भातशेती करणारे उत्पन्नवाढीचा कसोशीने प्रयत्न करतात; पण बियाणे निवड आणि खतांच्या वापरापर्यंतच हे प्रयत्न मर्यादित राहतात. उत्पन्न कमी करणाऱ्या कीड-रोगांकडे त्यांचा काणाडोळाच असतो. यावर उपाययोजना होत नाहीत आणि उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट अपूर्णच राहते. साहजिकच भातशेतीकडे तोटय़ातील शेती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन अजूनच बळावतो. या परिस्थितीत दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने भातशेतीचे नसर्गिक ‘संरक्षक’ दाखवून या शेतीला नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुळात हरितक्रांतीची चाहूल लागण्यापूर्वी, युरीयारूपी खताचा वापर सुरू होण्यापूर्वी वर्षांनुवष्रे देशात भातशेती यशस्वीपणे सुरू होती. भाताच्या गावठी वाणातूनच मोठय़ा प्रमाणात उत्पन्न घेतले जात होते. हे सूत्र कृषी शास्त्रज्ञांसाठीही अभ्यासाची दिशा दाखवणारे ठरले. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात गेल्या चार-पाच वर्षांपासून कोकणातील याच जुन्या भातशेती पद्धतीबाबत अभ्यास सुरू आहे. कीड-रोग नियंत्रण विभागातील या अभ्यासानुसार पूर्वीच्या काळात भातावरील नसर्गिक कीड नियंत्रणच या शेतीला उपकारक ठरत आले होते. त्या काळात शेतात मुबलक प्रमाणात शेणखत पडत होतेच, पण बहुपीक पद्धत आणि शेताच्या आजूबाजूला वाढणारी रानटी फुलांची झाडे हेच भाताचे खरे रक्षणकत्रे ठरत होते.

दोन-अडीच शतकांपूर्वी बार्टर पद्धत जाऊन रुपयाला महत्त्व येऊ लागले. लोक अन्नधान्य पिकवण्यापेक्षा कमी कष्टात पशाने अन्नधान्य विकत घेण्याचा विचार करू लागले. त्यामुळे बहुपीक पद्धतीवरून हळूहळू शेतकरी एकपिकी शेतीकडे लक्ष केंद्रित करू लागला आणि हीच मानसिकता कीड-रोगाच्या आमंत्रणास कारणीभूत ठरू लागली. कोकणातील वरकस जमिनीत यापूर्वी तीळ, कारळा पिकत होता. भातशेतीच्या बांधावर झेंडू लावला जात होता. तेथेच आजूबाजूला कुरडूसारखी रानभाजी, कॉसमॉस, कॅलेन्डय़ुलासारखी रानफुलांची झाडे दिसत असत; पण एकपिकी पद्धतीत या वैविध्यतेला पूर्णविराम मिळालाच आणि रानभाज्या, रानफुलांच्या झाडांकडे तण म्हणून पाहिले गेले. खरे म्हणजे ही सर्व वैविध्यता नसर्गिक कीड संरक्षणासाठी पोषक ठरते, असे कोकण कृषी विद्यापीठाच्या कीड-रोग नियंत्रण विभागाच्या संशोधनात दिसून येते.

कोकणात भातावर सध्या पाच किडींचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव होतो. यामध्ये खोडकिडा, पाने गुंडाळणारी अळी, निळे भुंगेरे, ढेकण्या आणि तुडतुडे यांचा समावेश आहे. या सर्वच किडींवरील उपायांसाठी सध्या शेतकरी आकाशावरच अवलंबून राहतो. एखाद्या मोठय़ा पावसात या किडी नष्ट होऊन जातील, असा आडाखा त्याने बांधलेला असतो; पण ही उपाययोजना होता होता शेताचे बरेच नुकसान होऊन गेलेले असते, ते शेतकऱ्याच्या लक्षातही येत नाही. खोडकिडय़ाने भाताच्या तृणातील गाभाच खाऊन टाकलेला असतो. त्यामुळे अनेक रोपे मरून जातात. पाने गुंडाळणारी अळी हरितद्रव्य खात असल्याने पाने सुकतात. निळे भुंगेरे पाने खरवडून खातात, त्यामुळे पाने पांढरी पडतात. ढेकण्या भाताचे दाणे भरत असताना आतला रस शोषतो आणि तुडतुडय़ांमुळे रोप करपल्यासारखी जाणवतात. त्याला करपा म्हटले जात असले तरी तो किडीचा प्रादुर्भाव आहे, याकडे शेतकरी लक्ष देत नाही. या सर्व किडी भातलावणीनंतर १५-२० दिवसांनंतर पिकाचे नुकसान करण्यास सुरुवात करतात आणि भाताच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली जाते.

भातपिकात २५ प्रकारचे कोळी आणि अनेक प्रकारचे मित्र-कीटक या किडी आणि त्यांची अंडी खाऊन जगत असतात आणि हे मित्र-कीटक पांढरे तीळ, काळे तीळ अर्थात कारळा, झेंडू, कुरडू, कॉसमॉस, कॅलेन्डय़ुला या वनस्पतींवर सर्रास आकृष्ट होतात. यामध्ये पांढऱ्या तिळावर ट्रायकोग्रामा, सिरफीड माशी, क्रायसोज, लेडी बीटल आणि चतुर हे मित्र-कीटक आकृष्ट होतात. कारळा, कॅलेन्डय़ुला आणि झेंडूवर अ‍ॅपेंटीलिस, क्रायसोज, सिरफीड माशी आणि चतुर येतात. कुरडू आणि एकदांडी या रानफुलाच्या झाडांवर ट्रायकोग्रामा, अ‍ॅपेंटीलिस आणि चतुर येतात. या सर्व वनस्पतींवर कोळीही आकृष्ट होतच असतात.

या संशोधनाबाबत माहिती देताना विभागाचे डॉ. विजयकुमार देसाई यांनी सांगितले की, हे सर्व मित्र-कीटक या वनस्पतींवर आकृष्ट झाल्यानंतर ते परिसरातच आपले अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात. भातावरील बारीक किडी, बारीक कीटक आणि त्यांनी पानावर टाकलेली अंडी हेच त्यांचे अन्न बनते. त्यामुळे नसर्गिक कीड नियंत्रण होऊन उत्पन्न वाढते. जुन्या शेतीपद्धतीत याची जाणीव शेतकऱ्यांना झाली होती. आता शेतकऱ्यांनी बांधावर या वनस्पती लावल्यास कीड नियंत्रण साधले जाऊ शकते.

तीळ, कारळा, झेंडूसारखी रोपे शेतातच चारही बाजूंनी संरक्षक म्हणून लावल्यास त्याचे उत्पन्नही घेता येऊ शकते. भातासारखेच कडवा पावटय़ाच्या शेतीतही या वनस्पतींनी संरक्षक म्हणून काम केल्याचे सिद्ध झाले आहे. या अभ्यासानंतर आंबा तसेच फळभाज्यांमधील नसर्गिक कीड नियंत्रणाच्या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. साहजिकच या संशोधनानंतर भातशेती करणाऱ्यांनी आता मित्र-कीटक वाढवण्यासाठी तरी शेतात तीळ, कारळा, कुरडू, कॅलेन्डय़ुला, कॉसमॉससारखी झाडे लावणे आता गरजेचे आहे. तरच भातशेतीतील उत्पन्नवाढीचे ध्येय त्यांना गाठता येऊ शकेल, हे निश्चित.

rajgopal.mayekar@gmail.com

Story img Loader