महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्काराने गौरविलेले नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक बाळासाहेब मराळे यांच्या शिरपेचात पुन्हा एक तुरा खोवला गेला आहे. मराळे यांनी निवड पद्धतीद्वारे विकसित केलेल्या रोहित-१ शेवगा वाणाची केंद्र शासनाच्या विज्ञान आणि प्रायोगिक विभागांतर्गत काम करणाऱ्या अहमदाबाद येथील राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठानने दखल घेतली आहे. त्यांच्यामार्फत गुजरातमधील सर्व कृषी विद्यापीठात या वाणावर अधिक अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. महाराष्ट्रातील एका खेडय़ात राहणाऱ्या शेतकऱ्याचा हा निश्चितच मोठा सन्मान होय.
सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील वावी गावापासून उत्तरेला आठ किमी अंतरावर शहा गाव आहे. गाव परिसर अवर्षणग्रस्त. अशा ठिकाणी सुमारे १५ वर्षांपासून मराळे शेवग्याची शेती, त्यामध्ये विविध प्रयोग व संशोधनाचे काम करत आहेत. आज बाळासाहेब मराळे या नावाला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली असली तरी इथपर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच कष्टप्रद म्हणावा लागेल. वडील शेतकरी असले तरी माध्यमिक शाळेपर्यंत मराळे यांचा शेतीशी कधी संबंधच आला नव्हता. आयटीआय उत्तीर्ण झाल्यावर पुणे येथे एका खासगी कंपनीत हंगामी कामगार म्हणून ते काम करू लागले. १९९८ मध्ये मंदीत त्यांची नोकरी गेली. पुण्यात आहे तोपर्यंत शहर फिरावे म्हणून एकदा ते गुलटेकडी बाजारपेठेत गेले. तामिळनाडूतून ट्रकच्या ट्रक भरून आलेल्या शेवग्याच्या शेंगा त्यांनी पाहिल्या. शहा गावात शेवग्याच्या शेंगांना कोणी विचारतही नव्हते. त्यांची विक्रीही होत नसे. तामिळनाडूतील शेतकरी पुण्यात येऊन शेवग्याची विक्री करत असताना आपल्या भागातील शेतकरी लागवड का करत नाही, असा त्यांना प्रश्न पडला. उत्सुकतेमुळे मराळे यांनी शेवगा पिकाचे अर्थशास्त्र तपासण्यास सुरुवात केली. किती पाणी द्यावे लागते, एकरी उत्पन्न किती येऊ शकते याविषयी ते माहिती जमा करू लागले. त्यासाठी केरळ, कर्नाटक, तामिळनाडूतील अनेक शेवगा उत्पादक तसेच कृषी विद्यापीठांना त्यांनी भेट दिली. १९९८ मध्ये चेन्नईत कुमार नागराजन या शेतकऱ्याकडे त्यांनी ४० एकरात असलेली शेवगा शेती पाहिली. मार्च, एप्रिल, मे उन्हाळी कालावधीत शेवग्याला पाणी मिळाले नाही तरी झाड मरत नाही. फक्त त्या कालावधीत शेंगा येत नाहीत हे मराळे यांना समजले.
शहा परिसरातील गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण. अशा ठिकाणी शेवगा शेती हाच पर्याय असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांची १२ एकर कोरडवाहू शेती. वडील पावसाच्या पाण्यावर बाजरी, मठ, मूग, कुळिथ असे पारंपरिक पीक घेत. वर्षभर राबूनही हाती केवळ दहा हजार रुपये पडत. कुटुंब चालविण्यासाठी मग आई, वहिनी यांना इतरांच्या शेतीवर मजुरीसाठी जावे लागे. मराळे यांनी शेवगा शेती करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर सर्वानी त्यांना कडाडून विरोध केला. कारण, व्यापारी पीक म्हणून तेव्हा कोणी शेवगा शेती करत नव्हते. शेतीऐवजी कुठेही, कोणतीही नोकरी करावी हे कुटुंबातील सदस्यांचे मत. परंतु, मराळे यांचा स्वत:वर विश्वास असल्याने सर्वाचा विरोध झुगारून १९९९ मध्ये त्यांनी आपल्या मुरमाड, खडकाळ जमिनीत शेवगा लावला. सहा महिन्यांनी उत्पादन सुरू झाले. आठवडे बाजारात शेंगांची १५-१६ रुपये किलो दराने विक्री केली. लागवडीचा खर्च वजा जाता पहिल्या सहा महिन्यातच ४० हजार रुपये मिळाले. या चमत्काराने शेवगा शेतीला विरोध करणारे कुटुंबातील सदस्य आनंदी झाले. त्यानंतर मराळे यांच्या प्रगतीत भरच पडत गेली. २००३ पासून त्यांच्या शेवग्याने निर्यातदारांमार्फत लंडन, पॅरिसचा बाजार गाठला. एकरी एक ते दीड लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळू लागले.
