रासायनिक खते, कीटकनाशकांशिवाय शेती ही संकल्पनाच शेतकऱ्यांना सहजरीत्या मान्य होत नाही. सेंद्रीय शेती असो किंवा नैसर्गिक शेती, या पद्धतीच्या वापराविषयी अनेक समज-गैरसमज आधीपासूनच पसरलेले. पारंपरिक शेतीच्या जोखडात अडकलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढणे कठीण मानले गेले. पण, अलीकडच्या काळात शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढू लागली आहे. शेती सुधारणांकडे शेतकरी लक्ष देऊ लागले आहेत. बायोडायनॅमिक शेती हा सेंद्रीय शेतीचा विस्तारीत भाग. ही पद्धती जुनीच. पण, भारतात अलीकडच्या काळात अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होऊ लागली आहे. सेंद्रीय शेतीविषयी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचत नाही. या शेतीचा प्रयोग करणारा शेतकरी एकदा जरी अपयशी ठरला की, त्याची चर्चा झपाटय़ाने पसरते. उत्सुक शेतकऱ्यांमध्येही नैराश्य येते. मुळात शेतीशास्त्र हे भारतीयांना वर्षांनुवष्रे अनुभवातून मिळत गेले आहे. भारतीय पूर्वज ज्या पद्धतीने शेती करीत, त्याविषयी अभ्यास करून पाश्चात्य अभ्यासकांनीही त्याची स्तुती केली आहे. पण, भारतात मात्र या शेती पद्धतीला त्याज्य ठरवले गेले. रासायनिक खते, कीड व रोगनाशके, तणनाशके यांच्या वापराकडे अधिक लक्ष दिले गेले. हेक्टरी उत्पादकता वाढल्याचे पाहून बहुतांश शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे कल दर्शवला. पण, आता त्याचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अर्निबध वापरामुळे मृदा आरोग्य बिघडले आहे. पिकांसाठी आवश्यक सूक्ष्म जिवाणू नष्ट होत चालले आहेत. उत्पादकतेवरही परिणाम होऊ लागला आहे. रासायनिक खतांमधून पिकांची भूक भागते का?, कीडरोग नियंत्रणाचे सोपे उपाय कोणते आहेत? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडतात. आर्थिक नुकसान होईल, हे गृहित धरून विषारी औषधाची फवारणी केल्याने मित्र कीड, मित्र बुरशी मोठय़ा प्रमाणावर नष्ट होते आणि निसर्गाचे संतुलन बिघडते, हे शेतकऱ्यांना समजावून सांगून त्यासाठी नेमके काय करावे याचे मार्गदर्शक प्रात्यक्षिकासह व्यापक स्वरूपात करणे आवश्यक होते. पण, या मार्गदर्शनाअभावी शेतीचे नुकसानच झाले.

विषारी कीटकनाशकांची प्रमाणाबाहेर फवारणी केल्यास काय दुष्परिणाम होतात, हे आता शेतकऱ्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे. रासायनिक शेतीत विविध पिकांच्या वाढीसाठी लागणाऱ्या मुख्य आणि सूक्ष्म मूल्यद्रव्यांची गरज मोजली जाते, त्यानुसार ही मूलद्रव्ये बाहेरून दिली जातात. पण, त्यातील नेमकी किती वापरली जातात, किती वाया जातात, त्यातील घटकांमुळे किती गांडुळे, सूक्ष्म जिवाणू आणि जमिनीतील जीवसृष्टीवर परिणाम होतो, याचा विचार केला जात नाही. पण, सेंद्रिय आणि बायोडायनॅमिक पद्धतीत समग्र पिकांचा, त्यांच्या अंतर्बाह्य रचनेचा, नैसर्गिक संतुलनाचा विचार करण्यात आला आहे, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रात वर्ग विकास समितीमार्फत सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम होत आहे. संस्थेचे संस्थापक संजय रोमन आहेत. त्यांच्या पुढाकारातून धुळे जिल्ह्यात कामाला सुरुवात झाली. सर्ग या संस्थेच्या कामाला बायोडायनॅमिक शेतीपद्धतीबाबत मार्गदर्शक संस्था म्हणून देशपातळीवर ओळखले जाते. सेंद्रिय शेतमाल उत्पादकांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी संस्थेचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील २५ गावांमध्ये कृषी समृद्धी प्रकल्पाअंतर्गत बायोडायनॅमिक शेतीचा प्रसार करण्यात आला. गावातील शेणखताच्या ढिगाचे दर्जेदार कंपोस्टमध्ये रूपांतर करणे, बीज प्रक्रिया, कंपोस्ट कल्चर, पीक पोषणासाठी लागणारी महत्त्वाची निविष्ठा तयार करणे, भूसुधार या गोष्टी आता शेतकरी शिकू लागले आहेत. या पद्धतीतून पीक व्यवस्थापन खर्चात बचत होत असून पिकांची वाढ आणि उत्पादनही सुधारल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. शेतीतज्ज्ञ दिलीपराव देशमुख सांगतात, रूडॉल्फ स्टायनर या शास्त्रज्ञाने १९२५ मध्ये बायोडायनॅमिक पद्धतीची मूलतत्त्वे सांगितली होती. अवकाशातील ब्रह्मांडीय शक्ती (कॉस्मिक एनर्जी)च्या सहाय्याने जीवित शक्तीबरोबर (गांडूळ, सूक्ष्मजिवाणू, पशु, पक्षी, मानव) केलेल्या शेतीच्या विज्ञानास बायोडायनॅमिक (जैवऊर्जा) शेती म्हणतात. जगातील ७० देशांमध्ये बायोडायनॅमिक शेती केली जाते. ही सेंद्रिय शेतीची पुढची पायरी आहे.

