अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला. त्यानंतर अधिक उत्पादन मिळावे या हव्यासापोटी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा अतिरेकी वापर झाला. उत्पादन वाढले, त्याबरोबरच उत्पादनखर्चही वाढला. रासायनिक खतातून शेतकऱ्यांचे भले होते हे आता अर्धसत्य मानले जात आहे. त्याच्या फायद्याबरोबरच त्याचे दुष्परिणामही जगभर भोगले जातात. त्यातूनच पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळणारा मोठा वर्ग आहे.
गेल्या काही वर्षांत शेतीच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत. कोरडवाहू शेती, बागायती शेती, रासायनिक शेती, सेंद्रिय शेती, निसर्गशेती, सुभाष पाळेकरांनी सुरू केलेली झिरो बजेट शेती याबरोबरच फळांची शेती, फुलांची शेती, भाज्यांची शेती अशा अनेक उपशाखा तयार झाल्या आहेत.
अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी पहिल्या हरितक्रांतीनंतर उत्पादनवाढीसाठी रासायनिक खताचा आधार घेतला गेला. त्यानंतर अधिक उत्पादन मिळावे या हव्यासापोटी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, तणनाशकांचा अतिरेकी वापर झाला. उत्पादन वाढले त्याबरोबरच उत्पादनखर्चही वाढला. बऱ्याच वेळेला, ‘खाये पिये कुछ नही, ग्लास फोडे बारा आना’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. आपल्या देशात अनेक कृषी विद्यापीठे आहेत. या विद्यापीठातून मोठय़ा प्रमाणावर संशोधनही होत आहे मात्र दुर्दैवाने हे संशोधन पूर्णाशाने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत नाही. आपल्या शेतीत उत्पादन वाढावे यासाठी एखादा असाध्य रोग झाल्यानंतर जे जे डॉक्टर सांगतील ते ते उपाय तो रुग्ण करत असतो. कोणत्या तरी उपायाने आपला आजार बरा होईल असे त्याला वाटत असते, त्याच पद्धतीने शेतकरी आपली शेती फायद्यात येण्यासाठी नवनवे उपाय योजतो आहे.
रासायनिक खतातून शेतकऱ्यांचे भले होते हे आता अर्धसत्य मानले जात आहे. त्याच्या फायद्याबरोबरच त्याचे दुष्परिणामही जगभर भोगले जातात. त्यातूनच पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे वळणारा मोठा वर्ग आहे. सेंद्रिय शेतीतून उत्पादन कमी न होता ते वाढू शकते असा दावा करणारी मंडळीही पुढे येत आहे. जगभरात सर्वाधिक सेंद्रिय शेतीचे क्षेत्र इस्रायलमध्ये (३० टक्के), ऑस्ट्रेलिया २४ टक्के, कॅनडा १६ टक्के, अमेरिका ४ टक्के व भारत १.५० टक्के असे आहे. इस्रायलमध्ये प्रतिएकर ६ टन सेंद्रिय खताचा वापर केला जातो. जगभरातील सरासरी १ ते १.५० टन खताची आहे. भारतात हे प्रमाण एकरी २५ किलोदेखील नाही. सेंद्रीय शेतीच्या बाबतीत धोरण निश्चित करून वाटचाल फारशी होत नाही. इशान्यपूर्व राज्यातील मेघालय व सिक्कीम ही राज्ये मात्र याला अपवाद आहेत. या दोन्ही राज्यात रासायनिक खते, औषधे, कीटकनाशके यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. येथील शेती १०० टक्के सेंद्रिय पद्धतीने केली जाते.
सेंद्रिय शेती ही फायद्याची नाही असा एक भ्रम शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सेंद्रिय शेती ही फायद्याची केली जाऊ शकते याची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी घालून दिली आहेत. रासायनिक खताचा अतिरेकी वापर झाल्यामुळे जमिनीतील कर्वाचे प्रमाण कमी झाले आहे. खते कितीही टाकली तरी पीक वाढीवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. बियाणे उत्तम दर्जाचे असले तरी ते उगवून त्याची वाढ होण्यासाठी जो जमिनीचा पाया लागतो, मातीचा पोत आवश्यक आहे तो तयार करण्यासाठी सेंद्रिय खताला प्राधान्य दिले जात आहे. आपल्याकडे काळय़ा मातीचे रूपांतर आता चिकण मातीत झाले आहे. पाणी टाकून एखाद्या रस्त्यावर रोलर फिरवावा त्या पद्धतीची शेतीची अवस्था अनेक ठिकाणी झालेली आहे. सिमेंट रोडसारखी शेती झाली असेल तर त्या शेतीतून उत्पादन कसे घेणार हा प्रश्न आहे. जमिनीत पाणी मुरवण्यासाठी जमीन भुसभुशीत हवी, त्यात हवा खेळती हवी आणि त्यासाठी रासायनिक खताचा वापर कमी व्हायला हवा.
