क्षारपड जमिनीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. विशेषत: कृष्णा, पंचगंगा काठची दीड लाख एकराहून अधिक काळीभोर शेती विनापीक बनली आहे. उत्पादनाचा अति हव्यास आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने ही दुर्दशा उद्भवली आहे. अज्ञान आणि मोह शेतकऱ्याला कसा अडचणीत आणतो याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण म्हणता येईल. मीठ फुटलेल्या जमिनीची समस्या भीषण रूपात पुढे येत आहे. याला शेतकरी दोषी असला तरी अन्य कारणांचा विळखा पडला आहे.
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय. ऊस एके ऊस उत्पादन घेतल्यामुळे जमिनीची जी माती झाली आहे, ती पाहायला गेले की पांढरीवर प्रेम करणाऱ्या कोणालाही यातना झाल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळची काळीभोर शेती. थोडं पेरलं की पसाभर देणारी ही काळी आई. आता मात्र ती ओसाड पडली. पीक तरारून येण्यासाठी रासायनिक खताचा अनियंत्रित वापर केल्याने या सुपीक जमिनीची आता माती झाली आहे. अशा ओसाड शेतीला पुनरूप देण्याचे प्रयत्न होत आहेत. यातील एका वेगळ्या वाटेने जाणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यात डॉ. अरुण चौगुले यांचा नामोल्लेख महत्त्वाचा. माणसांच्या या डॉक्टरने जमिनीची ढासळलेली नाडी तपासली अन् तिची प्रकृती ठीकठाक होण्यासाठी दशकभर अथक परिश्रम केले.
क्षारपड जमिनीचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. विशेषत: कृष्णा, पंचगंगा काठची दीड लाख एकराहून अधिक काळीभोर शेती विनापीक बनली आहे. उत्पादनाचा अति हव्यास आणि रासायनिक खतांचा बेसुमार वापर केल्याने ही दुर्दशा उद्भवली आहे. अज्ञान आणि मोह शेतकऱ्याला कसा अडचणीत आणतो याचे हे उदाहरण म्हणता येईल. मीठ फुटलेल्या जमिनीची समस्या भीषण रूपात पुढे येत आहे. याला शेतकरी दोषी असला तरी अन्य कारणांचा विळखा पडला आहे. कृष्णा-पंचगंगा काठी ऊस शेतीमुळे वैभव नांदले. तेथेच आता क्षारपड जमिनीमुळे गोवऱ्या वेचायची सोय उरली नाही. तरीही अशी जमीन पुन्हा लागवडीखाली आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न शेतकरी, शासन, कृषी शास्त्रज्ञ, शेती अभ्यासक, लोकप्रतिनिधी, शेतकरी संघटना, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून होत आहेत. यातील एक बिनीचे नाव म्हणजे डॉ. अरुण पाटील.
हा माणूस वैद्यकीय क्षेत्रातला. शिरोळ तालुक्यातील शिरटी या गावात दवाखाना उत्तम चाललेला. घरच्या शेतीची जबाबदारीही त्यांच्याच खांद्यावर आलेली पण ही खांद्यावरची जबाबदारी डोकेदुखी बनली होती. घरची जमीन नापीक होऊन चालणार नाही याची जाणीव झाल्याने डॉक्टर मातीतील प्रयोगात गुंतले. त्यासाठी त्यांनी गावातील शेतकऱ्यांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला. सामूहिक प्रयत्नातून क्षारपड निर्मूलन करण्याचा त्यांचा प्रयत्न. प्रारंभी या प्रयत्नास अल्पसा प्रतिसाद मिळाला. तरीही त्यांनी एकला चलो रे चा नारा देत काम सुरू ठेवले. एकटय़ा शिरोळ तालुक्यात सुमारे ४० हजार एक जमीन क्षारपडग्रस्त आहे. १९९८ साली डॉक्टरांनी शिरटी गावातील क्षारपड निर्मूलनाचे काम सुरू केले. त्यासाठी सामुदायिक चर योजना राबविण्याचे ठरवले. पुढे या प्रकल्पात १५० शेतकरी सहभागी झाले. पाच किलोमीटरची चर खोदली गेली. ती २० फूट रुंद व ७ फूट खोल होती. ३७५ एकर क्षेत्रासाठी पाच लाख रुपये कर्ज हवे होते. ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मंजूर केले. या योजनेत डॉक्टरांची स्वत:ची चार एकर जमीन क्षारपड होती. जमिनीतून पाझरणारे पाणी जमिनीच्या बाहेर काढल्याशिवाय ती सुधारणार नाही, याची खात्री डॉक्टरांना होती. त्यासाठी सर्वेक्षण केले गेले. अधिकाऱ्यांनी गावच्या पश्चिमेस एक किलोमीटपर्यंत साठणारे सर्वच पाणी काढून टाकण्याची योजना राबविण्याचा सल्ला दिला. त्यासाठी पशांची जुळवाजुळव सुरू झाली. बँकेचे पाच लाख व शेतकऱ्यांची स्वगुंतवणूक २० टक्के यातून काम सुरू झाले. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिटय़ूटचे संजय पाटील व सतेज पाटील यांनी सहकार्य केले. चर पूर्ण झाल्यानंतर पहिल्या वर्षी ९०० मिली पाऊस पडला. गावातील चर जून ते ऑक्टोबर या कालावधीत पूर्ण भरून वाहत होती. जमिनीवरचे व जमिनीतील क्षार आपोआप चरीमध्ये येत होते. पावसामुळे सर्व ३७५ एकर जमीन पावसाच्या स्वच्छ व थोडेही क्षार नसलेल्या पाण्याने धुऊन गेली. ३७५ एकरांपकी १०० एकर पूर्णत: क्षारपड जमीन, १७५ अंशत: क्षारपड होती. पहिल्याच वर्षी पाण्याचा निचरा झाल्यामुळे १०० एकर पाण्याखाली राहणाऱ्या जमिनीत शेतकऱ्यांनी भातपीक घेतले. गावातील शिरटी किसान सेवा सहकारी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेडही केली गेली. ज्या शेतकऱ्यांना क्षारपड जमिनीत पाच हजाराच्यावर उत्पन्न मिळत होते त्यांनी जमीन पूर्णपणे क्षारपडमुक्त होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले.
या प्रयोगात डॉक्टरांनी एक वेगळाच प्रयोग अवलंबिला. जुन्या पन्हाळी खापरीचा वापर करून शेतात ठिकठिकाणी जादा होणारे पाणी खापरीद्वारे बाहेर पाडले. त्यानंतर शेतात दगड गोटय़ांचा प्रयोग केला. त्यामध्ये थोडी वाळू वापरली गेली. त्यामुळे लागवडीला सोपेपणा आला. जमिनीखालून पाणी निघून जाऊ लागले. याच्याबरोबरीने या जमिनीत डॉक्टरांनी शुगरबिटची लागवड करण्याचे ठरविले. शुगरबिटमुळे जमिनीतील क्षार शोषले जाते. खेरीज २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळते. पुण्याच्या व्हीएसआय संस्थेच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. बेल्जियम येथील सिंजेटा कंपनीच्या सात व्हरायटीचे प्रात्यक्षिक प्लॉटमध्ये घेतले. ज्या जमिनीची क्षारता १८ ते २० पर्यंत आहे. अशा जमिनीत कोणत्याच व्हरायटीची उगवण झाली नाही. पण दहा क्षारतापर्यंत प्रमाण असलेल्या जमिनीत सर्व सात जातींची उगवण झाली. एकरी उत्पादन ३० टन मिळाले. बीटपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रयोग त्यांनी केला. २० किलो बीटचे छोटे तुकडे करून ते गोबरगॅस प्लँटमध्ये टाकले असता. ३ घनमीटर गॅस मिळाला. यावरून एका एकरात ३० हजार रुपयांचे बीटचे उत्पन्न मिळते हे त्यांनी सिद्ध केले. बियाणे व इतर खर्च जाता क्षारपड जमिनीत २० हजार रुपये निव्वळ नफा मिळण्याचा चमत्कार झाला.
आता क्षारपड जमिनीत नवे प्रयोग होऊ लागले आहेत. जमिनीखालून तीन फूट खाली कोरस पाइपलाइन टाकली जाते. मुळाखालून पाइपलाइन गेल्याने पाण्याचा पुरवठाही पिकांना होतो. सबसर्फेश ड्रेनेज पद्धतीच्या या वापरासाठी एकरी ४० हजार रुपये खर्च येतो. ८० टक्के रक्कम शासकीय अनुदानातून मिळते. तर २० टक्के रक्कम लाभार्थ्यांनी घालायची आहे. अशा पद्धतीने क्षारपड जमीन सुधारली जात आहे. डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नाइतकीच ही नवी पद्धतही उपयुक्त आहे. मात्र त्याचा अधिकाधिक प्रमाणात वापर होण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्त केली.
दयानंद लिपारे dayanandlipare@gmail.com
क्षारपड जमिनीला पुनर्वैभव प्राप्त होतेय..
अति तेथे माती असे म्हटले जाते. पण मातीतच अति झाले तर करायचे काय? हा चिंतेचा विषय.
Written by दयानंद लिपारे
आणखी वाचा
First published on: 12-05-2016 at 03:15 IST
मराठीतील सर्व लोकशिवार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extensive use of chemical fertilizers harm to farming land