गाव तर सव्वा दोन हजार लोकसंख्येचं. खातेदार शेतकऱ्यांची संख्या २४१. पिकाऊ जमीन ६५० एकर. कोणत्याही सामान्य खेडय़ाप्रमाणेच गाव म्हणजे तमदलगे. जलसमृद्धी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील पूर्वेकडील या गावाला पाणीटंचाईच्या झळा बसायच्या. याच दुष्काळी गावाने कृषी क्षेत्रात अशी किमया केली की आता हे गाव कृषी क्षेत्रातील यशस्वी ‘प्रायोगिक रंगभूमी’ ठरले आहे. प्रगतशील शेतीचा वस्तुपाठ घालणाऱ्या या गावात शासनाचे एकूण एक पुरस्कार चालत आले. रोपवाटिकेमध्ये या गावाचा हात धरावा असे गाव नाही. इथल्या ३० रोपवाटिकांमुळे दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकातील कैक गावची शेती फुलली आहे. काही एक निर्धार करून पुढे जायचे ठरवले की यशाची एक-एक कमान कशी साध्य करता येते याचा धांडोळा तमदलगे गावातून घेता येतो.
कोल्हापूर जिल्ह्य़ात पाण्याची कमतरता कधी जाणवलीच नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे राधानगरी धरणाची निर्मिती झाली. स्वातंत्र्योत्तर काळात काळम्मावाडी धरण झाले आणि अवघा जिल्हा जलसमृद्ध बनला. रानोमाळ पाणी पोहोचल्याने जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याचे दिसू लागले. पण हे भाग्य सर्वच गावांना होते असे नाही. हातकणंगले-शिरोळ गावाचा एक टापू असा आहे की इथे पाणीटंचाईची समस्या गंभीर आहे. आजूबाजूच्या भागात जलसमृद्धी नांदत असताना तमदलगे आणि शेजारच्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय करावी लागत असे. अन्य तालुक्यांच्या तुलनेत हातकणंगले-शिरोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी. पण कोयना-वारणापासून कृष्णा-पंचगंगा आणि दक्षिणेकडील दुधगंगा या नद्यांचे पाणी मात्र या दोन तालुक्यांत येऊन साचते. या भागाला महापुराची समस्या जाणवण्याचे कारणही हेच. बेसमेंटच्या या भागाने अनेकदा महापुराचा तडाखा अनुभवला आहे. जलवैभवाची उधळण होत असताना तमदलगेचा भाग मात्र कोरडा पाषाण राहिला. पण या गावातील शेतकऱ्यांच्या जिद्दीतून मेहनतीचे पाणी ठिबकत राहिले. कठोर परिश्रम, नेटके नियोजन, नवतंत्रज्ञानाची जोड, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या पंचसूत्रीचा अवलंब करीत गावकऱ्यांनी माळरानाचे रूपांतर बारमाही फुलणाऱ्या हिरव्यागार शेतीमध्ये केले. शासकीय योजनांचा लाभ कसा उठवायचा हे या गावाने पुरेपूर जाणले.
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरून जाताना तमदलगे हे गाव लागते. गाव कोरडवाहू. गावाच्या तिन्ही बाजूला १२०० एकराचा डोंगर. एका बाजूला ६५० एकर क्षेत्र पिकाऊ जमीन. १९७२ सालच्या दुष्काळाचे चटके या गावाने सोसलेले. त्याच काळात गावात मोठा पाझर तलाव बांधला गेला. तलाव काठोकाठ भरला गेला की गावची पाण्याची शाश्वत सोय होते. वरुणराजाच्या कृपेवर इथल्या शेतीचा भरवसा. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता गावात जलसंधारण कामांना गती मिळाली. ही प्रतिकूल परिस्थिती तमदलगेकरांच्या कृषी प्रगतीच्या आड आली नाही, किंबहुना त्यांनी ती येऊ दिली नाही. अडचणीवर मात करण्याचा निसर्गाचा मंत्र हे गाव आचरणात आणते. शेतीत प्रयोग करायचे आणि मेहनत घेऊन ते यशस्वी करायचा ध्यास गावकऱ्यांना जडलाय. तोही स्वातंत्र्योत्तर काळापासून आजपर्यंत. स्वातंत्र्यानंतर ४० कोटी लोकसंख्येच्या देशात प्रत्येकाला दोनवेळचे अन्न मिळणेही कठीण. ही स्थिती ओळखून पंतप्रधान पंडित नेहरू यांनी अन्नधान्याच्या शेतीला प्रोत्साहन दिले. तसे आवाहनही केले. त्यांच्या आवाहनास साद दिली ती तमदलगे गावातील (कै.) भीमगोंडा दादा पाटील या शेतकऱ्याने. त्यांनी कार ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेऊन सर्वाचे लक्ष वेधले. पाटलांच्या या पराक्रमाची नोंद घेत पंतप्रधानांनी पाटील यांना कृषिपंडित पुरस्कार देऊन सन्मानित केले. ट्रॅक्टर भेट मिळालेला त्यांचा फोटो आजही संसदेच्या सभागृहात पाहायला मिळतो. येथूनच सुरू झाली तमदलगेतील बहाद्दर शेतकऱ्यांची यशोगाथा.
