रायगड जिल्ह्यत कृषी विभागामार्फत प्रमाणित बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत या वर्षी साडेचार हजार क्विंटल भात बियाण्यांचे उत्पादन घेतले जाणार आहे. महाबीजच्या माध्यमातून हे बियाणे पुढील वर्षी जिल्ह्यत विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यत दरवर्षी १ लाख २४ हजार हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते. खरीप हंगामातील या लागवडीसाठी दरवर्षी १७ हजार क्विंटल बियाणांची गरज भासते. यातील ११ हजार क्विंटल बियाणे हे महाबीजमार्फत उपलब्ध करून दिले जाते. पण महाबीजमार्फत उपलब्ध होणारे बियाणे हे जिल्ह्यबाहेरून आणले जाते. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत या वर्षी प्रमाणित बियाणे उत्पादन कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्ह्यत लागणारे बियाणे जिल्ह्यतच उत्पादित केले जावे आणि त्यातून शेतकऱ्यांच्या मालाला उठाव व चांगला दर मिळावा हा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश आहे.
जिल्ह्यतील ६०० एकर परिसरात हे बियाणे उत्पादन केले जाणार आहे. दापोली विद्यापीठाच्या भात संशोधन केंद्राने तयार केलेल्या कर्जत ३, कर्जत ५ आणि कर्जत ६ या तीन वाणांचे बियाणे तयार केले जाणार आहे. बीज प्रमाणीकरणासाठी एकरी २१० खर्च येतो. हा खर्च कृषी विभागाकडून केला जाणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेले बियाणे महाबीज १३५० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करणार आहे.
जिल्ह्यत लागणारे बियाणे हे इथेच उत्पादित व्हावे आणि ते शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केले जावे हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे रायगडचे कृषी अधीक्षक के. व्ही. तरकसे यांनी सांगितले. या वर्षी जरी महाबीजच्या मदतीने प्रमाणित बियाणे उत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला असला तरी आगामी काळात शेतकरी उत्पादन कंपन्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम राबविला जाईल. ज्यामुळे बाजारात बीज उत्पादन कंपन्यांना मिळणारा फायदाही शेतकऱ्यांना या कंपन्यांच्या माध्यमातून होऊ शकेल. लोणेरे आणि कोंडिवते येथील केंद्रातून बीज प्रमाणीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे.
meharshad07@gmail.com