शेतजमीन थोडकी. करायचे काय या शेतीत? असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावतो. पण, अल्पभूधारणा असूनही त्यात हिरवा मळा फुलवता येतो. धरणीमातेला हिरवा शालू नेसवून घरालाही बरकत आणता येते, हे एका प्रयोगशील शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. बुवाचे वाठार, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथील शंकरराव शिंदे यांनी कृतीद्वारे अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.

ऊस शेतीत माती परीक्षणानुसार एसेन्रा तंत्रज्ञानाचा वापर केल्याने १५ गुंठे क्षेत्रात ४५ टन उसाचे उत्पादन मिळाले. शेतीवर केलेल्या निस्सीम प्रेमाचे फळ आहे, असे मी मानतो. गेली दहा वष्रे सलग विक्रमी उत्पादनाची परंपरा या वर्षीही कायम राखलेली आहे. यापूर्वी मला २०१४-१५ चा सुरू हंगामातील राज्यातील पहिला क्रमांक मिळून वसंतराव नाईक पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. ऊस शेतीने मला आयुष्यात सर्व काही दिलेले आहे, असे अभिमानाने सांगणाऱ्या शंकरराव शिंदे यांची  ही यशोगाथा.

नरंदेच्या शरद सहकारी साखर कारखान्याच्या पिछाडीस बुवाचे वाठार हद्दीत शिंदे यांची शेती. ऊस, केळी आणि काही आंतरपिके ही त्यांच्या शेतीची वैशिष्टय़े. शेतात राहून शेतीबरोबर गावात राजकारण, समाजकारणात सक्रिय सहभागही त्यांचा असतो. ऊस शेतीमध्ये अथक प्रयोग केल्याने विक्रमी उत्पादनामुळे त्यांचा शेतीला महत्त्व प्राप्त न होईल तर नवल. १५ गुंठे क्षेत्रात ४५ टन ७४० किलो इतके उत्पादन मिळाले. यामुळे अवघ्या १६ महिन्यात ऊस शेतीतून सव्वा लाखाचे उत्पन्न कसे मिळवता येते याचा वस्तुपाठ शिंदे यांनी घालून दिला  आहे.

कृषिशास्त्राच्या आणि कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार शेती केली जाते. लागणीपूर्वी शेणखत, उभी-आडवी नांगरट आणि घातीनुसार जमिनीची केलेली बांधणी यावर विशेष भर असतो. बेसल डोस आणि तत्पूर्वी दहा दिवस शेतात मेंढय़ा बसविल्या होत्या. रोटर-बांडगे करून साडेचार फुटी सऱ्या सोडल्या होत्या. एक फुटावर एक डोळा या पद्धतीने १५ जून, २०१५ ला उसाच्या को- ८६०३२ या व्हरायटीची लागण केली. बेसल डोसमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला होता.या लागणीच्या वेळीच आंतरपीक म्हणून सरीच्या भोंडावर भुईमुगाची टोकण केले होते.

ऊस भरणीपूर्वी भुईमुगाची काढणी करण्यात आली. यामधून घर खर्चापुरते भुईमूग निघाले. यानंतर माती परीक्षणानुसार भरणीसाठी जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा देण्यात आली. पावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने भरणी करण्यात आली. हा डोस हेव्ही होता, पण त्याचे रिझल्ट फार चांगले आले. ऊस लागणीनंतर ऊस वाढीसाठी व कीड व कीटकनाशकासाठी चार आळवणी व चार फवारणी करण्यात आल्या. उसाला ठिबकच्या साहाय्याने पाणी देण्यात आले. दररोज दोन तास ठिबकद्वारे पाणी देण्यात आले.

उसाची संपूर्ण वाढ झाल्यानंतर उसाची लांबी साधारणपणे २३ फुटापर्यंत वाढली होती, तर पेऱ्याची संख्या ४८-४९ इतकी होती. कारखान्याचा गळीप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस गाळपासाठी वारणा सहकारी साखर कारखान्याकडे पाठविण्यात आला. ऊस वजन केल्यानंतर सर्वच वजावट जाता ४५ टन ७४० किलो इतके वजन भरले. साधारणपणे तीन टनाप्रमाणे उतारा मिळाला. १५ गुंठय़ामध्ये साधारणपणे सव्वा लाखाचे उत्पन्न मिळाले आहे.

प्रत्येक वर्षी चढत्या क्रमाने उत्पादन मिळते आहे. कुटुंबातील सर्व जण शेतात राबतात. पण बापूसाहेब कृषी सेवा केंद्राचे मदन अनुसे आणि वडील मारुती शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे ऊसभूषण पुरस्कारासह ऊस शेतीमध्ये चांगली कामगिरी करू शकलो, असे शिंदे नमूद करतात.

दयानंद लिपारे dayanandlipare@gmail.com

Story img Loader