राजकीय नेते, पर्यावरणवादी, शास्त्रज्ञ यांच्यात कपाशीच्या या जातीबद्दल वाद होते. काही कट्टर समर्थक तर काही कट्टर विरोधक. २००२ सालापासून सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाही. आता त्यात नागपूरच्या मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी उडी घेतली आहे. एक तपाहूनही अधिक काळानंतर जनुकबदल बियाणांपेक्षा कपाशीचे देशी वाणच चांगले असा दावा तर केलाच, पण संस्था आता पुन्हा एकदा या वाणांचे विकसित केलेले बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत आहे. तब्बल ५० वर्षांनंतरचे देशी वाणाचे पुनरागमन हे पुन्हा एकदा वादग्रस्त ठरत आहे.

जन्मापासून जात चिटकते ती जात नाही. हे केवळ माणसांमध्येच नाही, तर पिकांमध्येही आहे. काही वर्षांपूर्वी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कोएम २६५ या ऊसाच्या जातीवरून असाच वाद रंगला. साखर कारखान्यांनी कमी उतारा म्हणून तिला नाकारले. पण जास्त उत्पादन देणारी म्हणून शेतकऱ्यांनी स्वीकारले. कापसाच्याही बीटी वाणाचे तसेच आहे. राजकीय नेते, पर्यावरणवादी, शात्रज्ञ यांच्यात कपाशीच्या या जातीबद्दल वाद होते. काही कट्टर समर्थक तर काही कट्टर विरोधक. २००२ सालापासून सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नाही. आता त्यात नागपूरच्या मध्यवर्ती कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. केशव क्रांती यांनी उडी घेतली आहे. एक तपाहूनही अधिक काळानंतर जनुकबदल बियांणापेक्षा कपाशीचे देशी वाणच चांगले असा दावा तर केलाच, पण संस्था आता पुन्हा एकदा या वाणांचे विकसित केलेले बियाणे शेतकऱ्यांना लागवडीसाठी देत आहे. तब्बल ५० वर्षांनंतरचे देशी वाणाचे पुनरागमन हे पुन्हा एकदा चांगले वादग्रस्त ठरत आहे.

मॉन्सेन्टो या बहुराष्ट्रीय कंपनीने जनुकबदल पद्धतीने कपाशीचे बियाणे विकसित केले. जगभर पर्यावरणवाद्यांनी त्याला विरोध केला. समर्थक व विरोधक या तंत्रज्ञानाच्या नशिबी पहिल्यापासून आले. १९९८ मध्ये महिकोने मॉन्सेन्टोचे तंत्रज्ञान देशात आणल्यानंतर मोठे वादळ उठले. आधी बाहेरून विष मारत होता आता पिकांच्या आतून विष तयार करता का, असा सवाल पर्यावरणवाद्यांनी केला. २००२ साली शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणे दिल्यानंतर कर्नाटकातील रयत सेवा संघाचे नज्जुदास्वामी यांनी आंदोलन करीत कपाशीची लावलेली झाडे उपटून टाकायला सुरुवात केली. शेतकरी संघटनेचे नेते कै. शरद जोशी यांनी त्यावेळी पर्यावरणवाद्यांची घुबडे म्हणून संभावणा केली. तंत्रज्ञानाचा हक्क मान्य करण्याचा आग्रह त्यांनी धरला. जनुकबदल बियाणाच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेने जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने केली. हे तंत्रज्ञान सोप्या भाषेत शेतकऱ्यांपर्यंत नेऊन घालण्याचे काम त्यांनी केले. आज पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था जनुकबदल तंत्रज्ञानाला विरोध करीत आहेत. पर्यावरणवादी पुष्पामित्र भार्गव, कविता कुरकट्टी हे न्यायालयात तसेच रस्त्यावरची लढाई करीत आहेत. त्यांना जोशी यांच्याच तालमीत तयार झालेले अजित नरदे, गोिवद जोशी, गिरीधर पाटील, कालिदास आपेट तसेच स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी व शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील हे समर्थन करीत आहेत. परदेशात राऊंडअपरेडी बीटी कॉटन आले. त्याच्या चाचण्यांना विरोध झाला. कपाशीच्या पिकात राऊंडअप हे तणनाशक मारले तर पीक नष्ट होते. पण जनुकबदल कपाशीत राऊंडअप हे तणनाशक मारले तर तण नष्ट होते. कपाशीला काहीही होत नाही. विरोधामुळे अद्याप त्याला परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र गुजरातमध्ये काही शेतकऱ्यांनी तस्करी करून हे बियाणे आणले आहे. आज देशात कपाशीच्या पिकाखालील ९८ टक्के क्षेत्र हे जनुकबदल बियाणांचे आहे. तर केवळ २ टक्के देशी कापूस आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक व गुजरात ही कापूस उत्पादक राज्ये आहेत. विदर्भ, मराठवाडय़ात कापसाचे पीक घेतले जाते. तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठय़ा प्रमाणात होतात. या आत्महत्येला बीटी कापूस जबाबदार असल्याचा आरोप वारंवार केला जातो. ऑक्सफर्ड विद्यापीठातील काही तज्ज्ञांनी बीटी कापसामुळे फारसा उपयोग झाला नसल्याचे स्पष्ट केले. जगातील अनेक संस्था या अनुकूल-प्रतिकूल अशा पद्धतीची मते नोंदवत असतात. पण आता देशातील आघाडीचे कापूस पिकातील शात्रज्ञ डॉ. क्रांती यांनी रोखठोक मते मांडली. तसेच झालेल्या चुकांची कबुली दिली. त्याकरिता जगातील आकडेवारी मांडली. त्यांनी काढलेले अनेक निष्कर्ष वादग्रस्त ठरले आहेत. असे असले तरी केंद्र व राज्य सरकार त्यांच्या पाठीशी आहे.

कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बीटी कपाशीने गुजरातचे पीक संपविले आता राज्यात तो धुमाकूळ घालू देणार नाही असे जाहीर केले. तरी देखील खासगी कंपन्यांनी बीटी बियाणांचे वाण आणण्याचे काम  थांबविलेले नाही. आत्तापर्यंत कपाशीच्या १ हजार बीटी वाणांना परवानगी दिली. या वर्षी देखील राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये सुमारे पन्नासहून अधिक वाण चाचण्यांसाठी आलेले आहे. काही वाणांना परवानगीही देण्यात आली आहे. पण आता नागपूरच्या संस्थेने ८ देशीवाण विकसित केले आहे. विदर्भात त्याची लागवड वाढत आहे. त्याचे पुनरागमन पुन्हा वादग्रस्त बनले आहे.

नागपूरच्या संस्थेने बिकानेरीनरमा हा बीटी वाण विकसित केला होता. एक वर्ष लागवड झाल्यानंतर तो परत घ्यावा लागला. १९६०च्या दशकात संकरीत कापूस आला. त्यापूर्वी देशीवाणावरच संशोधन सुरू होते. या वाणाची लागवड शेतकरी करीत, पण बोंडआळीमुळे त्याची उत्पादकता अत्यल्प होती. पुढे ४० वष्रे सरकारी संशोधन संस्थेतून संकरीत कापसाच्या जाती संशोधित केल्या. किडीमुळे शेतकरी त्यावेळी त्रस्त झाला होता. बीटी कापूस आल्यानंतर शेतकरी सुखी झाला. रस शोषणाऱ्या किडी अन्य पिकांत आहेत. कृषी विद्यापीठांनी तसेच संशोधन संस्थांनी १०० वर्षे देशी व संकरीत कापसावर काम केले. पण त्याला शेतकऱ्यांनी साथ केली नाही. आत्तादेखील देशीवाण चांगला असेल तर तो शेतकरी स्वीकारतील पण देशीवाणासाठी बीटीबंदीला मात्र विरोध आहे. त्यातूनच आता कापूसकोंडय़ाची नवी कहाणी जो तो आपल्या पद्धतीने रंगवतोय.

देशी कापूस हा आखूड धाग्याचा व जाडाभरडा असतो. तो मुलायम नसतो, जागतिक बाजारपेठेत त्याला मागणी नसते, त्यावर रोग येत नाहीत, पण बोंडआळी पडते, उत्पादकता कमी आहे, मांजरपाट कापड तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो, आता लिननसारखी वस्त्रे तयार करायला तो उपयोगी पडत नाही, त्याचा कालावधीही फार कमी नाही त्यामुळे त्याला काहींचा विरोध आहे. मात्र डॉ. क्रांती हे मुद्दे खोडून काढत आहेत.

गेल्या काही वर्षांत विविध पिकांच्या जाती संशोधन संस्थांमध्ये तयार झाल्या. मात्र त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. ज्या आवडल्या त्याच पेरल्या. त्यामुळे गोमटीफळे देणाऱ्या शुद्ध बिजाचा तो नेहमी पुरस्कार करतो. वाद आणि विरोधाची घुसळण होईल पण शिवारातील अनुभवच देशीवाणाच्या पुनरागमनाचा कौल ठरवणार आहे.

बीटी वाणालाच समर्थन

बीटी कपाशीवर बोंडआळीचा प्रादुर्भाव होत नसला तरी मावा, तुडतुडे, फुलकिडे या रसशोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे विषाचा वापर करावा लागतो. त्यावरील खर्च वाढतो. आता तर पांढऱ्या माशीने या पिकाला जेरीस आणले आहे. २००३-०४ मध्ये कपाशीच्या पिकावर पांढरी माशी आली. त्यामुळे बोंडगळ होते. ही माशी पाकिस्तानातून सरहद्दीवरील राजस्थान व पंजाबमध्ये आली. तिने आता सर्व देश व्यापून टाकला आहे. बीटी कपाशीला रासायनिक खते जास्त लागतात. जास्त कालावधी लागत असल्याने एकच पीक मिळते. पावसाचा ताण तसेच हवामानातील बदलालाही ती प्रतिसाद देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी देशीवाणाकडे जावे असा आग्रह धरला जात आहे. मात्र शेतकरी संघटनेचे अजित नरदे यांच्या नेतृत्वाखाली बीटी समर्थक मंचाने डॉ. क्रांती यांचे मुद्दे खोडून काढले आहेत.

Ashok tupe@expressindia.com