शिरोळ-हातकणंगले परिसर भाजीपाल्याच्या उत्पादनात अग्रेसर. शास्रोक्त पद्धतीने उत्पादन घेता यावे या उद्देशाने तमदलगेतील बाबुराव कचरे यांनी हायटेक रोपवाटिका सुरू केली. त्यांचे पुत्र शिवाजी यांनी हे काम तांत्रिकदृष्टय़ा आणखी उंचीवर नेले. सध्या भाजीपाला क्षेत्रात कचरे रोपवाटिकेचा लौकिक अनेक राज्यांमध्ये आहे. कचरे पिता-पुत्राच्या कृषी क्षेत्रातील कार्याची नोंद शासनाने घेतली. बाबुराव यांना कृषिभूषण तर शिवाजी यांना उद्यान पंडित हे पुरस्कार मिळाले आहेत.
अलीकडे तर तमदलगेची ओळख रोपवाटिकेचे गाव म्हणून झाली आहे. खरे तर हा व्यवसाय जयसिंगपूर या बाजारपेठेच्या गावात वसलेला. वाढत्या नागरीकरणामुळे त्याचा केंद्रिबदू तमदलगेकडे सरकला. तरुण या व्यवसायात उतरू लागले असून स्वकर्तृत्वाने स्थिरावत आहेत. गावात तब्बल ३० जण रोपवाटिकेच्या व्यवसायात आहे. लातूर, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूरपासून ते बेळगावपर्यंत रोपे पुरविली जातात. तज्ज्ञ रोपांबाबत मार्गदर्शन करतो. म्हणूनच इथल्या रोपवाटिकेतील रोपांना मागणी आहे. सुमारे ५० लाखाची उलाढाल या व्यवसायातून होते. खेरीज, ऊस-भाजीपाला व रोपवाटिका या तीन मुख्य शेती पिकाची वर्षांची उलाढाल सुमारे ३ कोटी आहे. दोन वर्षांपूर्वी टँकरने पाणीपुरवठा करावा लागणाऱ्या या गावात संपन्न हिरवाई नांदते आहे.
‘गिनिज बुक’सह विविध पुरस्कार
सुरगोंडा पाटील या शेतकऱ्याने सर्वाधिक लांबीच्या काकडीचे उत्पादन घेतले. त्यांच्या या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. तत्पूर्वी या शेतकऱ्याने सोयाबिन उत्पादनात राज्यात दुसरा क्रमांक पटकविला. शेतकऱ्यांसाठी क्लस्टर पद्धतीने विविध प्रयोग राबवणाऱ्या आडमुठे यांना गतवर्षी उद्यान पंडित पुरस्कार मिळाला. शेती प्रयोगात महिलाही पुढे आहेत. वैजयंतीमाला विद्याधर वझे यांनी ऊस, केळी, चिकू, ऊस रोपवाटिका आणि जनावरांचा गोठा यामध्ये केलेले काम आदर्श ठरल्याने त्यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्काराने गौरवले आहे. शेतीला ज्ञान, नवतंत्रज्ञान, प्रयोगशीलता याची जोड हवी हे लक्षात घेऊन रावसाहेब पुजारी यांनी तेजस प्रकाशनच्या माध्यमातून ५५ पुस्तके प्रकाशित केली. स्वतही लिहिली. गेली दोन दशके कृषी विस्तारासाठी करीत असलेल्या त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना कृषिमित्र पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे शेतीप्रगती हे मासिक राज्यभरात पोहोचले आहे. दुष्काळ हटविण्यासाठी ग्रामस्थ पुढे आले. शासनाने मदत केली. पाणी अडवा-पाणी जिरवा, बनतळी, वनविभागाचे ५२ बंधारे, अन्य ४० बंधारे, पाणलोटची कामे, सिमेंट, माती यांचे बंधारे याद्वारे जलसंधारणाचे मोठे काम झाले. कोरडवाहू गाव योजनेत तमदलगेची निवड झाली. एक कोटीचा निधी मिळाला. गावाने तितकीच रक्कम जमवली. गावात पाणी वाहू लागले. गाव आदर्श-प्रयोगशील शेतीचा उपक्रम राबवत हिरवाईने नटले. शेतीतून संपन्नता कशी येते याचा वस्तुपाठ अनुभवण्यासाठी तमदलगेची वाट वाकडी करायलाच हवी. तमदलगेकर स्वागताच्या प्रतीक्षेत आहेत.
dayanandlipare@gmail.com