कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रात आंबा वृक्षांची ‘सेंटर ओपिनग’ पद्धतीने छाटणी करून पालवी व्यवस्थापनाचे यशस्वी प्रयोग झाले आहेत. त्यामुळे आंबा गुणवत्तेबरोबरच उत्पादन वाढवण्यातही शास्त्रज्ञांनी यश मिळविले आहे. त्याचे प्रात्यक्षिक कोकणातील बागायतदारांच्या बागांमध्ये केल्याने या तंत्रज्ञानाच्या प्रसारासही हातभार लागला आहे. आता हेच पालवी व्यवस्थान रोपवाटिकेतील रोपांमध्येच करण्याचे प्रयोग सुरू करण्यात आले आहेत.
इस्रायली आंबा लागवड तंत्रज्ञानाच्या समन्वयाने आंबा छाटणीचे सुधारित तंत्र विकसित केल्यानंतर आता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आदर्श आंबा रोपवाटिकेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या तंत्रज्ञानात लहान अवस्थेतच कलमांचे पालवी व्यवस्थापन करण्यात येत असून भविष्यात वाढत्या वृक्षांचे व्यवस्थापन सोपे होऊ शकते. दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठात आंबा गुणवत्ता केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्यात इस्रायली आंबा लागवड तंत्रज्ञानाच्या समन्वयाने जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन, घन लागवड आणि आदर्श रोपवाटिका याबाबत संशोधन सुरू आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर जुन्या आंबा वृक्षांची खरड छाटणी करण्यात आली. त्यानंतर योग्य खत व्यवस्थापनाने त्यांचे तीन वष्रे पालवी व्यवस्थापन करण्यात आले. यामुळे झाडाची पालवी, फांद्याचे आणि कालांतराने फळ हाताळणी आवाक्यात आली. त्यातच बागांचे रूपांतर घन लागवडीत करण्यात यश आले. सध्या गुणवत्ता केंद्रातील अभ्यासानुसार आंबा झाडांतील अंतर पूर्वीच्या दहा बाय दहा मीटरवरून सात बाय सात मीटर अंतरावर आणण्यात आले आहे. तसेच सध्या येथे पाच बाय साडेपाच, पाच बाय साडेतीन आणि पाच बाय अडीच मीटर अंतरावरील घन लागवडीबाबतही संशोधन येथे सुरू आहे. या झाडांवर लागलेल्या फळांना कागदी पिशव्या बांधून फळाचा दर्जा वाढवण्याचे प्रयोगही या केंद्रात यशस्वी झाले आहे.
सध्या या केंद्रात आदर्श रोपवाटिका व्यवस्थापनाचे तंत्र विकसित होत असून त्यामध्ये चांगल्या आंबा कोयी, रोपांसाठी मोठय़ा पिशव्या आणि लहान अवस्थेतच रोपांचे पालवी व्यवस्थापन याविषयी संशोधन सुरू आहे. यापूर्वी एक वर्षांच्या कलमरोपांसाठी सहा बाय आठ इंचांच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत होत्या. आंबा गुणवत्ता केंद्राच्या संशोधनानुसार अशा पिशव्यांमध्ये रोपाची शाखीय वाढ खुंटते. त्याऐवजी दहा बाय चौदा इंचांच्या पिशव्यांमधील रोपांची शाखीय वाढ वेगाने होते. त्यामुळे लहान अवस्थेतच शेंडा खोडून रोपांचे पालवी व्यवस्थापन करणे सोपे जाते.
मुळात पालवीवर सूर्यप्रकाश किती पडतो, यावर आंबा झाडांची उत्पादन क्षमता ठरते. कोकणसह संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षांत आंबा लागवड मोठय़ा प्रमाणात झाली आहे. ही झाडे आता उंच वाढलेली असून त्यांची उत्पादन क्षमता कमी झाल्याची नाराजी सध्या बागायतदारांमध्ये व्यक्त होत आहे. त्याला अनुलक्षून या केंद्रात पालवी व्यवस्थापनावर विशेष भर दिला गेला. मोठय़ा वृक्षांची खरड छाटणी करून सर्व पालवीवर सूर्यप्रकाश पडावा, असे नियोजन केले गेले. त्यामुळे उंच झाडे आता मध्यम आकाराची झाली आहेत. या सर्व प्रक्रियेला तीन वर्षांचा कालावधी उलटतो. हे नुकसान सोसणे शक्य नसेल अशा बागायतदारांनी जुनी झाडे २४ फूट उंचीपर्यंत नियंत्रित करावीत आणि त्यांचे पालवी व्यवस्थापन करावे, असेही येथील तज्ज्ञांचे मत आहे. इस्रायलमध्ये हेच व्यवस्थापन रोपवाटिकेपासूनच केले जाते. त्यामुळे झाडाची वाढ सरळ न होता त्याचा आजूबाजूचा विस्तार अधिक होतो. त्याच तंत्रज्ञानाचा विचार करून आदर्श रोपनिर्मिती पद्धत विकसित करण्यात येत आहे. कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पराग हळदणकर प्रकल्पप्रमुख तर महेश कुलकर्णी हे केंद्र समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
rajgopal.mayekar@gmail.com