पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देऊन नव्या उपक्रमाला हात घालण्याचा प्रयत्न सुजाण शेतकऱ्यांकडून होऊ लागला आहे. शेतीची एकूण अवस्था पाहता अशा मार्गाने जाणे क्रमप्राप्तही ठरत आहे. एखाद्या प्रगतिशील शेतकऱ्याने ज्या पद्धतीने पिकाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन अधिक उत्पन्न घेतले की, मग त्याचाच कित्ता इतरांकडून गिरवला जातो. असे करताना शेतीचे शास्त्र किती जाणून घेतले हा विषय मागे पडतो अन् केवळ उत्पादन वाढीलाच महत्त्व मिळत राहते. ही पद्धत बदलून आता शास्त्रोक्त, ज्ञानाधारित शेती करणारी एक चळवळ ग्रामीण भागामध्ये उभी राहू लागली आहे. नॉलेज सेंटरच्या नावाने चालणारा हा मळा शिवारात नवा रंग भरत असून तो शेतकऱ्यांचे जीवनमानच बदलून टाकत आहे. याची सुरुवात द्राक्ष पिकातून झाली असली तरी आता हे नॉलेज सेंटर डाळिंब, केळी, मिरची, ऊस, कापूस, फूलशेती अशा क्षेत्रातही मूळ धरू लागले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

उत्तम शेती करण्यासाठी खत, औषधे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा सल्ला घेतला जातो. त्याआधारे शेती उत्पादनात वाढ झाली की मग आजूबाजूचे शेतकरीही अशा प्रकारचेच उत्पादन घेत राहतात. पण त्यासाठी हवा असणारा शास्त्रोक्त अभ्यास मात्र दुर्लक्षित राहतो. केवळ पानाकडे पाहायचे, त्यावरून रोगाचे निदान करायचे आणि तद्अनुषंगाने  कीटकनाशक, बुरशीनाशक यांची फवारणी करून रोगाला आवर घालायचा, अशी एक पठडीबाज रीत शेतकऱ्यांमध्ये दिसते. पण, मुळातच रोग होतोच का, याचा थेट अभ्यास करण्याचे कष्ट शिवारात घेतले जात नाहीत. किंवा त्यांची माहिती असली तरी शास्त्रोक्त अंमलबजावणी करून त्याचे निराकरण करण्याकडे मात्र दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात आल्यावर शेती क्षेत्रामध्ये गांभीर्यपूर्वक काम करणाऱ्या काही मंडळींनी एकत्र येऊन ज्ञानाधारित शेती कसण्याचा निर्णय घेतला. खत, औषधनिर्मिती करणाऱ्या एका कंपनीचे पदाधिकारी, फळबागायतदार यांनी एकत्रित येऊन नॉलेज सेंटर सुरू केले. त्यासाठी त्यांनी पहिले काम द्राक्ष शेतीमध्ये करण्याचे ठरवले.

यातून त्यांनी जमीन आणि पाणी यावर प्रामुख्याने काम सुरू ठेवले. पाण्याचा किती, कसा वापर करायचा याची अचूक माहिती शेतकऱ्यांना नव्हती. पहिले लक्ष त्याकडेच दिले. पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे द्राक्ष पिकाची जमीन क्षारपड झाली होती. द्राक्ष बागायतदार दररोज २ तास पाणी पिकांना द्यायचे. द्राक्ष पिकाचे मूळ जमिनीखाली चार ते साडेचार फूट लांब इतके असते. पाणी ठिबकने दिले तरी पिकाच्या मुळाच्या २ फुटापर्यंत जाते आणि तेथेच साचून राहते. परिणामी, जमीन घट्ट होऊन क्षारपड बनते. मुळांची वाढ न होणे, परिणामी पीक रोगास बळी पडणे, हे प्रकार व्हायचे. खेरीज पाण्यातील क्षार, खताचे प्रमाण या भागात वाढल्याने जमिनीची वाहकताही चौपट वाढली. शास्त्रीय निकषाप्रमाणे ही वाहकता अर्धा ते एक इतकीच असणे अपेक्षित असते.

ही पद्धत बदलून ‘नॉलेज सेंटर’ने द्राक्ष पीक बागायतदारांना दररोज २ तासऐवजी एकदाच आठवडय़ातून एकदाच सलग ६ तास पाणी देण्याची सवय लावली. त्यामुळे पाणी मुळाच्या साडेचार फुटापर्यंत म्हणजे तळापर्यंत पोहचू लागले. या लॉँग/डीप एरिगेशन पद्धतीचे चांगले परिणाम दिसून आले. एक तर क्षाराचे प्रमाण कमी होऊन मुळापर्यंत पाणी पोहचल्याने पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. ऑक्सिजनचे प्रमाण अधिक प्रमाणात मुळापर्यंत पोहचले. सल्फरिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक अ‍ॅसिड, जिप्सम याचा डोस सुरू केला. तो ४५ दिवसांतून एकदा पिकानुसार, मातीच्या पोतानुसार दिला गेल्याने जमिनीतील क्षाराचे प्रमाण कमी झाले.

