कोकणात भरपूर पाऊस पडतो. आतासुद्धा तेवढाच पाऊस पडतो, पण नद्या मात्र एप्रिल-मेमध्येच आटतात. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेलीय त्याचा हा परिणाम म्हणायचा आणि काय? कोकणातील या गप्पा आता जलयुक्त शिवार योजनेच्या निमित्ताने खोटय़ा ठरत आहेत. या योजनेने टँकरग्रस्त गावांना दिशा मिळाली आहेच, पण तीन वर्षांपूर्वी टँकरग्रस्त असलेली गावेही आता आजूबाजूच्या परिसराची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्य़ात जलयुक्त योजनेतील कामांबाबत वर्षभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. साहजिकच या योजनेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायती, त्या गावातील लोकसहभाग, त्यातून झालेले श्रमदान याचे महत्त्व पटकन शून्यावर आले. पण अशा परिस्थितीतही येथील केतकी आणि कर्दे या गावांत निर्माण झालेली जलसाक्षरता खूपच वेगळी ठरते आहे. चिपळूण तालुक्यातील केतकी गाव कोकण विभागात प्रथम, तर दापोली तालुक्यातील कर्दे गाव जिल्ह्य़ात दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित झाले आहे.
मुळात ही दोन्ही गावे समुद्रकिनाऱ्याजवळ डोंगरात वसलेली. चिपळूण तालुक्यातील केतकी दाभोळ खाडीच्या मुखाजवळचे गाव. येथे जेवढा पाऊस धोधो पडतो, तेवढय़ाच वेगाने त्याचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. अनेक गावांत असलेले गायमुख अर्थात जिवंत पाण्याचा बारमाही झरा येथेही आढळतो. पण गेल्या काही वर्षांपासून हा झरा आटू लागला होता. पाणी एवढे कमी झाले की डोंगरावरील तीन वाडय़ांना अखेर टँकरग्रस्त होण्याची वेळ आली. वरचे पाणी आटल्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या वाडय़ांना समुद्रामुळे मचूळ होणाऱ्या पाण्यावर तहान भागवायला लागत होती. २०१५ मध्ये कृषी विभागाने गावासमोर जलयुक्तचा प्रस्ताव ठेवला आणि येथील परिस्थिती बदलण्याची चाहूल लागली.
केतकीच्या डोंगरमाथ्यावर सपाट मदानी प्रदेश आहे. फार पूर्वी येथे शेतकरी नाचणी, वरी अशी पिके घेत असत. पण शेती ओस पडली आणि तेथे जंगली झाडेझुडपे वाढू लागली. अनेकांनी फळबागाही तयार केल्या. या परिस्थितीत डोंगरमाथ्याच्या थोडय़ा खालच्या भागात असलेला बारमाही झरा मात्र दिवसेंदिवस क्षीण होताना ग्रामस्थांना दिसत होता. झऱ्याच्या त्या परिसरात असलेली मोठमोठी झाडे न तोडण्याबाबत ग्रामस्थांनी सहमती तयार केली होती. पण हे सर्व उपाय पाणीटंचाईचे संकट दूर करू शकले नाहीत.
