सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील माणगाव खोऱ्यातील माणगा बांबू आता पश्चिम घाटासह संपूर्ण दक्षिण भारताला गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे. निमित्त आहे ते राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माणगा मिशनचे. त्यासाठी थेट बंगळुरूचे भारतीय वन अनुसंधान व शिक्षण परिषद (आयसीएफआरई) माणगा संशोधन आणि विकास कार्यक्रमात सामील झाले आहे. यामुळे या अस्सल कोकणी बांबूच्या व्यावसायिक लागवडीला कोकणासह दक्षिण भारतात चालना मिळेलच, पण नव्या हरितक्रांतीचीही चाहूल लागेल.
आंबा, काजू, नारळ, चिकूएवढीच कोकणची ओळख सर्वाना माहित; पण सिंधुदुर्गच्या माणगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या दारात गणेशोत्सवापूर्वी व्यापाऱ्यांची रीघ लागते. अनेक शेतकरी आगाऊ रक्कम घेऊन व्यापाऱ्यांशी करार करतात; पण ती आंबा, काडू, नारळ उत्पादनासाठी नाही, तर माणग्या बांबूसाठी. या बांबूची एक काठी ५० ते ६० रुपयांना हे व्यापारी घाऊकात विकत घेतात आणि येथून या जिल्ह्य़ातून थोडेथोडके नव्हे, तर दरवर्षी तीन हजार ट्रक भरून माणगा बांबू इतर राज्यांत पाठवला जातो; पण लोकप्रिय नगदी पिकांच्या प्रचार-प्रसारात माणग्या बांबूची ही अर्थव्यवस्था आतापर्यंत दुर्लक्षितच राहिली आहे. असे असूनही त्याची व्यवसायिक प्रगती वर्षेनुवर्षे कूर्मगतीने सुरूच आहे. आज त्याचे व्यावसायिक महत्त्व राष्ट्रीय स्तरावरही मान्य झाले असून सरासरी दोन इंच जाडीची बारीक काठी असलेला हा माणगा बांबू देशातील सर्वोत्तम जातींमध्ये गणला जाऊ लागला आहे. पश्चिम घाटासह संपूर्ण दक्षिण भारतात त्याच्या लागवडीची शिफारस भारतीय वन अनुसंधान व शिक्षण परिषदेने (आयसीएफआरई) केली आहे.
मुळात बांबू म्हणजे उंच वाढणारे काटेरी गवत. माणगा मात्र बिनकाटेरी आहे. संपूर्ण देशात असे बिनकाटेरी व बारीक काठी असलेले बांबूचे दोनच प्रकार आढळतात. एक ईशान्येकडील ऑलिव्हरी आणि दुसरा सिंधुदुर्गातला माणगा. ३० ते ४० फूट वाढणारा हा माणगा बांबू बिनकाटेरी असतोच, पण त्याचे बेटही काहीसे विरळ असल्याने तोडणीही सुलभ असते. ते एकमेकांत अडकत नाहीत. त्याचा भरीवपणा त्याला टिकाऊपणा देतो. त्यातच दोन पेरांतील जास्त अंतर आणि पेरांची कमी जाडी यामुळे त्याला सुबकता येते.
काठीवरील वरच्या भागात निमुळती होत जाणारी गोलाई या बांबूमध्ये कमी प्रमाणात असते. त्यामुळे फर्निचर, बांधकाम यासह सर्वच कलाकुसरीच्या कामांत याचा चांगला वापर होतो. सध्या पर्यावरणपूरक साधनांच्या प्रसारात बांबूचे महत्त्व वाढते आहे. सध्या त्याचा वापर वेलींसाठी मांडव, भाजीपाल्यासाठी आधार, रेशीम उद्योगांत लागणारी मांडणी या शेतीपूरक कामांमध्ये मोठय़ा प्रमाणात होत असून आंध्र प्रदेश, गुजरात आणि राजस्थान येथून त्याला खूप मागणी आहे.
एवढी मोठी मागणी असताना माणगा बांबूच्या लागवडीला चालना का मिळाली नाही, हा प्रश्न स्वाभाविक आहे; पण माणग्याच्या विकासातील सर्वात मोठा अडसर ठरत होता तो त्याच्या रोपनिर्मितीचा. या बांबूच्या फुलोऱ्यातील मादी आणि नर फुलांचे व्यवस्थापन कठीण असल्याने बहुसंख्य माणग्या बांबूंना बिया धरत नाहीत. त्यामुळे इतर जातींसारखा याचा नैसर्गिकपणे प्रसार होत नाहीच, पण त्याच्या अधिक लागवडीलाही मर्यादा येतात. अनेकदा जेथे कंद तेथेच हा बांबू वाढत राहतो. या पाश्र्वभूमीवर बांबूची रोपे मोठय़ा संख्येने तयार करण्याचे आव्हान कृषी शास्त्रज्ञांसमोर होते. याबाबत संशोधन करून दापोलीच्या वनशास्त्र महाविद्यालयाने अखेर २०११मध्ये माणगा रोपनिर्मितीचे नवीन तंत्र विकसित केले. नियंत्रित वातावरणात उसाप्रमाणे लागवड करून माणगा बांबूच्या रोपांची निर्मिती त्यांनी शक्य केली. या पद्धतीमुळे शेडनेटगृहात बांबूच्या सशक्य पेरांचा बेणे म्हणून वापर होऊ लागला. त्यानंतर मोठय़ा संख्येने रोपनिर्मितीचा कार्यक्रम कोकण कृषी विद्यापीठातर्फे हाती घेण्यात आला; पण दिवसेंदिवस रोपांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी ही परिस्थिती कायमच राहिली. रोपांची ही मागणी स्वबळावर पूर्ण करणे, विद्यापीठाच्या आवाक्याबाहेर झाले. दुसऱ्या बाजूला माणगा बांबूचे व्यावसायिक महत्त्व आयसीएफआरईनेही मान्य केले. त्यांनी राष्ट्रीय स्तरावर शिफारस केलेल्या अठरा जातींमध्ये माणग्याचा अग्रक्रमाने समावेश केला.
या पाश्र्वभूमीवर माणगा बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे, यासाठी दापोलीच्या वन महाविद्यालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर रोपनिर्मिती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी या वर्षी सहा ठिकाणी पाचशे स्क्वेअर मीटरची शेडनेटगृह उभारण्यात आली असून येथे माणग्याची एकूण २५ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये दोडामार्ग, कुडाळ, रत्नागिरी जिल्ह्य़ातील दापोली, देवरूख आणि लांजा, तसेच पुणे जिल्ह्य़ातील भोर या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी मातृवृक्षांची उभारणी करण्यात आली आहे.
पुढील वर्षी यामध्ये आणखी सहा रोपवाटिकांचा समावेश होऊन एकूण ५० हजार रोपांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पावर प्रमुख संशोधक म्हणून सहयोगी प्राध्यापक डॉ. अजय राणे काम पाहत असून वन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश नारखेडे त्यांना मार्गदर्शन करतात.
माणग्याला कोकणच पोषक
माणगा बांबूला महाराष्ट्रातील उर्वरित भागापेक्षा कोकणातील हवामान पोषक ठरते. येथे हा बांबू पहिल्या चार वर्षांत दहा ते पंधरा मीटपर्यंत वाढतो; पण महाराष्ट्राच्या उर्वरित भागात हीच उंची सात ते आठ मीटरवर मर्यादित राहते. पहिल्या तोडीनंतर माणग्याला पुन्हा तोडणीसाठी तयार व्हायला कोकणात दोन वर्षे लागतात. त्यांना लागवडीपासून पहिल्याच वर्षी पाणी देण्याची गरज भासते. कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासात हे स्पष्ट झाल्याने कोकणसाठी माणगा वरदान ठरणार आहे.
टिश्यू कल्चर रोपांचेही संशोधन
माणग्यातील रोपनिर्मितीतील अडसर दूर करण्याच्या दृष्टीने संशोधन सुरू आहे. त्यातूनच बंगळुरूस्थित या संस्थेत आता टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने माणग्याच्या रोपांची निर्मिती शक्य झाली आहे. कोकण कृषी विद्यापीठाला हे तंत्रज्ञान देण्याची तयारी आयसीएफआरईने दाखवली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत माणग्याची टिश्यू कल्चर रोपेही कोकणात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राजगोपाल मयेकर – rajgopal.mayekar@gmail.com