जेथे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून आहे तेथे जनावरांना टँकरने विकत पाणी घेऊन व्यवसाय करणे कठीण आहे. आज शेतकऱ्यांना एका लिटर दुधासाठी २४ ते २५ रुपये खर्च येतो. मात्र दुधाला भाव मिळतो २० रुपये. हे वास्तव आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दूध डेअरीचा उत्पादन खर्चही जास्त आहे. नफ्यापेक्षा त्यांनाही तोटाच अधिक होतो. मात्र आता उत्पादन खर्चात कपात करून नफा मिळविण्याची किमया चारा व्यवस्थापनाच्या त्रिसूत्रीमुळे शक्य झाली आहे.
दूध धंदा हा दारिद्रय़ कमी करणारा मानला जातो. फूड ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या अहवालानुसार एक गाय असेल तर १४ टक्के व एक म्हैस असेल तर १८ टक्के दारिद्रय़ कमी होते. पण आता गेल्या काही वर्षांपासून हा व्यवसाय आतबट्टय़ाचा ठरू लागला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी तो सोडला. तर जे जिद्दीने हा व्यवसाय करत आहेत त्यांच्यापुढे दुष्काळ व नापिकीने गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. जेथे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ‘आ’ वासून आहे तेथे जनावरांना टँकरने विकत पाणी घेऊन व्यवसाय करणे कठीण आहे. आज शेतकऱ्यांना एका लिटर दुधासाठी २४ ते २५ रुपये खर्च येतो. मात्र दुधाला भाव मिळतो २० रुपये. हे वास्तव आहे. राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दूध डेअरीचा उत्पादन खर्चही जास्त आहे. नफ्यापेक्षा त्यांनाही तोटाच अधिक होतो. मात्र आता उत्पादन खर्चात कपात करून नफा मिळविण्याची किमया चारा व्यवस्थापनाच्या त्रिसूत्रीमुळे शक्य झाली आहे.
दुष्काळात शेतकरी होरपळून निघत आहे. चारा नाही, पाणी नाही. जनावरांच्या छावण्या सुरू कराव्यात म्हणून मागणी होत आहे. निकृष्ट प्रतीच्या चाऱ्यामुळे गायींच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. राज्यातील दूध उत्पादन १५ ते २० टक्क्याने घटले आहे. अशा परिस्थितीत अनेक जण हतबल झालेले दिसतात. शनििशगणापूर या तिर्थक्षेत्रापासून आठ किलोमीटर अंतरावर लोहगाव हे चार हजार लोकवस्तीचे गाव आहे. पाच वर्षांत अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पिके आलीच नाहीत. शेती पडीक पडली. मात्र याच गावातील रोहिदास जनार्दन ढेरे हा दहावी शिकलेला तरुण मात्र परिस्थितीवर मात करीत आज दुग्ध व्यवसायात यशस्वी झाला आहे. त्याने पावसाळ्यातच चाऱ्याचे नियोजन केले. टँकरने पाणी विकत घेतो. दोन माणसे ५० गायींचा गोठा सांभाळतात. उत्पादन खर्चात त्याने केलेली कपात थक्क करणारी आहे. गावातीलच पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉ. रंगनाथ ढेरे यांच्या मार्गदर्शनामुळे रोहिदासप्रमाणेच २० ते २५ शेतकऱ्यांनी हाच मार्ग धरला आहे. खरे तर संशोधन खूप होते. ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत जात नाही. पण आता प्रभात डेअरीमुळे ते शक्य झाले आहे. शेअर बाजारात उतरलेला प्रभात हा देशातील दुसरा तर राज्यातील पहिला प्रकल्प आहे. आतबट्टय़ाचा व्यवसाय शेतकरी करीत राहिले तर ते एक दिवस हा व्यवसाय सोडून देतील. दूध मिळणार नाही. उद्योग संकटात सापडेल. हा धोका ओळखून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू केला. विशेष म्हणजे रोहिदाससारख्या सुमारे दोन हजार गो-पालकांनी त्याला प्रतिसाद दिला. आता त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणच सुरू केले. चार िभतींच्या आत शिक्षण तर दिलेच, पण प्रत्यक्ष गोठय़ापर्यंत जाण्यासाठी ३० पशुवैद्यकीय तज्ज्ञ नेमले. आता टाटा कॅपिटल फायनान्सने त्याकरिता मदतीचा हात दिला आहे. दुष्काळात जिल्हा सहकारी बँकांनी गायी-म्हशींचे कर्ज वसुली होत नसल्याने बंद केले असताना टाटा कॅपिटल फायनान्सने मात्र धडपडणाऱ्या शेतकऱ्यांना साथ करण्याचा निर्णय घेतला.