त्यावेळी शेवग्याच्या प्रचलित वाणांमध्ये काही दोष होते. त्यांचा अभ्यास करून प्रयोगातून मराळे यांनी २००५ मध्ये रोहित-१ हा नवीन वाण निवड पद्धतीने विकसित केला. २०१०मध्ये या वाणास तामिळनाडू कृषी विद्यापीठाने मान्यता दिली. लागवडीपासून सहा महिन्यात उत्पन्न, वर्षांत दोन बहर, दीड ते दोन फूट लांबी, स्वादिष्ट चव, अधिक टिकवण क्षमता, गर्द हिरवा रंग, निर्यातक्षम गुणधर्म. लागवडीपासून दहा वर्षे उत्पन्न ही वैशिष्टय़े या वाणात आहे. पहिल्या सहा महिन्यातच प्रति झाड १० ते १५ किलो उत्पन्न मिळते. याशिवाय कमी पाणी, अवर्षणग्रस्त स्थितीतही भरघोस उत्पादन देण्याची क्षमता यामुळे राज्यातील कोरडवाहू शेतीला एका नवीन पिकाचा पर्याय मराळे यांनी आपल्या संशोधनातून उपलब्ध करून दिला आहे.
सुमारे १७ वर्षांपासून मराळे हे शेवगा शेती करत आहेत. शेवगा शेंगांना वर्षभर ३० ते ६० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. निर्यातीत अधिक फायदा मिळतो. मराळे यांनी आता २२ लाख लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे. संपूर्ण शेती ठिबक सिंचनवर अवलंबून आहे. मिळालेल्या उत्पन्नातून ते शेतीसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यावर भर देऊ लागले. त्यांचे कमी पाण्यातील व कमी खर्चातील शेवगा पिकातील प्रयोग पाहण्यासाठी देशभरातील शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेत असतात. चार-पाच वर्षांत गुजरातमधील आनंद, अंकलेश्वर, बडोदा, अहमदाबाद, राजकोट, कच्छ येथील शेतकऱ्यांनी मराळे यांच्या शेतीला भेट देऊन गुजरातमध्ये रोहित-१ या शेवगा वाणाची रोपे नेऊन लागवड केली. तेथील शेतकऱ्यांना या वाणापासून अधिक दर्जेदार व भरघोस उत्पन्न मिळाले. इतकेच नव्हे तर अहमदाबादमधून या वाणाच्या रोपांची दुबई, अबुधाबी, मस्कत येथे निर्यातही होत आहे. जपान, श्रीलंका येथील शेतकरी, संशोधकांनीही मराळे यांच्या शेतीला भेट दिली आहे. शेतीच्या अधिक अभ्यासासाठी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने त्यांना जर्मनी, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया, नेदरलँड या देशांचा दौरा करता आला. शेवगा शेतीला पूरक रोहित-१ रोपांची निर्मिती व विक्री, शेततळ्यात मत्स्यपालन, दुग्धोत्पादन हे व्यवसाय त्यांनी सुरू केले आहेत. केंद्र शासनाच्या विज्ञान आणि प्रायोगिक विभागांतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी गुजरातमधील रोहित-१ शेवगा वाणाच्या शेतीची पाहणी केली. या पाहणीदरम्यान तेथील शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना मराळे यांच्या शेवगा संशोधन कार्याची माहिती दिली. प्रतिष्ठानचे अधिकारी डॉ. विवेक कुमार यांनी स्वत:हून मराळे यांच्या शेवगा पिकातील संशोधन कार्याची दखल घेत त्यास अधिक गती देण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. त्या अनुषंगाने या प्रतिष्ठानमार्फत गुजरातमधील सर्व कृषी विद्यापीठांच्या प्र-क्षेत्रावर रोहित-१ वाणाची लागवड करून त्यावर अधिक अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. याशिवाय २०१७ मध्ये नवी दिल्ली येथे भरणाऱ्या जागतिक दर्जाच्या संशोधक शेतकरी परिषदेत या विषयाचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
उत्पादक ते संशोधक
राष्ट्रीय नवप्रवर्तक प्रतिष्ठान ही भारत सरकारची स्वायत्त संस्था असून ही संस्था अल्पशिक्षित संशोधकांनी केलेले समाज उपयोगी कोणत्याही संशोधनासाठी (उदा. नवीन पीक, वाणाच्या जाती, यंत्र) मदत करते. अशा संशोधकाच्या संशोधनाला त्याचे हक्क व अधिकार प्राप्त करून देण्याचे काम करते. शेतकऱ्यांनी पाच ते दहा जणांचा गट तयार करून शेवगा शेतीची लागवड केल्यास इतरत्र बाजारपेठेत विक्री करणे अधिक योग्य ठरते, असे मराळे यांचे मत आहे. शेती परवडत नाही. शेतीतून पैसा येत नाही. अशी बहुतेकांची ओरड असते. अशा निराश झालेल्या मनांना मराळे यांच्यासारख्या एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाचा शेवगा उत्पादक ते संशोधक असा प्रवास नक्कीच प्रेरणा देईल.
avinashpatil@expressindia.com