दिवसेंदिवस शहरीकरणाच्या रेटय़ामुळे उपजावू जमिनीचे प्रमाण कमी होत आहे. आहे त्या जमिनीत अधिक उत्पादन घेण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. सेंद्रिय शेतीतज्ज्ञांचे म्हणणे असे की, अधिक उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय शेतीला पर्याय नाही. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. यांत्रिकीकरणाच्या जमान्यात दरवर्षी पशुधन कमी होत आहे. गावोगावी आता गायी, बल यांच्या संख्येपेक्षा मोटारसायकली, कार, ट्रॅक्टर यांची संख्या अधिक आहे. गायी, बल सांभाळण्यापेक्षा सरळ यंत्राने शेती करणे स्वस्त पडते असे आता शेतकऱ्यांना वाटू लागले आहे, त्यामुळे शेणखताचा वापर कमी झालेला आहे. जमिनीतील पालापाचोळा याचा उपयोग सेंद्रिय खतासाठी करता येऊ शकतो याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मोदी सरकारने स्वच्छ भारत ही संकल्पना मांडली. खेडेही स्वच्छ असले पाहिजे अशीही अपेक्षा व्यक्त केली. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहरात व ग्रामीण भागात निर्माण झालेल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली तर एकीकडे कचऱ्याचे व्यवस्थापन होईल व दुसरीकडे सेंद्रिय खताचा वापर शेतीसाठी केला जाईल. आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगळा करण्यातून आपण राष्ट्रीय कार्य करत आहोत अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण व्हायला हवी. या कामातून आम्ही देशभक्ती प्रकट करू शकतो हे िबबवण्याची गरज आहे. यातून सेंद्रिय खताची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होईल. रासायनिक खतासाठी कोटय़वधी रुपयांचे अनुदान सरकारने जाहीर केलेले आहे. सध्याच्या सरकारने सेंद्रिय शेतीसाठी १५०० रुपये प्रतिटन अनुदान जाहीर केले आहे. रासायनिक खत तयार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, मात्र सेंद्रिय खत मोठय़ा प्रमाणावर तयार करणाऱ्या कंपन्या पुढे येत नाहीत. देशातील पहिल्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पाचे प्रमुख लातूरच्या एमबीएफचे निलेश ठक्कर यांनी देशातील अनेक राज्यात सेंद्रिय शेतीकडे लोकांचा कल वाढत असून यातून रासायनिक खताचा वापर करून जे उत्पादन घेतले जाते, त्यापेक्षा अधिक उत्पादन घेण्याचा विक्रम अनेक शेतकरी करत असल्याचे सांगितले.
पूर्वी आपल्या देशात प्रत्येक शेतकरी स्वतला लागणारे खत स्वतच निर्माण करत होता. ती पद्धत आता उपयोगात आणण्याची गरज आहे. गांडूळ खतनिर्मिती, गांडूळ शेती असे प्रयोगही केले गेले पाहिजेत. आजरा येथील ऋषीकृषी तंत्राच्या शेतीचे पुरस्कत्रे मोहनराव देशपांडे यांनी अनेक प्रयोग केले आहेत. ‘मेक इन इंडिया’ चे आवाहन पंतप्रधान व मुख्यमंत्री करत आहेत. या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी सेंद्रिय शेतीपूरक धोरण राबवण्याची गरज आहे. वैज्ञानिक क्षेत्रात झालेली प्रगती लक्षात घेऊन कचऱ्यावर प्रक्रिया करून अतिशय कमी काळात कचरा कुजवून त्याचे खतात रूपांतर करता येते व तेही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. जगभर सेंद्रिय शेतीचा उगम हा भारतातून झाला असल्याचे मत व्यक्त केले जाते. दुर्दैवाने ‘तुझे आहे तुजपाशी, मात्र जागा चुकलाशी’ अशी अवस्था आपल्या देशाची झाली आहे.
