उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादची द्राक्षे याबरोबरच जिल्ह्यतील फुलशेतीने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला. जरबेरा फुलाची शेती करणाऱ्या अनेक तरुणांच्या अथक परिश्रमाला आता सुदिन आले आहेत. जगातील अनेक बाजारपेठांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील पाडोळी आणि उपळा या नावाचे जरबेरा फुल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. फुलशेतीच्या या यशस्वी साखळीत येथील केमिकल अभियंता असलेले तरुण शेतकरी संजय गोपाळचंद मोदाणी यांनी मानाचा तुरा खोवला आहे. जिल्ह्यत गुलाबशेतीचा पहिला अभिनव प्रयोग करण्यात ते यशस्वी झाले. गुलाबशेतीच्या माध्यमातून स्थानिक, राज्यस्तरावरील बाजारपेठेतील मागणी आपल्याकडे खेचता येऊ शकते. त्यातून वर्षांकाठी समाधानकारक आर्थिक उत्पन्न पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ मोदाणी यांनी अथक परिश्रमातून घालून दिला.
दुष्काळी जिल्हा म्हणून वाटय़ाला आलेली परंपरागत ओळख पुसून टाकण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यतील अनेक तरुण शेतकरी सशक्त पर्याय अवलंबत आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन तंत्र, नवीन यंत्र आणि नवीन संकल्पनांचा अंगीकार करून अनेकांनी राज्याचे लक्ष आपल्याकडे खेचण्याजोगे अभिनव काम करण्यास प्रारंभ केला आहे. उस्मानाबादी शेळी, उस्मानाबादची द्राक्षे याबरोबरच जिल्ह्यतील फुलशेतीने जागतिक पातळीवर आपला ठसा उमटविला. जरबेरा फुलाची शेती करणाऱ्या अनेक तरुणांच्या अथक परिश्रमाला आता सुदिन आले आहेत. जगातील अनेक बाजारपेठांमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यतील पाडोळी आणि उपळा या नावाचे जरबेरा फुल ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. फुलशेतीच्या या यशस्वी साखळीत येथील केमिकल अभियंता असलेले तरुण शेतकरी संजय गोपाळचंद मोदाणी यांनी मानाचा तुरा खोवला आहे. जिल्ह्यत गुलाबशेतीचा पहिला अभिनव प्रयोग करण्यात ते यशस्वी झाले. गुलाबशेतीच्या माध्यमातून स्थानिक, राज्यस्तरावरील बाजारपेठेतील मागणी आपल्याकडे खेचता येऊ शकते. त्यातून वर्षांकाठी समाधानकारक आíथक उत्पन्न पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ मोदाणी यांनी अथक परिश्रमातून घालून दिला.
स्वत: केमिकल इंजिनिअर असल्यामुळे रोपांची लागवड, त्यांना हव्या असलेल्या घटकद्रव्यांची मात्रा, पाणी आणि फवारणीचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन त्यांना अवगत आहे. त्यातून ४० गुंठे क्षेत्रावर हरितगृहात त्यांनी फुलविलेला गुलाबशेतीचा मळा अनेकांना आकर्षति करू लागला आहे. ३० हजार रोपांना आता फुलांच्या टवटवीत कळ्या लगडल्या आहेत. डार्क रेड, टॉप सिक्रेट, गोल्ड स्टाईक, अविलाज, पॉइजन अशा लाल, गुलाबी, पांढरा, पिवळ्या रंगांच्या डच गुलाब या वर्णातील फुलांमुळे दुष्काळी परिसराला नवेच रूप मिळाले आहे. घामाला फुलांचा दरवळ मिळाल्यामुळे या सौंदर्यातून घसघशीत अर्थप्राप्ती देखील आता सुरू झाली आहे.
संजय मोदाणी यांनी ४० गुंठे क्षेत्रावर ५० लाखांची गुंतवणूक करून अत्याधुनिक हरितगृह उभारले. यात पुणे येथील तळेगाव दाभाडे येथून डच गुलाब या प्रजातीची ३० हजार रोपांची लागवड केली. सुमारे १० रुपयाला एक याप्रमाणे त्यांनी या रोपांची खरेदी केली. लागवडीनंतर अवघ्या ४ महिन्यांत रोपांवर टवटवीत फुलांचे ताटवे निर्माण झाले. एका झाडाला वर्षभरात १५ ते २० फुले येतात. त्याप्रमाणे ३० हजार रोपांपासून दरवर्षी साडेपाच ते सहा लाख फुलांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे संजय मोदाणी यांनी सांगितले. सध्या पाण्याची या परिसरात मोठय़ा प्रमाणात कमतरता आहे. उपलब्ध पाण्यावर योग्य नियोजन करून शेती पिकविणे, फुलविणे त्यातून स्वत:बरोबर मजुरांना आíथक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करणे, ही खरी तर तारेवरची कसरत. मात्र, मागील ६ महिन्यांपासून संजय मोदाणी यांनी ही कसरत लीलया पार पाडत जिल्ह्यतील दुष्काळी भूभागाला गुलाबशेतीचा पर्याय प्रभावीपणे लागू होऊ शकतो, याचे उदाहरण घालून दिले.
