लातूरजवळील कोळपा गावातील सोमनाथ अंबेकर या शेतकऱ्याने प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्टाच्या जोरावर हायटेक रोपवाटिका साकारली असून टोमॅटो, मिरची, वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, झेंडू, टरबूज, खरबूज, पपई, शेवगा, ऊस यांची रोपे तयार करण्यात येतात.
लातूरजवळील कोळपा गावातील सोमनाथ अंबेकर (वय ४५) या दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या शेतकऱ्याने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर शेतीत केलेली प्रगती डोळे दिपवून टाकणारी आहे.
सोमनाथने सातवीपर्यंतचे शिक्षण गावी घेतले व दहावी लातूरच्या व्यंकटेश विद्यालयातून तो उत्तीर्ण झाला. घरची साडेपाच एकर जमीन. लातूर -नांदेड रस्त्याच्या कडेला त्याची शेती आहे. दहावीनंतर तो वडिलांना शेतीत मदत करू लागला. खोडकर स्वभावामुळे त्याला वडिलांचा मार खावा लागायचा. बाहेर जाऊन काहीतरी करावे असा विचार त्याच्या मनात होता. त्यामुळे एका ट्रकचालकाच्या मदतीने सोमनाथ पुण्याला गेला.
प्रारंभी ट्रकवर क्लीनर व नंतर ड्रायव्हर म्हणून त्याने तब्बल १८ वष्रे काम केले. दोन वर्षांनी घरी येऊन वडिलांची भेटही घेतली. १५०० रुपयांपासून ७ हजार रुपयांपर्यंत सोमनाथचा पगार टप्प्याटप्प्याने वाढला. पुणे येथील कुंजीरवाडी गावातील ज्ञानेश्वर बापूराव कुंजीर यांच्याकडे तो कामाला होता. १९९९ साली लग्न झाले. २००४ साली वडील वारल्यानंतर सोमनाथ गावाकडे आला. घराची जबाबदारी स्वत:कडे घेण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. ट्रकमालक कुंजीर हे सोमनाथच्या गावी आले. त्यांच्याकडे सोमनाथचे पगारातील सुमारे ३ लाख रुपये जमा होते. स्वत:चे २ लाख घालून त्याला ५ लाख रुपये कुंजीर यांनी दिले. सोमनाथने घराची डागडुजी केली. शेतीत एक िवधन विहीर घेतली व त्याने शेती कसायला सुरुवात केली.
२००७ साली त्याने दीड एकर टोमॅटो घेतला. त्याला पाणी कमी पडले. शेजारच्या फिरोज मनियार यांनी आपल्या विहिरीचे पाणी दिले. त्या वेळी नशिबाने सोमनाथला साथ दिली. चांगला भाव मिळाला. दीड एकरात तब्बल १४ लाख रुपये मिळाले. त्यातून सोमनाथचा आत्मविश्वास वाढला. बँक ऑफ महाराष्ट्राचे तत्कालीन व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी यांनी टोमॅटो पाहिला व सोमनाथची भेट घेतली. त्याला सांगितले, तू अत्याधुनिक शेती कर, तुला लागेल ती मदत आम्ही देऊ. सोमनाथच्या टोमॅटोची प्रसिद्धी कृषी विभागापर्यंत पोहोचली. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे हे सोमनाथच्या शेतावर गेले. कोणी अधिकारी शेतावर आल्याचे कळल्यानंतर सोमनाथ शेतात पोहोचला. तुकाराम मोटे यांनी अत्याधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल याचे मार्गदर्शन केले. आठवडय़ातून दोन वेळा तुला कोणी ना कोणी भेटून मार्गदर्शन करेल असे सांगितले व त्यानंतर २० गुंठय़ांचे शेडनेट, १० गुंठय़ांचे पॉलीहाऊस व १ गुंठय़ाचे पॅकहाऊस बँक ऑफ महाराष्ट्राकडून ४० लाख रुपयांचे कर्ज घेऊन उभे केले.