पूर्वी गायराने होती. पण काळाच्या ओघात ती राहिली नाहीत. जनावरे चारणे बंद झाले. त्यात ७०च्या दशकात संकरित गायी परदेशातून आणून त्याचा प्रचार, प्रसार केल्यानंतर मुक्त गोठा पद्धत आली. त्यात अनेक तोटे होते. जनावरांचे आजार वाढले. शेणकूर करण्यासाठी जादा मनुष्यबळ लागले. त्याचा परिणाम दुधावर झाला. आता मुक्त गोठा केला की, गाया भूक लागली की, पाहिजे तेवढाच चारा खातात. कधी उन्हात तर कधी सावलीत बसतात. त्यामुळे त्यांचे आजार कमी झाले. दररोज शेणकूर करण्याऐवजी महिन्यातून एकदा केला तरी चालतो. तोही ट्रॅक्टरच्या साहाय्याने करता येतो. दोन माणसे ५० गायींचा गोठा सांभाळू शकतात. दूध काढणी यंत्र, कडबा कुट्टी, तसेच गाय धुण्यासाठी फॉगरचाही वापर मुक्त गोठय़ात करता येतो. वेळ व खर्च या पद्धतीत वाचतो.
जनावरांचा हिरवा चारा रोज शेतात जाऊन आणावा लागतो. उन्हाळ्यात तो उपलब्ध होत नाही. दररोज थोडा थोडा चारा वापरल्याने शेत वर्षभर गुंतून पडते. पण आता मूरघास पद्धत आली. खरे तर इस्राइलमध्ये ती अनेक वर्षांपासून वापरली जाते. पंजाब व हरियाणाचे शेतकरी त्याचा अवलंब करीत होते. विद्यापीठांनी त्याची शिफारस केली. पण त्याकडे शेतकरी आकर्षति झाले नव्हते. आता मूरघासाचा फायदा सर्वाच्या लक्षात आला. एक एकरात मक्याचे पीक घेतले, की ते ७० दिवसांत तयार होते. ट्रॅक्टरलाच कडबा कुट्टी यंत्र असते. त्या माध्यमातून केलेली कुट्टी ट्रॅक्टरमध्ये पडते. ही कुट्टी जमिनीत खोल खड्डा घेऊन त्यावर प्लॅस्टिक अंथरून टाकली जाते. हवा बंद करून खड्डा बंद केला जातो. ४५ दिवसांत मूरघास तयार होतो. तो वर्षभरात केव्हाही वापरता येतो. पौष्टिकता त्यामध्ये अधिक असते. विशेष म्हणजे एक एकरात २० टन चारा तयार होतो. त्याकरिता सहा फूट खोल १५ फूट रुंद व २५ ते ३० फूट लांब खड्डा खोदावा लागतो. या साऱ्या कामासाठी अवघा पाच ते सात हजार रुपये खर्च येतो. हा चारा चार रुपये किलो पडतो. ज्या वेळी पाणी असते त्या वेळी मका लावायचा, त्याचा मूरघास करायचा आणि जेव्हा चारा टंचाई भासते तेव्हा त्याचा वापर करायचा, त्यामुळे आता दुष्काळातही लोहगावसारख्या गावात चारा उपलब्ध होत आहे. फक्त पाऊस नसल्याने त्यांनी मका आठ दहा किलोमीटर अंतरावरून विकत आणून मूरघास बनविला. चाऱ्याचे गोदाम असेही मूरघासला म्हटले जाते. खड्डा पद्धत करायची नसेल तर बाजारात ५०० रुपयांमध्ये प्लॅस्टिकच्या बॅगा (सायलेज) मिळतात. त्यातही शेतकरी मूरघास करतात.
