एका बाजूला कोकणातील शेतजमिनी ओसाड पडताहेत आणि दुसऱ्या बाजूला नापीक समजल्या जाणाऱ्या काळ्या रेताड जमिनीत शेतकरी शेतीचे प्रयोग करत आहेत. हा विरोधाभास असला तरी मुरुडमधल्या जोशी कुटुंबीयांचे रेताड जमिनीतील शेतीचे हे प्रयत्न समुद्रकिनाऱ्याजवळील कोकणवासीयांसाठी नक्कीच आश्वासक आहेत. पुळणीतले शेतीचे हे प्रयोग म्हणूनच एका संशोधनासारखेच जाणवतात.

समुद्रकिनाऱ्याजवळील काळ्या रेतीत काही होत नाही, असा समज करत अनेक गावांतील अशा जमिनी ओसाड राहतात; पण रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली तालुक्यातील मुरुड गावात परशुराम जोशी आणि त्यांचे पुत्र श्रीराम जोशी यांची अशीच काळी रेताड जमीन आहे. गावातील अशा पुळणीत रान वाढलेले असते. नाही तर हा भाग ओसाड असतो. जोशी कुटुंबीय मात्र या जमिनीत भातशेतीनंतर भाजीपाला पिकवताहेत. वांगी, कोबी, मिरची, झेंडू, घेवडा, पावटा यांसारखी पिके ते दरवर्षी घेतात. गेल्या वर्षीपासून त्यांनी या यादीत आणखी एका पिकाची नोंद केली- पांढरा कांदा. त्यांचे हे यशस्वी प्रयोग सर्वासाठीच प्रेरणादायी आहेत.

मुळात कोकण कृषी विद्यापीठाच्या दापोली येथील प्रक्षेत्रावर २०११ पासून अलिबाग स्थानिक जातीच्या पांढऱ्या कांद्याचे प्रयोग सुरू आहेत. तीन वष्रे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर २०१५ मध्ये कोकणातील जांभ्या मातीमध्येही कमी पाण्यामध्ये हे पांढऱ्या कांद्याचे पीक घेता येते, अशी शिफारस त्यांनी केली आहे. जोशी कुटुंबीयांनी काळ्या पुळणीमध्ये हे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.

गेल्या वर्षी खास अलिबाग येथून त्यांनी पांढऱ्या कांद्याची पंधरा हजार रोपे आणली होती. पहिल्याच प्रयोगात सहाशे किलो कांदा त्यांना मिळाला. कांद्याचा आकार मोठा असल्याने त्यांचे खतपाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र यामध्ये दोन रोपांतील अंतर जास्त ठेवल्याने कांदे मोठय़ा प्रमाणात जुळे आल्याचे त्यांच्या लक्षात आले. अशा कांद्याना मागणी आणि दर कमी मिळत असल्याने त्यात सुधारणा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

कोकण कृषी विद्यापीठाने पांढरा कांदा चार बाय सहा इंचावर लागवड करण्याची शिफारस केली आहे. यंदा मात्र जोशी कुटुंबीयांनी अंतर कमी करत अलिबाग परिसरात पारंपरिक लागवड करतात, त्याप्रमाणे चार बाय चार अंतरावर लागवड करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता यंदा त्यांनी फक्त दहा हजार रोपे घेण्याचा निर्णय घेतला. १०२६२६ आणि म्युरेट ऑफ पोटॅश खत यावर त्यांनी खत व्यवस्थापनाचा पाया रचला. त्यांनी कमी केलेल्या अंतराचा परिणाम त्यांना लगेच मिळाला. कांदे जुळे येण्याचे प्रमाण नगण्य राहिलेच, पण कांदाही मध्यम आणि एकसंध आकाराचा राहिला. मात्र, कांद्याचे त्यांचे या वेळी उत्पन्न अध्र्याने कमी म्हणजे तीनशे किलोवर आले. त्यांच्या शेतमालाला येथील रिसॉर्ट व्यावसायिक उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. ग्राहक घरी येऊन भाजीपाला खरेदी करत असल्याने त्यांच्या कांद्याला ४०६० रुपये प्रतिकिलो दर मिळाला.

मुळात अलिबाग परिसरात होणारा पांढरा कांदा माळ तयार करून विकला जातो. त्यामुळे त्याचे गावठी म्हणून वेगळे ब्रँडिंग होते. जोशी कुटुंबीयांनी मात्र स्वत:च्या मालाचे वेगळे अस्तित्व ठेवण्याच्या दृष्टीने कांदा नियमित पद्धतीने, पण जाळीदार पिशवीत पॅक करून विकला. त्यातून लोकांना कांद्याची प्रत दिसतेच, पण हाताळणी, वाहतुकीलाही ते सोपे होते. अजूनही जनमानसात ‘माळीतला कांदा तोच पांढरा कांदा’ असे पक्के झाल्याने घाऊकमध्ये विक्री करताना जोशी कुटुंबीयांना अडचण येते.

यंदा त्यांच्या पुळणीतल्या शेतात त्यांनी कोबी, मिरची पिकासाठी प्लास्टिक मिल्चग आणि पूर्णपणे सेंद्रिय खत व्यवस्थापनाचा प्रयोग केला आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध असलेले हे गाव पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आलं आहे. याच गावातील परशुराम जोशी आणि त्यांचे पुत्र श्रीराम जोशी यांचा मूळ छपाई व्यवसाय आहे. त्यांचे शेतीतले प्रयोग लहान वाटत असले तरी काळ्या रेताड जमिनीवरील शेती पद्धतीत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण शेती एका संशोधकाच्या तोडीस तोड अशीच आहे.

 राजगोपाल मयेकर rajgopal.mayekar@gmail.com

Story img Loader