पान, देठ, माती यांचे वर्षांतून चार वेळा परीक्षण पिकाच्या वाढीनुसार केले जाते. त्यानुसार खतांचे डोस ठरविले जातात. त्यासाठी एक सॉप्टवेअर बनविले जात असून पिकाला लागणारी सर्व १६ प्रकारची अन्नद्रव्ये कधी, किती द्यायची याची अचूक माहिती मिळते. जमीन, पिकाची अवस्था, वातावरण, अन्नद्रव्य कमतरता याचा अभ्यास करून हे डोस निश्चित केले जातात. अशा पद्धतीने वैज्ञानिक शेती केल्याने त्याचे अनेक फायदे दिसून आले आहेत.

उत्पादनामध्ये चांगल्याप्रकारे वाढ झाली. त्याची गुणवत्ता, आकार, साखरेचे प्रमाण वाढले. पूर्वी आठ ते नऊ टन उत्पादन यायचे, ऐवजी आता १० ते ११ टन मिळू लागले आहे. द्राक्ष निर्यातीच्या बाजारात मध्यंतरी भारतीय उत्पादनाला गालबोट लागले होते. पण आता निर्यात योग्य दर्जाची द्राक्षे उत्पादित होऊन दरही चांगला मिळू लागला आहे. उत्पादन खर्चही १० टक्के व त्याहून अधिक कमी झाला आहे. विशेष म्हणजे शेतकरी आता शेतीची शास्त्रीय परिभाषा बोलू लागला आहे. विद्युत वाहकता, पाऊस मोजण्याचे यंत्र याकडे बारीकपणे लक्ष दिले जात आहे. अयोग्य, अवैज्ञानिक पद्धतीने होणारी द्राक्ष शेती बंद होऊन ज्ञानाधारित शास्त्रोक्त शेती होऊ लागल्याने शेतकरीही संपन्न बनत आहे.

अन्य पिकांच्या व्याप्तीमध्येही वाढ

शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्याचा उपक्रम केवळ द्राक्ष शेतीपुरता मर्यादित राहिला नाही. त्याची व्याप्ती अन्य पिकांमध्ये वाढत चालली आहे. ऊस, कापूस, डाळिंब, केळी, मिरची, फुलशेती अशा विविध प्रकारच्या पिकांमध्ये याचा अवलंब केला जात आहे. तेथेही संबंधित शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही पिकाच्या भरघोस, दर्जेदार उत्पादनासाठी शास्त्रशुद्ध शेती आवश्यक असल्याच्या सांगणाऱ्या आहेत.

द. आफ्रिकेतील प्रयोगाचे अनुकरण

हल्ली होऊ लागलेली ज्ञानाधारित शेती म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील द्राक्ष शेतीच्या प्रयोगाच्या अनुकरणाचे फळ आहे. या देशामध्ये द्राक्षाचे पीक मुबलक तर होतेच पण ते गुणवत्तापूर्ण असते. शास्त्रोक्त पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीला मिळालेले हे यश होय. ही बाब लक्षात आल्याने सुजाण शेतकऱ्यांचा एक गट दक्षिण आफ्रिकेची द्राक्ष शेती अभ्यासण्यासाठी गेला. त्यांनी तेथे द्राक्ष शेती शास्त्रोक्तरीत्या कशी फुलते याचा तपशीलवार अभ्यास केला. तेथे त्यांची भेट द्राक्ष शेतीचे वैज्ञानिक रॉड्रिगो ऑलिव्हा यांच्याशी झाली. भारतीय शेतकऱ्यांच्या विनंतीनुसार रॉड्रिगो प्रथम नाशिक जिल्हय़ाच्या द्राक्ष शेतीमध्ये आले. दक्षिण आफ्रिकेतील वातावरण, जमीन, पाण्याचा दर्जा व आपल्याकडील हेच घटक यामध्ये फरक असल्याने ज्ञानाधारित शेतीच्या उपक्रमाच्या यशाबाबत साशंकता होती. त्यामुळे रॉड्रिगो यांच्याकडे सोपवले गेलेले शेतीचे प्लॉटसुद्धा खराब जमीन असलेले, दुय्यम दर्जाचे, अल्प उत्पादन येणारे, कमी गुणवत्तेचे उत्पादन येणारे असे सदोष होते. पण त्यांनी शेतकऱ्यांकडून कसून मेहनत करवून घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने द्राक्ष शेती करवून घेतली आणि त्यातूनच उपरोक्त सारे फायदे दिसून आले आहेत. यामुळे सुरुवातीला नाशिक जिल्ह्य़ामध्ये ६० शेतकरी या उपक्रमात सहभागी झाले होते. एकाच पिकाच्या भरघोस, दर्जेदार वाढीमुळे या उपक्रमात नव्याने ९० शेतकऱ्यांची भर पडली आहे. नाशिक जिल्हय़ातील शेतकरी रॉड्रिगो सुपर ६० या मंचच्या नावाने एकत्रित आले आहेत, तर सांगली जिल्हय़ात पहिल्याच उपक्रमात ३० शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

dayanandlipare@gmail.com

Story img Loader