२०१५ मध्ये जलयुक्त शिवार योजनेने मात्र गावाला अक्षरश: चमत्कार जाणवू लागला. या योजनेतून डोंगरमाथ्यावर समतल चर खोदण्यात आले. एक शेततळेही खोदले गेले. याचा परिणाम त्याच वर्षी झऱ्याचे पाणी वाढल्याने लगेच जाणवला. यानंतर जलस्रोत बळकटीकरणांतर्गत झऱ्याच्या संरक्षणासाठी बांधकाम करण्यात आले. गावात तीन ओहोळ आहेत. यातून पाण्याबरोबरच मातीही समुद्रात वाहून जाते. त्या प्रवाहाचा वेग कमी करण्याच्या दृष्टीने या ओहोळांमध्ये अनगढ दगडी बांध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या ओहोळात अक्षरश: पायऱ्या तयार होऊ लागल्या आहेत. यामध्ये हळूहळू पाण्याबरोबर येणारी माती जमू लागली आहे. या तिन्ही ओहोळांमध्ये शेकडोंनी बांध घातल्याने पाणी मुरण्याबरोबरच माती वाचवण्यासही मदत मिळाली आहे. विशेष म्हणजे हे सर्व काम ग्रामस्थांनी श्रमदानातून केले आहे. दोन वर्षांपूर्वी या कामामुळे गावाला टँकरमुक्ती मिळालीच, पण ज्या वाडय़ा पाण्यासाठी वणवण भटकत होत्या, तेथे आता दुबार पिके डोलू लागली आहेत. यासाठी फार वर्षांपूर्वी मोडीत निघालेली पाटाची व्यवस्थाही पुन्हा आस्तित्वात आली आहे. या पाण्याच्या जोरावर चवळी, घेवडा, पावटा, कुळीथचे क्षेत्र दहा-पंधरा गुंठय़ावरून सात हेक्टपर्यंत पोचले आहे. यामध्ये रामचंद्र भागणे, महादेव भागणे, रामचंद्र भुवड, शंकर भुवड यांच्यासारखे अनेक शेतकरी शिवार फुलवत आहेत. येथील सिमेंट बधाऱ्यात साचलेल्या पाण्याचे नियोजन आता नळपाणी योजनेत करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे.
केतकीप्रमाणेच दापोली तालुक्यातील कर्देदेखील समुद्रालगतचे गाव. पर्यटनासाठी प्रसिद्ध मुरुडला खेटून असलेल्या या गावातही पर्यटन उद्योग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. तेथे रोजगार वाढल्याने, गावातून शहराकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात थांबले. पण पाण्याची वाढती गरज भागवताना ग्रामपंचायतीचा गेल्या काही वर्षांपासून आटापिटा सुरू झाला. २०१५ मधील जलयुक्तमुळे त्यांच्याकडेही कायापालटास सुरुवात झाली. येथे डोंगरमाथ्यावरील पाणी प्रवाहाच्या क्षेत्रात एक मोठा माती नाला बांध बांधण्यात आला. शेकडोंनी समतल चर मारण्यात आले. त्यांनी मग िवधण विहीर घेतली. त्याला भरपूर पाणी लागले. या सगळ्याचा परिणाम असा झाला की आता घरोघर नळाने चोवीस तास पाणी मिळते आहे. त्यातून परसबागेतली फळझाडे, भाजीपाला वाढलाच, पण दूध व्यावसायिकही वाढू लागले. यामध्ये सुरेंद्र माने, जितेंद्र मिसाळ, दिनेश दुसार, शांताराम मिसाळ, सुभाष जोगळे, रघुनाथ खांबे, नारायण खांबे यांचे भाजीपाला प्रयत्न आदर्शवत ठरत आहेत. तसेच कच्चे बंधारेही श्रमदानातून निर्माण झाले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये आटणारी नदी आता बारमाहीच्या दिशेने घोडदौड करते आहे. चार वर्षांपूर्वी टँकरग्रस्ताच्या यादीतील हे गाव आता उद्योगांनाही पाणी देण्यासाठी सज्ज झाले आहे.
वरकस शेती सोडल्यानेच टंचाई
लोकांनी शेती सोडली आणि पाण्याचे दुíभक्ष तेव्हापासूनच खरे सुरू झाले, असे निष्कर्ष या गावांतील ग्रामस्थांच्या चच्रेतून पुढे आले आहेत. हे समतल चर मारून पाणी जिरवण्याची पद्धत आता आली आहे. पण हेच तंत्र येथील शेतकरी पूर्वापार डोंगरावरील नाचणी-वरीच्या शेतीतून राबवत होता. डोंगराला आडवे चर मारून या धान्य पिकांची होणारी लागवड म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवण्याचाच प्रकार होता. म्हणूनच विहिरीतील पाण्याची पातळी, नदीला मिळणारे झरे कधी आटत नसत. पण डोंगर उतारावरील ही वरकस शेती थांबली आणि पाणीटंचाई सुरू झाली, असे मत ग्रामस्थांनी या वेळी व्यक्त केले.
rajgopal.mayekar@gmail.com