डच गुलाब या फुलास आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या फुलाला असलेली मागणी पाहता, ग्रामीण भागात अशा पद्धतीची शेती मोठय़ा प्रमाणात होणे गरजेचे आहे. मात्र, बंगळुरू व पुणे परिसर वगळता खूप कमी ठिकाणी डच गुलाबाचे उत्पादन घेतले जाते. फुलाच्या कळीचा आकार आणि ३५ ते ९० सें.मी सरळ उंचीचा देठ अनेकांना आकर्षति करतो. त्यामुळेच त्याला मिळणारी किंमतही मोठी आहे. स्थानिक बाजारपेठेत तीन ते सात रुपयांपर्यंत विक्री होणारे हे फुल जागतिक बाजारपेठेत १५ रुपयांच्या पुढे आपला रुबाब गाजविते. मागील तीन महिन्यांत दरमहा ३० हजार फुलांचे उत्पन्न संजय मोदाणी यांनी मिळविले.
सुरुवातीला प्रायोगिक पातळीवर फुलांचे उत्पन्न पदरात पडल्यानंतर त्याची पॅकिंग, फिनििशग न करता उस्मानाबादसारख्या छोटय़ा शहरात त्यांनी दोन रुपयाला एक फूल जागेवर देऊ केले. कुठलाही प्रवास, पॅकिंग, कोल्ड स्टोरेज हा खर्च न लागता, सरासरी दोन रुपयाला स्थानिक बाजारपेठेत फुलाला मागणी आल्यामुळे शाश्वत उत्पन्नाला प्रारंभ झाला आहे. उत्पन्नाची शाश्वत हमी असली, तरी बाहेरील बाजारपेठेत स्वत:ला सिद्ध करायचे असेल, तर कळीचा आकार, फुलाचा रंग आणि फुलाची दांडी या सगळ्यांची काळजी घ्यायला हवी. पानांवर डाग असतील तर बाजारपेठेत फुलाला किंमत मिळत नाही.
गुलाबाला डावणी, भुरी, करपा, लाल कोळी, थ्रीप्स, एफिटस, गुंडाळी, पानावरील ठिपके अशा अनेक रोगांची लागण होऊ शकते. त्यासाठी सूक्ष्म नियोजन, फवारणीसाठी लागणारे तंत्रशुद्ध व्यवस्थापन आणि व्यक्तिश: घेतली जाणारी काळजी यातूनच प्लॉट आपल्याला आíथक स्थर्य मिळवून देऊ शकतो, असे संजय मोदाणी सांगतात.
जिल्ह्यत यापूर्वी असा प्रयोग कोणीही केला नव्हता. अनेक गोष्टी ठेच लागून शिकत आहोत. चुलते ब्रिजलाल मोदाणी यांच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व करण्यास बळ येत आहे. पुढील काळात वर्षांला खर्च वजा जाता ४० गुंठय़ांतून सुमारे १० लाखांच्या आसपास उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाज मोदाणी यांनी व्यक्त केला. हरितगृह उभारण्यास केलेली ५० लाखांची गुंतवणूक सरकारकडून अनुदान स्वरूपात परत मिळणार आहे. मधल्या कालावधीत या साठी लागणाऱ्या व्याजाची रक्कम स्वत:ला भरुदड म्हणून सोसावी लागत आहे. सरकार एकीकडे अनुदान देत असताना प्रशासकीय पातळीवर त्यात होत असलेली दिरंगाई त्रासदायक असल्याची खंतही संजय मोदाणी यांनी व्यक्त केली.
दर तीनचार वर्षांनी उस्मानाबाद जिल्ह्यच्या वाटय़ाला दुष्काळाचा फेरा येतो. कधी अतिवृष्टी, कधी अल्पवृष्टी, कधी गारपीट तर कधी अवर्षण अशा समस्येच्या चक्रातून हा भूभाग होरपळून निघत आहे. अशा काळात निव्वळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणे आत्मघात ठरू शकेल. सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी अभ्यासाच्या आणि वडीलधारी मंडळींच्या अनुभवाच्या आधारे नवीन संकल्पना आत्मसात करायला हव्यात. त्यातून नवनवीन प्रयोग करून अन्य तरुण शेतकऱ्यांसमोर प्रभावी पर्याय ठेवायला हवेत. या साठीच आपण गुलाबशेतीचा पर्याय निवडला असल्याचे संजय मोदाणी यांनी सांगितले. घामाला फुलाचा दरवळ येऊन आयुष्यात गुलाबाच्या फुलाप्रमाणे आíथक सौंदर्य येईल, तेव्हाच दुष्काळी भागातील तरुणांचे चेहरे गुलाबाप्रमाणे टवटवीत होतील, असा आशावादही मोदाणी यांनी व्यक्त केला.
रवींद्र केसकर ravindra.keskar@rediffmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा