करडईचे उत्पन्न एके काळी जगात भारतात पहिल्या क्रमांकाचे होते. जगातील ५० टक्के करडईचे उत्पादन भारतात होत असे व भारतात सर्वाधिक करडईचा पेरा करणारा प्रांत म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. ग्रामीण भागात आजही करडईच्या तेलाला सर्वाधिक मागणी आहे. बाजारपेठेत करडईच्या तेलाला अधिक पसे घेतले जातात, मात्र शेतकऱ्याकडून खरेदी केली जाणारी करडई अत्यल्प किमतीने घेतली जाते. बहुपयोगी असलेली करडई आजही दुर्लक्षितच आहे.
भारतात सर्वसाधारणपणे रब्बी हंगामात करडईचे उत्पादन घेतले जाते. जगभर बारमाही उगवणारे काटेरी कडांची पाने असणारे हे झुडुप आहे मात्र कोवळी पाने काटेरी नसतात. त्याची थोडी वाढ झाली की ते काटेरी बनतात. करडईची रोपे ३० ते ५० सेंटिमीटर उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी फुले येतात. याच्या कोवळ्या पानाची खाण्यासाठी भाजी करतात तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. अतिशय पौष्टिक खाद्यतेल म्हणून याचा वापर केला जातो. करडईची बिनकाटय़ाचीही जात विकसित करण्यात आली आहे. तिच्या फुलापासून लाल व पिवळा असे दोन रंग मिळतात. या रंगाच्या वडय़ा तयार करून कपडय़ांना रंग देण्यासाठी हे वापरले जातात. अलीकडे हर्बल टीमध्ये करडईचा वापर केला जातो आहे. त्यामुळे करडईच्या फुलांना चांगला भावही मिळतो आहे. करडईला संस्कृतमध्ये कुसुंब म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणजे करडईचे फूल. एकेकाळी राज्यात कुसुंबी रंगाच्या साडय़ांना मोठी मागणी होती.
जगात मोठय़ा प्रमाणावर अमेरिकेत करडईचे उत्पादन घेतले जाते. त्यातही एकटय़ा कॅलिफोíनयात अमेरिकेच्या ५० टक्के उत्पादन होते. पूर्वी करडईमध्ये तेलाचे प्रमाण ३० टक्के होते. आता ३५ टक्क्यांपेक्षा अधिक तेल असणाऱ्या जातीचे संशोधन करण्यात आले आहे. करडईचे तेल हे उत्तम गुणकारी आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ते कमी करते. रंग उत्पादनातही करडई तेलाचा औद्योगिक वापर केला जातो. डिझेलला पर्याय म्हणूनही करडईचा वापर करता येऊ शकतो, मात्र हे तेल महाग असते त्यामुळे त्याचा वापर परवडत नाही. साबणातही करडईचा वापर केला जातो. करडईच्या उत्पादनासाठी हलक्या स्वरूपाची जमीन वापरली जाते. पाण्याचा निचरा होणारी जमीन याला लागते. सुरुवातीच्या टप्प्यात करडईची वाढ सावकाश होते. पाण्याचा ताण सहन करणारे पीक म्हणून याची ख्याती जगभर आहे. खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामात येणारे हे पीक आहे. ११० ते १४० दिवसांत हे पीक येते. २० सेल्सिअसपर्यंत खाली तापमान आले तरी करडईचे उत्पादन घेता येते. एक ते दीड इंचावर करडईचे बी पेरले गेले पाहिजे. दोन ओळीतील अंतर १४ इंच व जमिनीचा सामू (पीएच) ६ असावा लागतो. गहू, हरभरा, ज्वारी या पिकात अंतरपीक म्हणून करडई घेतली जाते तर काही शेतकरी पूर्णपणे करडईचाच पेरा करतात.
करडईचे उत्पन्न एके काळी जगात भारतात पहिल्या क्रमांकाचे होते. जगाच्या तुलनेत ५० टक्के करडईचे उत्पादन भारतात होत असे व भारतात सर्वाधिक करडईचा पेरा करणारा प्रांत म्हणून महाराष्ट्राची ओळख होती. काही जण शेतात कुंपणासारखा वापर करण्यासाठी बांधाच्या कडेला सुरुवातीला करडई पेरतात व आतील भागात अन्य उत्पादन घेतले जाते. गेल्या किमान २०० वर्षांपासून जगभर करडईचे उत्पादन घेतले जाते. आता नवनवीन संशोधन त्यावर होत असून बिनकाटय़ाची करडई राज्यातील फलटण येथील निमकर कृषी संशोधन केंद्रात विकसित करण्यात आली. २००० साली नारी १ ही बिनकाटय़ाची करडईची जात विकसित करण्यात आली. कदाचित जगात हे पहिलेच संशोधन होते. देशातील सर्व राज्यात हे वाण वापरले गेले. त्यानंतर निमकर संशोधन केंद्रात नारी ६, नारी ५७ अशा विविध जाती विकसित करण्यात आल्या आहेत.
अमेरिकेत मे महिन्यात करडईचा पेरा केला जातो. ऑगस्टअखेर ते सप्टेंबर महिन्यात तेथे करडईची रास होते. हेक्टरी दोन ते अडीच टन याची उत्पादकता असते. भारतात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ापासून नोव्हेंबपर्यंत करडई पेरली जाते. करडी हे जमिनीत खोलवरून पाणी व अन्न खेचून घेते. गरजेनुसार करडईला पाणी दिले तर उत्पन्नात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढ होते. नारी ३८, नारी १५ अशा जाती निमकर संशोधन केंद्रात विकसित करण्यात आल्या आहेत.
परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली बिनकाटय़ाची जातही प्रसिद्ध आहे. बहुतांश शेतकरी गेल्या काही वर्षांपासून भीमा हे वाण वापरतात. करडईचा हमीभाव ३३०० रुपये प्रतिक्विंटल आहे व सध्या बाजारात २७०० रुपये क्विंटलने करडईची खरेदी केली जाते. भावच मिळत नसल्यामुळे या पिकाकडे शेतकरी दुर्लक्ष करतो. रब्बीच्या हंगामात मानाचे स्थान हरभऱ्याला दिले जाते. त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार गहू, ज्वारी अशी पिके घेतली जातात. शेवटचे स्थान करडईचे असते. बहुतांश शेतकरी चांगली जमीन अन्य वाणासाठी वापरतो व जेथे काहीच उत्पादन येत नाही अशा जमिनीचा वापर करडईसाठी करतो. करडईला ही उपेक्षिताची वागणूक देण्याचे मुख्य कारण गेल्या काही वर्षांत मिळणारा कमी भाव. सरकारने तेलाच्या उत्पादनात देश स्वयंपूर्ण होण्यासाठी तेलबियांना मानाचे स्थान दिले पाहिजे. करडईचा हमीभाव किमान ४५०० रुपये क्विंटल दिला गेला तर शेतकरी करडईच्या उत्पादनाकडे वळतील. अधिक उत्पादन घेतले तर तेलाचे उत्पादन वाढेल. शेतकऱ्याला अन्य पिकापेक्षा करडईचे उत्पादन लाभदायक आहे हे कळले तर तो करडईला मानाची जागा देईल.
यावर्षी केंद्र सरकारने पामतेलावरील आयात कर नुकताच ५ टक्क्याने कमी केला आहे त्यामुळे विदेशी मालाला पायघडय़ा घालण्याच्या धोरणाला पायबंद बसण्याऐवजी पाठबळ मिळते आहे. फलटण येथील निमकर कृषी संशोधन केंद्राच्या प्रमुख नंदिनी निमकर यांनी आपल्या वाणाचा राज्यातील व देशातील शेतकरी मोठय़ा प्रमाणावर फायदा होत असल्याचे सांगितले.
पुणे जिल्हय़ातील बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावातील विजय जगताप यांनी गतवर्षी ३० गुंठय़ात टोकण पद्धतीने करडईचे उत्पादन घेतले. ५ क्विंटल आपल्याला उत्पादन झाले शिवाय ३० किलो फुलांचे उत्पादन झाले. ७०० रुपये किलोने फुले विकली गेली असल्याचे जगताप म्हणाले.
ग्रामीण भागात आजही करडईच्या तेलाला सर्वाधिक मानाचे स्थान आहे. बाजारपेठेत करडईच्या तेलाला अधिक पसे घेतले जातात, मात्र शेतकऱ्याकडून खरेदी केली जाणारी करडई बेभाव किमतीने घेतली जाते. सरकारने याबाबतीत लक्ष दिले व शेतकऱ्याला मदतीचा हात दिला तर करडईचे उत्पादन पुन्हा उसळी घेऊ शकते. यावर्षी अतिपावसाने खरिपाचे उत्पादन हातचे गेल्यामुळे राज्याच्या विविध भागातील शेतकरी संकटात आहे. शासनाने रब्बी हंगामात शेतकरी अधिक उत्पादन घेईल व त्याच्या वाणाला चांगला भाव मिळेल यासाठी लक्ष देण्याची गरज आहे.
नवीन वाणाचे संशोधन
करडईच्या फुलाचा वापर हर्बल टीमध्ये होत असल्यामुळे ४०० रुपयांपासून ७०० रुपये किलोपर्यंत करडईची फुले खरेदी केली जातात. शेतात उत्पादित होणारी करडई, त्याला मिळणारा भाव व त्याबरोबर करडईच्या फुलाला मिळणारा भाव सारखाच असतो. बिनकाटय़ाची करडई असल्यामुळे त्याची रास करणेही शेतकऱ्यांना सोयीचे जाते. सर्वसाधारणपणे हेक्टरी सव्वा ते दीड लाख रुपयाचे उत्पादन शेतकऱ्याला मिळू शकते. निमकर कृषी संशोधन केंद्रात आगामी काळात ६० ते ७० दिवसांत काढणीला येणाऱ्या नवीन वाणाचे संशोधन सुरू असून यामुळे शेतकरी या वाणाकडे अधिक वळेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. उस्मानाबाद जिल्हय़ातील परंडा तालुक्यातील डोंजा गावातील नागनाथ सूर्यवंशी या शेतकऱ्याने गतवर्षी सहा एकरमध्ये करडईचे उत्पादन घेतले. गतवर्षी मराठवाडय़ावर प्रचंड मोठे दुष्काळाचे सावट होते त्यामुळे म्हणावे तसे करडईचे उत्पादन झाले नसले तरी सव्वा लाखापर्यंत उत्पादन घेता आले. करडईच्या फुलालाही चांगला भाव मिळाला व निमकर कंपनीनेच आपली फुले विकण्याची व्यवस्था केली त्यामुळे आपल्याला लाभ झाला असल्याचे सांगितले.
pradeepnanandkar@gmail.com