कोकणच्या लाल मातीत पाणी पटकन वाहून जाते. त्यामुळे येथे ठिबक तंत्रज्ञानाचा उपयोग होत नाही, असा समज शेतकऱ्यांमध्ये रूढ होऊ लागला आहे. पण बागायती पिकांप्रमाणेच भाजीपाला लागवडीतही हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरवण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांचे अथक संशोधन सुरू होते. प्लास्टिक आच्छादनातील ठिबक सिंचनाच्या नव्या पद्धतीने ही उपयुक्तता सिद्ध झाली आहे. गेली अनेक वष्रे दापोलीतील प्रक्षेत्रावर याचे यशस्वी प्रयोग घेण्यात येत असून तो आता नवा नियम होण्याच्या वाटेवर आहे. कोकणच्या लाल मातीत पाण्याचा वेगाने निचरा होतो. येथे तीन मीटर पाऊस पडतो, पण फेब्रुवारी-मार्चनंतर पाण्यासाठी दाही दिशा होते. एका बाजूला बाष्पीभवन आणि दुसऱ्या बाजूला पाण्याच्या थेंबांची जमिनीत वेगाने खाली जाण्याची प्रवृत्ती यामुळे जलसिंचनाच्या पद्धतींबाबतही मर्यादा येतात, साहजिकच रब्बी हंगामातील भाजीपाला पिकांसाठी अजूनही पाट पद्धतच येथे वापरली जाते. यामध्ये पाणी मोठय़ा प्रमाणावर वाया जाते आणि रोगराईचा धोकाही वाढतो. यामुळे पाणी उपलब्धता आहे, तेथे शेतकरी पिकांवरील रोगराईने त्रस्त आणि जेथे पाट वाहण्याएवढे पाणी नाही, तेथे शेती सुस्त, अशी परिस्थिती कोकणात सर्वत्र आढळते.

अर्थात काळ्या लॅटरल पाइपने सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊ लागली आहे. त्यातूनच आंबा, काजू, नारळ, केळी अशा बागायती पिकांमध्ये काळ्या लॅटरल पाइपचा वापर करून सूक्ष्म तुषार आणि ठिबक पद्धतीचा अवलंब वाढू लागला आहे. पण भाजीपाला शेतकरी मात्र खर्चीक बाब म्हणून या जलसिंचन व्यवस्थेकडे काणाडोळा करताना दिसतात. याच त्रुटी लक्षात घेऊन दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी गेली अनेक वष्रे काटेकोर शेती पद्धतीचा अवलंब करून आता नवे जलसिंचन तंत्रज्ञान विकसित केले आहे.

कोणतीही शेती करताना जमिनीची वाफसा परिस्थिती येणे महत्त्वाचे असते. यामध्ये सर्वसाधारणपणे माती, पाणी आणि हवा यांचे प्रमाण ५०:२५:२५ असायला हवे. लाल मातीचा गुणधर्म पाहता ही परिस्थिती निर्माण करण्यात खूप अडथळे येतात. पाटाच्या पाण्याने वाफसा आणणे, शक्य होत असले तरी त्यातून तोटेच जास्त होतात. या अडचणींतून निर्माण झाले प्लास्टिक मिल्चगचे तंत्रज्ञान. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे २५ मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक जमीन आच्छादनासाठी वापरले जाऊ लागले. यामुळे पाणी बाष्पीभवनाच्या क्रियेला मज्जाव झाला. अर्थात जमीन तापल्यामुळे निर्माण होणारे बाष्प प्लास्टिक खाली अडल्याने जमिनीत कायम वाफसा स्थिती राहण्यास मदत होऊ लागली. त्यातच पाटाच्या पद्धतीत होणारा तणांचा प्रादुर्भावही रोखला गेला. प्लास्टिक मिल्चगचा असा दुहेरी फायदा दिसून आलाच. पण तिसरा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे बाष्पीभवन रोखल्याने पिकांची कमी झालेली पाण्याची गरज.

मुळात ठिबक पद्धतीचा वापर करताना एका वाफ्यावर रोपांच्या दोन ओळी लावून प्रत्येक ओळीसाठी एक पाइपलाइन टाकण्याचे निकष आहेत. त्यामुळे एका वाफ्यासाठी १२ किंवा १६ मिलीमीटर गोलाईच्या दोन लंटरल पाइपलाइन वापरल्या जातात. हा पाइपलाइनवरील खर्च कोकणातील शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर राहतो. हे लक्षात घेऊन एक मीटर रुंद वाफ्यावर एका लॅटरलद्वारे दोन ओळी भिजवण्याचे प्रयोग कोकण कृषी विद्यापीठातील जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागाने हाती घेतले. यामध्ये सर्वप्रथम जमिनीत पाण्याचा थेंब पडल्यानंतर लाल माती कशी भिजत जाते, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावरून एक थेंब पडत राहिल्यास जमिनीचा पृष्ठभाग केषाकर्षण पद्धतीने दोन्ही बाजूला तीस सेंटीमीटपर्यंत भिजत असल्याचे निष्कर्ष पुढे आले. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर जलसिंचन आणि निचरा अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. उत्तम कदम यांनी डॉ. महानंद माने, प्रा. सुनील पाटील यांच्या साथीने हे निष्कर्ष प्रत्यक्ष आजमावण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून कोकणात किलगड लागवडीला चालना मिळाली आहे. जेथे पाणी मुबलक तेथेच किलगड होऊ शकतो, अशीच कल्पना रूढ झाली आहे. पण डॉ. उत्तम कदम यांच्या मार्गदर्शनाखालील शास्त्रज्ञांनी या संकल्पनेत सुधारणा केली आहे. त्यांनी पाटावर पिकवले जाणारे हे पीक आता ठिबकवर यशस्वीपणे घेऊन दाखवले. एक मीटर रुंदीच्या वाफ्यावर २५ मायक्रॉन जाडीच्या प्लास्टिकचे आच्छादन करण्यात येते. यासाठी ११० दिवसांच्या कालावधीचे नामधारी वाण लागवडीसाठी शिफारस करण्यात येते. एका वाफ्यावर ५० सेंटीमीटर बाय दोन मीटर अंतरावर किलगडाच्या रोपांची लागवड केली जाते. त्यात १६ मिलिमीटरच्या लॅटरलवर लावलेल्या एकाच ठिबक विसर्गाद्वारे दोन आळ्यांतील रोपांना पाण्याची सोय होते. चार लिटर प्रति तास या दाबाने हंगामात प्रत्येक वेलीला १६८ लिटर पाण्याची गरज लागते. यासाठी १००:५०:५० या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशची विद्राव्य खते प्रतिहेक्टरी एक किलो अशी देण्यात येतात. त्यातून प्रतिहेक्टरी २६ टन किलगड पिकवता येऊ शकतात, असा निष्कर्ष पुढे आला आहे.

rajgopal.mayekar@gmail.com

Story img Loader