सेंद्रिय अन्नपदार्थ वापरण्याकडे कमी प्रमाणात का असेना, लोकांचा कल वाढतो आहे. अशा पदार्थाना बाजारात वेगळी किंमत द्यायला ग्राहक तयार आहेत. देशी गायीच्या दूध, तुपाला अधिक पसे दिले जातात. शंभर टक्के सेंद्रिय शेतमालाला ग्राहक अधिक पसे देतो. मोठय़ा शहरात मॉलमध्येही सेंद्रिय स्वतंत्र विभाग विकसित होतो आहे. आयटी क्षेत्रातील तरुण मंडळी नोकरी सोडून सेंद्रिय शेती करण्यावर भर देत आहेत. ठिकठिकाणी असे प्रयोग होत आहेत व त्यात असे तरुण यशस्वी होत आहेत.
उदगीर येथील नावीन्यपूर्ण शेतीचे प्रणेते दिलीप कुलकर्णी यांनी शेतकऱ्यांवर आंतरराष्ट्रीय शेतीशास्त्र लादले गेल्यामुळे तो पुरता कोलमडून पडला आहे. निसर्गात सर्व सजीवसृष्टी जगण्याची एक साखळी आहे. समृद्ध पोषणातून ही अन्नसाखळी जपली जाते. मात्र अधिक उत्पादन घेण्याच्या प्रयत्नामध्ये ही साखळीच नष्ट झाली आहे. माती हे पिकांना पोषणतत्त्व पुरवण्याचे माध्यम आहे. रासायनिक खताच्या अतिरेकी वापरामुळे मातीतील हे पोषणतत्त्वच दिवसेंदिवस कमी होत आहे. रोग, किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निसर्गात मित्रकिडी व शत्रुकिडी निसर्गतच उपलब्ध आहेत, मात्र त्याचा शात्रशुद्ध वापर न केल्यामुळे ही साखळीही उद्ध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांचे परावलंबित्व कमी करण्यासाठी धोरण निश्चित केले पाहिजे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गावोगावी प्रशिक्षणवर्ग मोठय़ा प्रमाणावर घेतले जातील अशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. जीवामृत, गांडूळ खतनिर्मिती यासारख्या शेतकऱ्यांच्या शेतात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा कसा वापर करावा? याचे आपल्याकडीलच ज्ञान पुन्हा एकदा त्यांना नव्याने सांगण्याची गरज आहे.
शेतकऱ्यांचा हरवलेला आत्मविश्वास पुन्हा त्याला मिळवून देण्यासाठी सेंद्रिय शेती हा एक उत्तम मार्ग आहे. नकारात्मक बाबी शेतकऱ्यांसमोर वारंवार येतात. सभोवताली जे चांगले घडते आहे ती माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा स्वयंसेवी संस्था, कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, शास्त्रज्ञ व सरकार यांच्या समन्वयातून विकसित केली पाहिजे.

आदिवासींचे ज्ञान आत्मसात करण्याची गरज
भारतात जी सेंद्रिय शेती आहे, त्यापकी ८० टक्के क्षेत्राची जपणूक आदिवासी क्षेत्रातील मंडळी करतात. देशभरात आदिवासींची संख्या सुमारे २७ टक्के आहे. ही मंडळी पारंपरिक पद्धतीने शेती करतात. पिढय़ान्पिढय़ा बियाण्यांचे संवर्धन करत शेती करतात. बाजारात तूर बियाणे विकत घेऊन शेती करता येते हे त्यांच्या गावीही नाही. रासायनिक खते व कीटकनाशक वापरण्याची गरज त्यांना कधी भासत नाही. आदिवासींनी सांभाळलेले वाण अतिशय उच्च दर्जाचे असून शहरी भागातील मंडळी अतिरिक्त मूल्य देऊन हे धान्य खरेदी करतात. आदिवासींनी जपणूक केलेले वाण अभ्यासून ते देशभरातील शेतकऱ्यांना उपयोगी व्हावे यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Comrade Subhash Kakuste no more
सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

 

प्रदीप नणंदकर
pradeepnanandkar@gmail.com