ठिबक, तुषार सिंचन, एसटीपी अशी अत्याधुनिक व्यवस्था उभी केली. शेडनेटमध्ये रोपवाटिका सुरू करण्याचे निश्चित झाले. वेळोवेळी कृषी अधिकारी मदतीला होतेच. टोमॅटो, मिरची, वांगी, पत्ताकोबी, फ्लॉवर, झेंडू, टरबूज, खरबूज, पपई, शेवगा, ऊस यांची रोपे तयार करून त्यांची विक्री सुरू झाली. गेल्या सहा वर्षांत किमान ५ हजार शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार रोपे पुरवली गेली. दर महिन्याला १० लाख रोपे तयार करण्याची क्षमता सोमनाथने सिद्ध करून दाखवली. जिल्ह्य़ात सध्या ६० ते ७० रोपवाटिका आहेत. यात अतिशय विश्वासार्ह रोपवाटिका म्हणून सोमनाथच्या सत्यम शिवम् नर्सरीने आपले नाव सार्थ केले. बँक ऑफ महाराष्ट्राचे घेतलेले ४० लाख रुपयांचे कर्ज त्याने पूर्ण फेडले.
यावर्षी पाणीटंचाई असल्यामुळे सोमनाथला अडचण झाली. भविष्यात ही अडचण दूर व्हावी यासाठी त्याने शेततळे उभे केले आहे. आता नव्याने २० गुंठय़ांचे पॉलीहाऊस व २० गुंठय़ांचे शेडनेट उभे करण्याचे काम सुरू आहे. नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड व कर्नाटकातील बीदर, गुलबर्गा जिल्हय़ातून शेतकरी रोपे खरेदीसाठी येतात. सोमनाथच्या शेतात १५ मजुरांना बारा महिने काम आहे. यावर्षी पाणीटंचाई असली तरी चार महिने त्यांना बसून पगार देण्यात आला. साधारणपणे शेतकऱ्यांना इतर शेतकरी काय करतात हे पाहून त्याचे अनुकरण करण्याची सवय असते. सर्वच शेतकरी एकाच वेळी एकच वाण उत्पादन करत असल्यामुळे बाजारपेठेत उत्पादन अधिक व मागणी कमी अशी अवस्था निर्माण होते व त्यातूनच शेती परवडेनाशी होते. बाजारपेठेचा अंदाज घेत शेतीतील वाण बदलत शेती केली पाहिजे. शेतीतील पिकांकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. रोगराई, कीड, पाण्याचे नियोजन, खुरपणे याबाबतीत जागरूक असायला हवे. ठिबक व तुषारशिवाय शेती करणे परवडत नाही. रासायनिक खताचा वापर कमी करून गावरान खते, गांडूळ खते याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सोमनाथचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांत सर्व खर्च वजा जाता केवळ साडेपाच एकर जमिनीत वर्षांला १० ते १२ लाखांचे उत्पादन मिळते. सोमनाथचा धाकटा भाऊ सिद्धेश्वर सोमनाथला शेतीत मदत करतो. दोघे भाऊ एकत्रपणे ही शेती करतात. आतापर्यंत सोमनाथला विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २०१५ साली राज्य शासनातर्फे दिला जाणारा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार त्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत देण्यात आला. याशिवाय अनेक पुरस्कारही त्याला मिळाले आहेत. पुरस्कारामुळे हुरळून न जाता आपल्याकडे मोठय़ा अपेक्षेने लोक पाहात आहेत तेव्हा आपले काम अधिक गुणवत्तेने झाले पाहिजे याकडे सोमनाथ लक्ष देतो. आता त्याने लातुरात घर विकत घेतले असून भावाची दोन मुले व स्वत:ची दोन मुले लातुरात चांगले शिक्षण घेत असल्याचे त्याने सांगितले.
रोपवाटिकेचा व्यवसाय हा किमान कृषी पदवीधर असलेल्या शेतकऱ्यालाच करता येत असावा असा सर्वसाधारण समज लोक करून घेतात, मात्र शिक्षणापेक्षा अनुभव, आत्मविश्वास, परिश्रम करण्याची जिद्द ही अधिक महत्त्वाची आहे व हे गुण विकसित करता येतात हे सोमनाथने दाखवून दिले आहे. आजूबाजूच्या परिसरातील शेतीक्षेत्रातील मंडळी सोमनाथने उभ्या केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी त्याच्या शेतीला भेट देतात. लोक विश्वासाने आपल्याकडे येतात. दोन पसे कमी मिळाले तरी चालतील, मात्र त्यांच्या विश्वासाला बाधा पोहोचेल असे आपल्याकडून काही घडणार नाही याची आपण सतत काळजी घेत असतो, असे सोमनाथने सांगितले.
pradeepnanandkar@gmail.com