शेती व्यवसाय बेभरवशाचा, न परवडणारा अशी सद्य:स्थिती असली तरी तो किफायतशीर आणि बाजारपेठेचा अंदाज घेऊन केला तर लाभदायी ठरू शकते. तासगावपासून हाकेच्या अंतरावर असलेले चिंचणी हे खेडेगाव. माळरानात कुसळही उगवत नाहीत असा दृढ समज असलेल्या या गावात आज द्राक्षबागांनी काही परिसर हिरवा केला असला तरी अवर्षणग्रस्त असलेला हा भाग आजही पाण्यासाठी तळमळतोय. याच गावातील पंचविशीतील विशाल विश्वनाथ िशदे हा तरुण. पाण्याअभावी जिराईत रानाशी आणि निसर्गाशी संघर्ष करीत कसे तरी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मात्र वडिलांचे निधन झाल्याने घरच्या शेतीशी मागील पिढीसारखेच खस्ता खात जगण्याचे नशिबी आलेले. मात्र या स्थितीवरही मात करण्याची जिद्द मनाला गप्प बसू देत नव्हती. पारंपरिक पद्धतीने शेती केली तर जगण्यासाठी रोजगार आलाच. हा रोजगार करीत असताना वाचनाचा आनंद आणि तोही शेतीला उपयुक्त ठरेल असा मिळवीत गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचन करीत असताना देशी म्हणजेच खिलार गाईची उपयोजिता लक्षात आली. आज बाजारात असलेल्या संकरित गाईची आणि खिलार गाईमधील फरक लक्षात आला आणि त्याने ठरविले. घरच्या दावणीला असलेल्या गाईची पदास वाढविण्याचे. दावणीला एकामागोमाग चार गाई गेल्या पाच वर्षांत केल्या. आज दावणीला हाताला झेपेल या प्रमाणात चार गाई, २ कालवड, ३ खोंड असा बारदाना वाढविला आहे.

गाईचा वापर केवळ दुधासाठी न करता याचा सेंद्रिय शेतीसाठीही वापर करता येऊ शकतो. हे त्यांने घरच्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून सिद्ध केले आहे. कधी पपई, तर कधी शेवगा या पिकांना गोमय, गोमूत्र आणि गाईच्या दुधापासून तयार केलेले ताक यांचा वापर करून जमिनीचा पोत सुधारता येतो हे त्यांने दाखवून दिले आहे.

द्राक्ष वेलीला फळ तजेलदार आणि गुणवत्तापूर्ण येण्यासाठी आणि उत्पादन वाढीबरोबरच जमिनीमध्ये मित्र जिवाणूची पदास वाढविण्यासाठी जिवामृताचा वापर करण्यात येतो. रासायनिक खतांचा वापर केला तर त्याच्या तात्कालिक फायद्यापेक्षा दीर्घकालीन अनिष्ट परिणामांना तोंड द्यावे लागते. यामुळे कमीत कमी औषधांचा वापर करीत रासायनिक खतांचा वापर न करतासुद्धा उत्पादन वाढ करता येऊ शकते.

जिवामृतमध्ये वापरण्यात येणारे घटकही स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणारे आहेत. यामध्ये दहा लिटर गोमूत्र, १० किलो गोमय, १ किलो हरभरा डाळीचे पीठ, १ किलो काळा गूळ, १ लिटर ताक आणि एक किलो बांधावरील माती यांचे मिश्रण करायचे आणि त्याचा पिकांच्या मुळाशी केला तर पिकाच्या वाढीसाठी लाभदायी ठरू शकते हे अनुभवाने सिद्ध केले आहे. यामुळे परिसरातील द्राक्ष बागायतदार गोमूत्र आणि गोमयाची मागणी आगाऊ नोंदवीत असतात. यामुळे जिवाणूंची संख्या वाढण्याबरोबरच जमिनीत नसíगकरीत्या गांडुळाचीही संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

केवळ जमिनीतच वापर केला जातो असे नाही तर १०० लिटर पाण्यात २ लिटर गोमूत्र आणि २ लिटर ताक मिसळून पिकांवर फवारणी केली तरी पिकाला आवश्यक असलेले पालाश हे मूलद्रव्य सहज उपलब्ध होत असल्याने पिवळे पडण्याचा धोका टाळता येऊ शकतो. ताकाचा वापर कीटकनाशकांसारखा होत असल्याचे दिसून येते. आज गाईपासून मिळणाऱ्या शेणखतामुळे जमिनीला दुसरे कोणत्याही रासायनिक खतांची गरज नसल्याचे विशाल सांगतो. घरची जमीन चार एकर आहे. या चार एकरांत वेगवेगळी पिके घेत असताना बाजारपेठेचा अभ्यासही केला. सध्या तीन एकर उसाची लागवड केली असून उसालाही याच पद्धतीने खत, फवारणी करण्यात येत आहे. याचबरोबर एक एकरात विजयवन जातीच्या शेवगा पिकाची लागवड केली आहे.

शणखताचा पुरेपूर वापर केला असल्याने शेवगा उत्पादनही चांगले मिळत आहे. स्थानिक बाजारात शेवग्याला मागणीही चांगली आहे. दर सोमवारी आणि गुरुवारी एक एकरातून सुमारे २०० किलो शेवगा उत्पादन होत असून तासगाव आणि कोल्हापूरच्या बाजारात प्रतिकिलो ३० ते ४५ रुपये दर मिळत आहे. बारमाही शेवगा लागवड असल्याने दुधाच्या रतिबासारखे उत्पादन मिळत असल्याने दैनंदिन गरजा भागविणे शक्य झाले असल्याचे विशालने सांगितले.

केवळ पारंपरिक पद्धतीने शेती करण्यापेक्षा स्वत: वाचन करीत आजूबाजूला कशाची गरज आहे, वेगळे काय दिले तर ग्राहक आपल्याकडे आकृष्ट होईल याचा विचार करून नवनवीन प्रयोग केले तर शेतीही लाभदायी होऊ शकते. आज चिंचणीचा विशाल हा नव्याने शेतीत येणाऱ्या पिढीसमोर एक आदर्शच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

गाईचा व्यावसायिक पद्धतीने उपयोग

गाईचा उपयोग व्यावसायिक पद्धतीने कसा करता येतो याचे उदाहरण तासगाव तालुक्यातील दुष्काळी भागात राहणाऱ्या विशाल िशदे या तरुणाने घालून दिले आहे. खिलार गाईची जपणूक करीत असताना गाईपासून मिळणाऱ्या उत्पादनाला व्यावसायिकतेची जोड देत त्याने एकीकडे सेंद्रिय शेतीतही आगळा प्रयोग केला आहे.

digambarshinde64@gmail.com