समुद्रातील वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान, परप्रांतीय मासेमारी नौकांचा राज्याच्या सागरी हद्दीत शिरकाव, मासेमारी बोटींची वाढलेली संख्या यामुळे कोकणातील मासेमारी व्यावसाय अडचणीत आला आहे. अशातच किनारपट्टीवर आढळणाऱ्या अनेक मत्स्यप्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आल्याने व्यवसायापुढे अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. स्थानिक मच्छीमार पारंपरिक मासेमारी व्यवसायापासून दूर होत चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आंतराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय माशांना चांगली मागणी असूनही निर्यातक्षम मत्स्यउत्पादन घेण्यात राज्य अपुरे पडते आहे.
कोकणातील भातशेतीला मत्स्यपालनाची जोड दिली तर शेती आणि मस्त्यव्यवसाय दोन्हीला सुगीचे दिवस येऊ शकतील. मात्र यासाठी शासनस्तरावर व्यापक प्रयत्न होणे गरजेच आहे.
कोकणातील बहुतांश शेती ही खाडी किनाऱ्यालगतच्या परिसरात केली जाते. त्यामुळे नसíगकरीत्या या परिसरात मत्स्यशेतीला भरपूर वाव असतो. ही बाब लक्षात घेऊन कोकणातील खारेपाट विभागात शेतात लहान-मोठी तळी खोदून त्यात घराला पुरेल एवढे मत्स्यउत्पादन घेतले जायचे. मात्र या मत्स्यपालनाला व्यावसायिक जोड देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर कोकणातील भातशेतीला मत्स्यशेतीचा समर्थ पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
कोकणातील शेतकरी हे अल्पभूधारक असतात. त्यामुळे त्यांनी कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणाऱ्या पिकांचा शोध घेण गरजेचे असते. त्यामुळे मत्स्यशेती हा शेतीला चांगला पर्याय ठरू शकतो. समुद्र आणि खाडीलगच्या शेतीत मत्स्यशेती सुरू केल्यास त्यातून शाश्वत उत्पन्न घेता येऊ शकते.
अलिबाग आणि पेण तालुक्यांत जिताडा, रोहू, कटला, तिलपिया यांसारख्या माशांचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. श्रीवर्धन, मुरुड, तळा तालुक्यांत कोळंबीपालन प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. मात्र हे प्रमाण खूप कमी आहे. बंद पडलेल्या मिठागरांच्या जागा, खाडीलगतच्या खासगी अथवा सरकारी जागा भाडेतत्त्वावर घेतल्या जातात. या जागांमध्ये लहान-मोठे तलाव तयार केले जातात. एक हेक्टर परिसरात तलाव तयार करण्यासाठी साधारणपणे २ ते ३ लाखांचा खर्च येतो.
तलाव तयार झाल्यावर त्यात खाडीचे पाणी सोडण्यात येते. या पाण्यावर ४ ते ५ दिवस प्रक्रिया केली जाते. पाण्यातील जीवजंतू आणि इतर मासे नष्ट केले जातात. त्यानंतर त्यात कोळंबीची अथवा ज्या माशांचे उत्पादन घ्यायचे आहे त्याची पिल्ले सोडली जातात. ही चेन्नई, आंध्र प्रदेश आणि कोलकाता या राज्यांतून आणली जातात. कोळंबीसाठी तांदळाचे पीठ, कोंडा, यीस्ट, भिजवून खाद्य घातले जाते. कोळंबीची पूर्ण वाढ होण्यासाठी ५ ते ६ महिन्यांचा कालावधी लागतो. या कालावधीत पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण, खारेपणा, कार्बन डायऑक्साईड, तापमान या घटकांचा रोज आढावा घेतला जातो. त्यांचे प्रमाण योग्य प्रकारे राहावे याची खबरदारी घेतली जाते.
कोळंबीला रोगाची लागण होऊ नये यासाठी पाण्यात औषधे टाकली जातात. पाच ते सहा महिन्यांनी तयार झालेल्या कोळंबी ४०० ते ८०० रुपये किलो या दराने कंपन्यांना विकल्या जातात. टायगर प्रॉन्झ प्रजातीला परदेशातून मोठी मागणी असल्याने त्यातून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
कोकणाला ७२० किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. आजही शेती आणि मत्स्यव्यवसाय हे कोकणातील ७० टक्के लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे. पण विविध कारणांनी दोन्ही व्यवसाय सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे शेतीला मात्स्यउत्पादनाची जोड दिली तर अडचणीत असणाऱ्या या व्यवसायांना संजीवनी मिळू शकते. यासाठी शासनस्तरावर कृषीविभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाने व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे.
meharshad07@gmail.com