शिकला तो कामातून गेला, असं गावाकडे बोललं जातं. शिकलेला माणूस पुन्हा मातीत हात घालत नाही म्हणून. कोकणात ही परिस्थिती खूपच वाईट आहे. येथे शेतं, गावं ओस पडत चालली आहेत. पण अशा परिस्थितीत कुंभवे गावातील बीए झालेल्या अनिल शिगवण यांनी कुटुंबाच्या साथीने सेंद्रिय शेती आणि पूरक उद्योगाची निर्माण केलेली व्यवस्था सर्वासाठीच आदर्श ठरत आहे.
कोकणातील छोटी गावं, छोटे शेतकरी; पण त्यांच्या ‘आयडीया’ अफाट! येथील शेतकरी अनेक वष्रे सेंद्रिय शेती करताहेत. पण त्याला व्यावसायिक स्वरूप आणण्यात ते नेहमीच मागे राहिले. दापोली तालुक्यातील कुंभवे गावच्या अनिल शिगवण यांनी मात्र घरच्या पारंपरिक सेंद्रिय शेतीला व्यवसायिक रूप देण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच निर्माण झाले शेतीतील एक मॉडेल.
अल्पभूधारक कुटुंबातील अनिल शिगवण स्वतचे आजी-आजोबा, आईवडील यांचे मातीतील कष्ट पाहत आले होते. घरात गावठी गाय-बल होते. त्यांचं शेण शेतीला आणि शेतीतून येणारा भाताचा पेंढा गुरांना हे चक्र वर्षांनुवष्रे चालू होते. घरापुरता भाजीपाला लावणे, एवढेच उद्दिष्ट त्यावेळी असायचे. पण घरातील उदयोन्मुख शेतकरी अनिल शिगवण यांचा विचार वेगळा होता. शेतीचं सेंद्रियपण कायम राखून उत्पादनवाढीच्या पद्धतीचा ते अभ्यास करत राहिले. त्यांच्या द्रष्टेपणाचा दाखला अकरावीलाच मिळाला. गरीब विद्यार्थी म्हणून मिळालेल्या शिष्यवृत्तीच्या बाराशे रुपयातून त्यांनी शेळी आणण्याचा आग्रह धरला. घरच्यांना ते मान्य करावेच लागले. गेली १२ वष्रे शिगवण कुटुंबात त्याच शेळीची वाढवळ सुरू आहे. २००८ दरम्यान बीए पास झाल्यानंतर त्यांनी घरच्या शेतीची सूत्रे हाती घ्यायला सुरुवात केली. घरातील उत्पादनक्षम पशुधन हीच शेतकऱ्यांची खरी श्रीमंती, असा निश्चय करून त्यांनी सर्वप्रथम दुग्धोत्पादनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. त्यासाठी चांगल्या दूध देणाऱ्या म्हशी घेतल्या. दूध विक्रीचा नगदी धंदा सुरू झाला. हळूहळू भाजीपाला लागवड वाढवायलाही सुरुवात केली. घरचे शेण आणि लेंडीखत होतेच. त्यामुळे भाजीपाल्याच्या चवीचा दर्जा वाढून परिसरात मागणी वाढायला लागली. आता ही मागणी पूर्ण करण्याचे नवीन आव्हान समोर येऊन ठेपले होते.
कुटुंबाच्या दोन एकर क्षेत्रापकी अध्र्याहून अधिक जमीन डोंगराळ होती. त्यावर आंबा-काजूची लागवड होती. त्यामुळे क्षेत्रवाढीत अडचणी होत्या. वाढीव क्षेत्र आणि नवे पीक या दोन्हींच्या शोधात अनिल लागले. त्याचवेळी मार्गदर्शक बबन शिगवण यांनी त्यांना किलगड लागवडीचे तंत्र सांगितले आणि हेच पीक फायदेशीर ठरेल, याची त्यांना खात्री पटली.
