात वर्षांत सर्वच हंगामांत फुलकोबीचे उत्पादन घेतले आहे. अर्थात, कोणत्या हंगामात कोणते बियाणे वापरावे याचे ठोकताळे ठरले आहेत. हा ठोकताळा बिघडला तर त्याचा परिणाम उत्पादनावर होतो. खरीप हंगामात बिजू शीतल (दीपा), गोल्डन (रिमझिम), सनग्रो (१११). हिवाळी हंगामात सनग्रो (७२६), सिझेंटा (टेट्रेस), टोकेमा (पिझोमा). उन्हाळी हंगामात सनग्रो (११०) व वेलकम या व्हरायटी घेतल्या जातात. दोन ते अडीच महिन्यांत हे पीक निघते. अळी व बुरशीचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे जागरूकतेने फवारण्या कराव्या लागतात. डीएपी, युरिया अशा खतांचा डोस द्यावा लागतो. झाडाला रोज १ लिटर पाणी द्यावे लागते. फुलकोबी काढणीला आल्यानंतर एका गड्डय़ाला किमान ३ किलो पाला निघतो. हा पाला शेतातच कुजवला तर तो खत म्हणून अतिशय उपयोगी ठरतो.
pradeepnanandkar@gmail.com