महाराष्ट्रात प्रामुख्याने समुद्रातील मासेमारी व्यवसाय चालतो. पण दिवसेंदिवस कमी होणाऱ्या समुद्रातील मत्स्य उत्पादनाचा विचार करता गोडय़ा पाण्यातील मत्स्य व्यवसाय वाढविणे गरजेचे आहे. लहानमोठी तळी, तलाव, धरणांचे जलाशय यांमध्ये मत्स्योत्पादन वाढविण्यावर सध्या भर दिला जात आहे. तसेच राज्य सरकारच्याही मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना आहेत.
मत्स्यशेतीसाठी माशांची निवड कशी केली जाते यावर उत्पादन अवलंबून आहे. माशांची निवड करताना काही बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे. त्या पुढीलप्रमाणे – १. हवामानात व पाण्याला योग्य असणारे मासे वाढवावेत. २. माशांचे उत्पादन अधिक प्रमाणात होण्यासाठी जलद वाढणाऱ्या जाती असाव्यात. ३. निवड केलेल्या माशांच्या जातीचे बीज सहज व वेळेवर उपलब्ध असावे. ४. नैसर्गिक खाद्याची उपलब्धता करून त्यावर वाढणारे मासे निवडावेत. ५. एकमेकांना खाणाऱ्या माशांच्या जाती निवडू नये.
माशांच्या जाती
१. कटला – हा मासा झपाटय़ाने वाढतो. त्याचे तोंड वरच्या बाजूला वळलेले असते. माशाचे डोके मोठे व रुंद असते. मधले शरीर रुंद व फुगीर असते. एका महिन्यात हा मासा ७.५ ते १० से.मी वाढू शकतो. पहिल्या वर्षांत तो ३८ ते ४६ से.मी लांब व १ ते १.५० किलो वजनाचा होतो. कटला हा मासा १२० से.मी. पर्यंत वाढू शकतो. हा मासा पाण्यातील पृष्ठभागाजवळचे व काही प्रमाणात मधल्या भागातील अन्न खातो. तिसऱ्या वर्षी प्रजनन होणारा हा मासा जून ते ऑगस्ट महिन्यात अंडी घालतो. याचे कृत्रिम प्रजनन देखील करता येते.
२. रोहू – या माशाला वर जबडय़ाजवळ दोन लहान मिशा असतात. पहिल्या वर्षी हा मासा ३५ ते ४० सेमी वाढतो. व ७०० ते ९०० ग्रॅम वजनाचा होतो. हा मासा तळाजवळील खाद्य खाऊ शकतो. वनस्पती, प्लवंग आणि चिखलातील अन्नकण हे या माशाचे प्रमुख खाद्य आहे.
३. मृगळ – हा मासा सडपातळ शरीराचा असतो. रोहू व कटलासारखा लवकर वाढत नाही. प्रथम वर्षांला २५ ते ३० सेमी व ६०० ग्रॅम वजनाचा होतो. दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. या माशाचे कृत्रिम प्रजननही करता येते. तळ्यामध्ये प्रजनन अपेक्षित असेल तर वरील तिन्ही माशांना विणीसाठी हवामानात मस्तिष्क ग्रंथीच्य अर्काचे इंजेक्शन देऊन प्रेरित करावे लागते. वरील सर्व जाती या भारतीय आहेत. भारतात मोठय़ा प्रमाणाव विदेशी जातीचेही उत्पादन घेतले जाते.
भारतातील अनेक ग्रामीण भागांमध्ये मासेमारी करून पैसे मिळविणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मात्र, काही ठराविक काळच हा व्यवसाय फायद्याचा ठरतो तर पाण्याअभावी किंवा दुष्काळी भागात या मच्छिमारांना रोजगारासाठी इतरत्र जावे लागते. ग्रामीण भागातील या वर्गाला रोजगार मिळावा आणि मासेमारी व्यवसायाचा विकास व्हावा यासाठी शासन पातळीवर विविध योजनांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. मच्छिमारांना प्रोत्साहन देणे, जाळे उपलब्ध करून देणे, तांत्रिक व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे खाऱ्या पाण्यातील मासेमारीबरोबरच गोडय़ा पाण्यातील मासेमारीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. रोजगारनिर्मिती हा या मागचा मुख्य उद्देश आहे. मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातूनही मच्छिमारांना आधुनिक प्रोत्साहन सरकारकडून दिले जाते. मात्र, या सरकारी सुविधा संबंधित मच्छिमारांपर्यंत पोहोचणे आणि त्याद्वारे मासेमारीचा विकास होणे आवश्यक आहे.
umesh.jadhav@expressindia.com