कोकणात अनेक गावं महामार्गावर वसलेली आहेत. पण त्याचा फायदा क्वचितच एखादा शेतकरी घेत असतो. शिगवण यांचे कुंभवे गावही असेच महामार्गावर वसलेले. त्यामुळे आपल्याला किलगड विक्रीला फारशी अडचण येणार नाही, याचा त्यांना अंदाज होता. पाच वर्षांपूर्वी घराजवळचीच थोडीशी जमीन भाडय़ाने घेऊन किलगड लागवड केली. महामार्गावर स्टॉल लावल्याने किलगडाची विक्री अगदी सहज झाली. पहिल्याच प्रयत्नात दोन-तीन टन किलगड संपला. यामुळे नगदी पिकाचा नवा अनुभव मिळाला. किलगडाच्या एका वेलीवर एक-दोन फळंच मोठी करायची असा व्यवसायिक प्रघात आहे. मोठी शेती करून दलालाकडे शेतमाल सोपवणाऱ्या शेतकऱ्यांना ते ठीक होते. उर्वरित महाराष्ट्राचा हा व्यवसायिक पॅटर्न शिगवण यांनी स्वतपुरता बदलून घेतला. आपल्या शेतातील फळं व्यापाऱ्यांना न देता त्यांना स्वतच विकायची होती. त्यामुळे एका वेलीवर तीन ते चार किलगड वाढायला द्यायची आणि छोटय़ा कुटुंबाची गरज भागेल, त्यांना परवडेल एवढीच मोठी फळं काढायची, असा निर्णय त्यांनी घेतला. साहजिकच त्यांची फळं दीड किलोपासून तीन-चार किलोपर्यंतच भरतात. आजूबाजूच्या गावागावात कमी किमतीत चवदार छोटे किलगड विकताना शिगवण यांना कोणतीच अडचण येत नाही.
आता किलगडाला शेण, लेंडीखत मिळत होतेच. पण कोंबडी खताचाही चांगला परिणाम साधता येईल, यादृष्टीने त्यांनी २०१२ मध्ये अंगणातच छोटीशी शेड काढून कोंबडीपालन सुरू केले. प्रथम सह्य़ाद्री आणि आता सातपुडा या जातीच्या कोंबडय़ा ते वाढवू लागले. गावठी कोंबडय़ा म्हणून त्यांच्या घरी खरेदीदारांची रीघ लागू लागली. दुग्धोत्पादन, शेळीपालनाबरोबरच आता कुक्कुटपालनानेही त्यांचं उत्पन्न वाढू लागलं. पण कोंबडी विक्रीपेक्षा कोंबडी खताचाच खरा फायदा त्यांना दिसत होता. पूरक उद्योग आणि शेतीसाठी खत असा दुहेरी फायदा साधत शिगवण यांनी किलगडाचे क्षेत्र वाढवले. गेल्या वर्षी दहा टन किलगड उत्पादन घेतले. आजमितीला तीन एकरावर त्यांनी किलगडाची तीन टप्प्यात लागवड केली आहे. त्यातून २० टनापर्यंत उत्पादन मिळण्याचा त्यांचा अंदाज आहे.
मजुरांमार्फत शेती करण्याची संस्कृती आता कोकणात राहिलेली नाही. दक्षिण कोकणातील त्यातही रत्नागिरी जिल्ह्य़ात अनेक गावं ओस झाली आहेत. येथील तरुण मंडळी रोजगाराच्या शोधात मुंबई-पुण्याकडे वळली आहेत. त्यामुळे मजुरी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यातून शेती परवडेनाशी झाली आहे. शिगवण यांना मात्र मनुष्यबळाचा प्रश्न अद्याप भेडसावलेला नाही. घरात आजी-आजोबा, आई-बाबा शेतात सतत त्यांच्या साथीला होते. ग्रॅज्युएट झालेली बहीणही भाजी-किलगड विक्रीसाठी परिसरात फिरत असे. त्यांच्या एमए झालेल्या पत्नीनेही विक्रीचे हे तंत्र शिकले आहे. साहजिकच एकत्र कुटुंब पद्धत आणि यशस्वी शेती याचा किती जवळचा संबंध आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण शिगवण परिवाराने दाखवले आहे. गेल्या वर्षी आजोबांचे निधन आणि बहिणीचे लग्न यामुळे त्यांच्या मनुष्यबळात कमतरता निर्माण झाली आहे. पण त्यांनी निर्माण केलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधातून त्यांना आता ग्रामस्थांचेही सहकार्य मिळू लागले आहे. गावातीलच मुलं शाळा-महाविद्यालयातून सुटल्यावर त्यांना मदत करायला येतात. त्यातून शिकता शिकता मुलांनाही अर्थार्जनाचा मार्ग सापडला आहे. आता किलगड विक्रीसाठी महामार्गावरील आणखी एका गावात स्टॉल उभारला आहे. ते स्वतच्या शेतमालाची गुणवत्ता टिकवण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
राजगोपाल मयेकर rajgopal.mayekar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा