औद्योगिकीकरणामुळे रायगड जिल्ह्यतील शेती क्षेत्र सातत्याने घटत असले तरी, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुधारित बियाण्यांचा वापर, शेतीमध्ये करण्यात येणारे नवनवीन प्रयोग यांमुळे भातपिकांची उत्पादकता वाढविण्यात रायगड जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे. या वर्षी जिल्ह्यत भातपीक चांगले तयार झाले असून, ३४ लाख क्विंटल भात उत्पादन होईल, अशी अपेक्षा आहे.
रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यत नवी मुंबई विमानतळ, सिडको, एसईझेड, जेएनपीटी, दिघी पोर्ट, दिल्ली मुंबई कोरिडोरसह अन्य महाकाय औद्योगिक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यामुळे जिल्ह्यतील शेती क्षेत्रात सातत्याने घट होत आहे. पनवेल, उरण, खालापूर, कर्जतसारख्या तालुक्यात शेती आणि शेतकरी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र तरीही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने जिल्ह्यतील शेतीच्या उत्पादकतेत वाढ होत आहे. शेती क्षेत्रात घट होत असताना भाताच्या उत्पादनातील वाढ नक्कीच सुखावणारी आहे.
भाताचे कोठार अशी रायगड जिल्ह्यची ओळख आहे. जिल्ह्यत खरीप हंगामात सुमारे १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्यात आली आहे. त्यापकी १ लाख १० हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड करण्यात आली. जिल्ह्यतील शेतकऱ्यांनीही पारंपरिक शेतीबरोबर आधुनिकतेची कास पकडली आहे. कृषी तंत्रात झालेल्या बदलांचा अभ्यास करून शेती करण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. बदलते तंत्र लक्षात घेऊन शेती करण्यात येत आहे. विविध आधुनिक अवजारांचा प्रयोग करण्याबरोबर संकरित बियाणे वापरण्यात आले आहे. या सर्व बाबींच्या जोरावर जिल्ह्यतील भातपीक उपादकता वाढत असल्याचे दिसून येते. या वर्षी जिल्ह्यत पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने शेती उत्पादन वाढीचा अंदाज बाधण्यात येत होता.
सप्टेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे काही ठिकाणी भातपिकाचे थोडे नुकसान झाले. मात्र हे नुकसान नगण्य असल्याचा निर्वाळा कृषी विभागाने दिला. या वर्षी एक लाख १० हजार हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली असून यामध्ये सुमारे ३४ लाख १० हजार क्विंटल भाताचे उत्पादन मिळेल, असेही कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यत सध्या भातपीक कापणीची कामे पूर्ण होत आली आहेत. पुढील काही दिवसांतच झोडणीची कामेही पूर्ण होतील, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
शेतीत शेतकऱ्यांनी घेतलेली आधुनिकतेची कास व पुरेसा पाऊस यामुळे जिल्ह्यतील भातपिकाचे उत्पादन वाढणार आहे. या वर्षी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच वेगवेगळे प्रयोग राबविले आहेत. या वर्षी खरीप हंगामात कृषी विभागातर्फे जिल्ह्यात ४६ ठिकाणी भात प्रकल्प घेण्यात आले आहेत. जिल्ह्यतील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जातीचे बियाणे देऊन बियाणे आणि जमिनीची उत्पादनात तपासण्यात येत आहे.
– के. बी. तरकसे, जिल्हा कृषी अधीक्षक
meharshad07@gmail.com