गेल्या काही वर्षांपासून लाल भोपळय़ाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जात आहे. महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिल्हय़ांतील प्रगतिशील शेतकरी प्रामुख्याने लाल भोपळ्याचे उत्पादन घेतात. पाण्याचा योग्य वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवून देणारा भोपळा शेतकऱ्यांची आíथक घडी बसवणारा ठरतो आहे.
घराच्या परसबागेत, उकिरडय़ावर, कोपऱ्यातील मोकळय़ा जागेवर एखादे गोल भोपळय़ाचे वेल लावले जात असत. ऋषीपंचमीच्या दिवशी बलाच्या मेहनतीचे अन्न खायचे नाही, अशी प्रथा पूर्वी होती. त्या दिवशी उकडलेल्या भोपळय़ासोबत गूळ घालून ते सेवन केले जाई. या व्यतिरिक्त एखादे वेळी भाजीसाठी लाल भोपळय़ाचा वापर केला जाई. मात्र, आता लाल भोपळय़ाची शेती केली जाते हे ऐकले व ती शेती फायदेशीर आहे सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र, सध्या अतिशय मोठय़ा प्रमाणावर लाल भोपळय़ाला बाजारपेठ उपलब्ध आहे. भोपळय़ाच्या शंभरपेक्षा अधिक जाती अस्तित्वात आहेत.
या भोपळय़ाचा इतिहास प्राचीन आहे. अमेरिका, ग्रीक, फ्रान्स या देशांत हजारो वर्षांपूर्वी भोपळय़ाचे उत्पादन घेतले जाई. प्रारंभीच्या काळात डुकरांसाठीचे खाद्य म्हणून याची ओळख होती. आता मानवासाठी अतिशय चांगले खाद्य म्हणून याची ओळख झाली आहे. हृदयरोगासाठी उत्तम, पचायला हलके, फायबरचे प्रमाण अधिक, प्रोटीन, काबरेहायड्रेट्स, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम याचा भोपळय़ात अधिक समावेश आहे. दक्षिण भारतात सांबरसाठी याचा अधिक वापर होतो.
देशातील सर्व राज्यांत लाल भोपळय़ाचा वापर केला जातो. रक्तदाब कमी होण्यासाठी हे औषध आहे. गेल्या काही वर्षांत भोपळय़ाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. महाराष्ट्रात सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नगर, नाशिक या जिल्हय़ांतील प्रगतिशील शेतकरी याचे उत्पादन वर्षांनुवष्रे घेत आहेत. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना आता कुठे याची माहिती होते आहे. गेल्या २-३ वर्षांपासून तुरळक शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत. पाण्याचा निचरा होणाऱ्या हलक्या जमिनीत लाल भोपळा घेणे चांगले. सर्व प्रकारच्या मातीत हे पीक जोमाने येते. पाणी निचरा होत नसणाऱ्या जमिनीत बुरशीपासून होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन त्याची निगा राखली, तर कोणत्याही जमिनीत भोपळय़ाचे उत्पादन घेता येते.
उत्तम बियाणाची निवड, स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणारा हंगाम महत्त्वाचा. खरीप हंगामात भोपळय़ाचे उत्पादन सर्वसाधारणपणे घेतले जाते. दिवाळीनंतर हे पीक घेतले व काढणीच्या वेळी तापमानात वाढ झाली तर अडचणी निर्माण होतात. सोलापूर जिल्हय़ातील पांढरेवाडी येथील दत्तू घोडके हे शेतकरी गेल्या बारा वर्षांपासून भोपळय़ाचे उत्पादन घेतात. प्रारंभीच्या काळात माळरानाच्या शेतीवर त्यांनी डाळिंब फुलवण्याचा प्रयत्न केला. तेल्या रोग व मररोगाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना डाळिंबात यश आले नाही. त्यांनी लाल भोपळय़ाचे व घेवडय़ाचे आंतरपीक घेतले. योग्य नियोजनातून व बाजारपेठेचा अंदाज पाहून केलेल्या नियोजनातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. घोडके यांची