प्रभात डेअरीचे उद्योजक सारंगधर निर्मळ, किशोर निर्मळ, विवेक निर्मळ तसेच साहाय्यक महाव्यवस्थापक अशोक खरात, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊसाहेब गुंड, डॉ. गोकूळ भांड यांनी या त्रिसूत्रीच्या अंमलबजावणीसाठी विशेष मेहनत घेतली. प्रभात रुरल मल्टीपर्पज संस्थेच्या माध्यमातून आता हे काम चालते. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत आता शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले आहे. त्यामुळे आता राज्यातील सहकारातील तसेच खासगी क्षेत्रातील अन्य प्रकल्पांनीही केवळ संकलन करण्यापेक्षा उत्पादन खर्च कमी करून हा धंदा पुन्हा जोमाने उभा राहील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मूरघास, हायड्रोपोनिक्सचा वापर, अॅझोला व मुक्त गोठा या त्रिसूत्रीने दुग्ध व्यवसाय केला तर शेतकरी दूध व्यवसायामुळे जो दरिद्री बनण्याचा धोका होता, तो राहणार नाही. त्याचे दारिद्रय़ निश्चितच कमी होईल. दुष्काळातही चाऱ्याचा प्रश्न सुटलेला असेल.
कमी पाण्याचा वापर
‘मातीविना शेती’ अशी संकल्पना असलेल्या हायड्रोपोनिक्स तंत्राच्या माध्यमातून अत्यंत कमी पाण्यात चारा निर्मिती सुरू करण्यात आली आहे. मका पिकाची उगवण क्षमता ८० टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे हायड्रोपोनिक्स पद्धतीत त्याचा वापर केला जातो. मका बियाणे २४ तास पाण्यात भिजवून ठेवतात. नंतर ते एका जूटच्या बारदानात मोड येण्यासाठी २४ तास पुन्हा ठेवतात. प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ते पसरवतात. नंतर हे ट्रे लोखंडी किंवा बांबूच्या मांडण्यांमध्ये ठेवून त्यावर स्प्रे पंप किंवा अॅटोमॅटिक फॉगरच्या साहाय्याने विशिष्ट अंतराने पाणी मारले जाते. अत्यंत कमी अर्थात नाममात्र पाणी त्याकरिता लागते. आठ दिवसांत चारा तयार होतो. अडीच ते तीन रुपये किलोच्या दराने हा चारा मिळतो. त्याचबरोबर अॅझोला हे समुद्री शेवाळ आहे. त्यात पाचकता व पौष्टिकता मोठी असते. पाण्याची टाकी बनवून त्यात अॅझोला शेवाळ टाकले जाते. हे शेवाळ आपोआप वाढते. दररोज ते थोडे गायीला चारा म्हणून दिले जाते. अशा प्रकारे जनावरांच्या चाऱ्याचे नवे तंत्र आले आहे. या त्रिसूत्रीमुळे चारा उत्पादनाचा खर्च कमी होतो. उत्पादन खर्च कमी झाल्याने अनेक शेतकरी यशस्वी झाले आहेत.
((( हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे करण्यात आलेली चारा लागवड. मक्याची रोपे मोठी झाल्यावर त्यांचाच जनावरांसाठी चारा म्हणून वापर करण्यात येतो. ))
ashok_tupe@expressindia.com