गेल्या १०-१५ वर्षांपासून युरोपियन देश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड इत्यादी देशांत शेतकरी या पद्धतीचा वापर करतात. अवकाशातील ग्रह, नक्षत्र, रास यांच्या शक्तीचा प्रभाव पृथ्वीवरील १० सेंटीमीटर जमिनीच्या खालील सूक्ष्मजीव सृष्टी, गांडुळे इत्यादी जीवजंतूंवर, उपलब्ध ओलाव्यावर पडत असतो. बायोडायनॅमिक असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी त्याची दिनदर्शिका प्रसिद्ध करीत असते. त्यात शेतीमध्ये पेरणी, फवारणी, खत देणे, छाटणी, मशागत इत्यादी कामे कोणत्या दिवशी करावीत, याची माहिती दिली जाते. शिफारस केलेल्या तारखेस ते काम केले, तर पीक उत्पादन वाढते. मालाची प्रत सुधारते आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी जाणवतो. पौर्णिमा, अमावस्या, चंद्र शनिसमोर सरळ रेषेत असताना, चंद्र दक्षिणायन व उत्तरायणात असताना शेतीची कोणती कामे करावीत, याचे वेळापत्रक ठरले आहे. या सर्व बाबींचा अवलंब केल्यास पिकाचे उत्पन्न ५ ते १८ टक्क्यांपर्यंत वाढते. देशमुख यांच्या मते, माणूस आणि वनस्पतीत फार फरक नाही. वनस्पती श्वास पानातील स्टोमॅटोने घेतात. पोटाशिवाय अन्नाचे पचन करतात. स्नायुविना हालचाल करतात. त्यांना मज्जासंस्था, भावनाही असल्याचे क्लीन बॅकस्टर या शास्त्रज्ञाने गॅलॅव्हॅनो मीटर लाय डिटेक्टरच्या सहाय्याने सिद्ध केले आहे. बॅरन हॅरझेले या शास्त्रज्ञाने ‘थिअरी ऑफ ट्रान्सम्युटेशन’ या सिद्धांतामधून जमिनीतील सूक्ष्म जिवाणू पिकांचा आवश्यक असणारी सर्वच मूलद्रव्ये उपलब्ध करून देतात, हे दाखवून दिले आहे. पिकांना विशिष्ट मूलद्रव्याची गरज असेल, तर जादा प्रमाणात उपलब्ध असलेल्या मूलद्रव्यांचे रुपांतर गरज असलेल्या मूलद्रव्यात करण्याची क्षमता ही सूक्ष्म जिवाणूंमध्ये असते. कॅल्शिअमचे रुपांतर पालाशमध्ये स्फूरदचे मॅग्नेशियममध्ये रुपांतर ते करू शकतात. म्हणजे सूक्ष्म जिवाणूंची विविधता, संख्या जमिनीत असेल, तर ही मूलद्रव्ये बाहेरून टाकण्याची गरज नाही. वनस्पतीच्या तंतूमुळांमध्ये जे जिवाणू असतात. ते मेंदूप्रमाणे कार्य करतात. त्याद्वारे संदेश ग्रहण करणे, हालचालींवर नियंत्रण करणे वनस्पतींना जमते. चेन्नईच्या डॉ. टी.सी. सिंह यांनी संगीताच्या लहरींमधून पीकवाढीवर परिणाम होतो, हे सिद्ध केले आहे. रासायनिक शेतीचा प्रभावी, उपयुक्त व फायदेशीर पर्याय बायोडायनॅमिक शेती हा आहे. सेंद्रिय पद्धतीला बायोडायनॅमिक पद्धतीची जोड देऊन शेतकऱ्यांनी शेती करावी. त्यामध्ये बायोडायनॅमिक कंपोस्ट, सीपीपी, बायोडायनॅमिक प्रिपरेशन्स, द्रवखत, कीटकनाशक, वृक्षलेप, मिश्र पीक, हिरवळीचे खत, जैविक औषधे, आच्छादन, पंचगव्य, दशपर्णी, शेण, गोमूत्र इत्यादी निविष्ठांचा योग्य पद्धतीने योग्य वेळी वापर केला जातो. या सर्व निविष्ठा शेतकरी स्वत:ही शेतांवर तयार करू शकतो. त्यामुळे ही पद्धती विना कर्जाची, जास्त निव्वळ नफा मिळवून देणारी आहे, असे देशमुख यांचे म्हणणे आहे.

मोहन अटाळकर

mohan.atalkar@expressindia.com

Story img Loader