वडिलोपार्जित ७७ आर जमीन १९९२ मध्ये त्यांच्या वाटय़ाला आली. १९९४ मध्ये त्यांनी ऊस घेतला. तेव्हा भाव कमी होता. गाळपाच्याही समस्या होत्या. १९९७ मध्ये पपई घेतली. मात्र, बाजारपेठेच्या वाईट अनुभवामुळे बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन काय पिकवले पाहिजे याचा अभ्यास केला. प्रारंभी डाळिंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून खरबूज घेतले. मात्र, ते रोगाला बळी पडले. लावणीपासून काढणीपर्यंतचा सरासरी खर्च हा २५ ते ३० हजार रुपये एकरी येतो. त्यात बुरशीजन्य आजाराच्या फवारण्या, तणनाशक आदींचा खर्च गृहीत धरला आहे. वेल पूर्ण सुकल्यावर भोपळा पिवळा पडतो. पूर्ण पक्व झाल्यावरच भोपळा काढावा. रानातून भोपळा बाजूला मजुरांच्या माध्यमातून काढता येतो. काही जण काढणीसाठी छोटा गाडाही तयार करतात. भोपळय़ाची गरज लक्षात घेऊन पाणी दिले पाहिजे. वेलीच्या पानाचा रंग लक्षात घेऊन व जमिनीत ओल असेल तर पाणी देण्याची गरज नाही. मात्र, लागेल तेव्हा ठिबकने पाणी देणे हिताचे असते. सरासरी एकरी २० ते २५ टन उत्पादन निघते. किमान ८ रुपयांपासून कमाल १६ रुपये किलोपर्यंतचा बाजारभाव मिळतो. महाराष्ट्रात वाशी व पुणे या दोन बाजारपेठेत लाल भोपळय़ाची खरेदी होते. खर्च वजा जाता एकरी किमान १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, असे दत्तू घोडके यांचे म्हणणे आहे.
लातूर जिल्हय़ातील औसा तालुक्यातील अण्णाराव पवार या शेतकऱ्याने गत वर्षी खरिपाच्या हंगामात भोपळय़ाची लागवड केली. एकरी २५ टन उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता सव्वालाख रुपये शिल्लक राहिल्याचे ते म्हणाले. महिको बियाणाचा वापर केल्याचे पवार यांनी सांगितले. तळणी येथील सुनील पाटील यांनी गत वर्षी रब्बी हंगामात भोपळय़ाची लागवड केली. मात्र, तापमानवाढीमुळे उत्पन्न मिळाले नाही. या वर्षी खरिपाच्या हंगामात पुन्हा लागवड करणार असल्याचे पाटील म्हणाले. उसाला ज्या पद्धतीने खते दिली जातात, लागवडीपूर्वी मेहनत घेतली जाते तशी मेहनत घेतली तर केवळ ४ महिन्यांतच उसाइतके उत्पादन मिळते, असा भोपळा उत्पादकांचा अनुभव आहे. पारंपरिक शेतीपेक्षा पाण्याचा योग्य वापर करून कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळणारा भोपळा हा शेतकऱ्यांची आíथक घडी बसवणारा ठरतो आहे.
- भोपळा ९० दिवसांचे पीक आहे. जमिनीचा पोत लक्षात घेऊन ८ बाय ४, १० बाय ४, १५ बाय ४ अंतरावर भोपळय़ाची लागवड केली जाते.
- जमिनीवर बोध तयार करून टोकन पद्धतीने भोपळय़ाची लावण केली जाते. महिको, सेंच्युरी अशा विविध कंपन्यांचे बियाणेही बाजारात उपलब्ध आहे.
- ५० गॅ्रमच्या पाकिटात सुमारे ३५० बिया असतात. त्याची किंमत अंदाजे २०० रुपये असते.
- एक एकरमध्ये ८ बाय ४ या अंतरावर लावण केली तर १३६१ बिया लागतात. वेलीची वाढ होत असताना फूल, फळधारणा व मालाची प्रत सुधारण्यासाठी आवश्यकतेनुसार रासायनिक खताचा वापर करावा लागतो. काही मातीत विद्राव्य खतही दिले जातात.
- ९० दिवसांत भोपळा काढणीस येतो. वेलीला अनेक फळ लागले, तर त्याचे वजन वाढण्यासाठी २ फळ ठेवावेत. शास्त्रोक्त पद्धत एकच फळाची आहे. जितके जास्त वजनाचे फळ तितकी त्याला अधिक मागणी असते. किमान चार किलोपासून कमाल १६ किलोपर्यंतचे एका भोपळय़ाचे वजन मिळते. सरासरी ८ ते ९ किलो वजनाचे भोपळे तयार होतात.
pradeepnanandkar@gmail.com