लातूरजवळील पाखरसांगवी गावच्या धनंजय राऊत या शेतकऱ्याने राज्यात पहिल्यांदाच आपल्या शेतात चंदन रोपवाटिका सुरू केली असून स्वतच्या दहा गुंठे पॉलिहाऊसमध्ये त्यांनी १० हजार रोपे तयार केली आहेत. राऊत यांनी अडीच लाख रोपे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून या रोपवाटिकेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारंपारिक शेतीत दैनंदिन गुजराण करणेही अशक्य होत चालल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. मराठवाडा व विदर्भात गेल्या काही वर्षांपासून साथीचा रोग पसरावा, तशा आत्महत्या वाढत आहेत. शेती नफ्याची करण्यासाठी ती शाश्वत व्हावी यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आपापल्या कल्पकतेने ठिकठिकाणी नवे प्रयोग करत आहेत. चंदनाचे जंगल हे कर्नाटक, तामिळनाडू आदी प्रांतांत मोठय़ा प्रमाणावर आहे. राज्यात चुकूनमाकून आलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी होते. काही ठिकाणी फुटकळ पसे देऊन झाडे विकत घेतली जातात, मात्र चंदनाची शेती करता येते व त्यातून आíथक लाभ मिळवता येतो याबाबतीत फारसे कोणी धाडस केले नाही. त्यातही महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर यासाठी कोणी पुढाकार घेतला नाही.लातूरजवळील पाखरसांगवी या गावच्या धनंजय राऊत या शेतकऱ्याने राज्यात पहिल्यांदाच आपल्या शेतात चंदन रोपवाटिका सुरू केली असून स्वतच्या दहा गुंठे पॉलिहाऊसमध्ये त्यांनी १० हजार रोपे तयार केली आहेत. अडीच लाख रोपे तयार करण्याचे त्यांनी उद्दिष्ट ठेवले असून या रोपवाटिकेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.सातवीनंतर शिक्षण सोडून वडिलांबरोबर शेती करणाऱ्या धनंजयने काही दिवसांनंतर आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यासाठीचे शिक्षण नसल्यामुळे त्याने प्रारंभी मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी मिळविली. पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय फलोत्पादन केंद्रात त्याने आधुनिक शेती करण्यासाठीचे प्रशिक्षण घेतले व त्यानंतर आपल्या शेतात प्रारंभी टोमॅटोची लागवड केली. एका एकरात केवळ सात महिन्यांत साडेचार लाख रुपयांचे टोमॅटोचे उत्पादन निघाले. काहीजणांनी सेंद्रिय शेती, नसíगक शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला. सुभाष पाळेकर यांनी आयोजित केलेल्या शिबिरात त्याने सहभाग घेतला. शेती करायची असेल तर गोठय़ात गाय अन् शेतात झाड आवश्यक असल्याचे पाळेकरांचे वाक्य धनंजयच्या डोक्यात रुंजी घालत होते. घरी गाय आहे, पण शेतात झाड नाही हे डोक्यात ठेवून त्याने २००४ साली २१० केशर आंब्यांची झाडे लावली. पाण्याची अडचण होत असल्यामुळे दोन वष्रे टँकरने पाणी घेऊन त्याने झाडे जगवली. शेतीत पाण्याची अडचण येत असल्यामुळे दोन किलोमीटर अंतरावरील तळ्याच्या परिसरात अर्धा एकर जमीन खरेदी करून त्यात विहीर घेतली व त्या विहिरीचे पाणी दोन किलोमीटर पाइपलाइनने शेतात आणले व सर्व दहा एकर जमीन ठिबकवर पाण्याखाली आणली.ज्वारी, गहू, बाजरी यांसारख्या पिकांनाही ठिबकनेच पाणी देऊन उत्पन्न घेतले. आंब्याची बाग असूनही गेल्या तीन वर्षांपासून गारपीट व विविध कारणांमुळे बागेचे एक रुपयाचेही उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्याला चिंता लागली होती. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. काहीजणांच्या चच्रेतून चंदनशेतीचा विचार समोर आला व त्यातून त्याने चंदनशेतीचा अभ्यास करण्यासाठी बंगळुरू, म्हैसूर, शिमोगा या कर्नाटक प्रांतातील विविध शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. म्हैसूर सँडलचा साबणाचा कारखानाही पाहिला. तिथे चंदनाच्या झाडाची मागणी किती आहे याची माहिती घेतली. पाच हजार टन गरज असताना १०० टनांच्या आसपासही चंदन उपलब्ध होत नसल्यामुळे कारखाने अडचणीत आहेत. कितीही उत्पन्न घेतले तरी आम्हाला ते लागणारच आहे अशी माहिती त्याला मिळाली. चंदनाच्या गाभ्यापासून तेलाची निर्मिती होते. चंदनाच्या गाभ्याची किंमत ६५०० रुपये किलो असून एका झाडात १५ ते ५० किलो इतका गाभा तयार होतो. फांद्या, साल, मुळे या सर्वाना पसे येतात. ५ ते १५ वष्रे या झाडाची जोपासना करावी लागते.त्याने प्रारंभी बंगळुरू येथून रोपे खरेदी केली व दोन एकरवर त्याची लागवड केली. केंद्र सरकारने चंदनाच्या शेतीसाठी हेक्टरी ४४ हजार रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. एकटय़ा लातूर जिल्हय़ात सुमारे १६० एकर क्षेत्रावर चंदनाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. शहरापासून जवळ असल्यामुळे आजूबाजूचे शेतकरी धनंजयकडे चंदनशेतीबद्दल माहिती विचारायला येतात. त्याला तुम्हीच रोपे आणून द्या अशी मागणी करतात. कर्नाटकातून रोपे आणून ती शेतात लावली तरी विविध कारणांनी रोपे जगण्याचे प्रमाण कमी आहे त्यामुळे रोपवाटिका सुरू करण्यासाठी दापोलीच्या कृषी विद्यापीठात तो जाऊन आला व त्यानंतर बंगळुरू येथे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ वूड सायन्स या केंद्रात भेट देऊन त्या ठिकाणी त्याने प्रशिक्षण घेतले व प्रशिक्षणानंतर आपल्या शेतात रोपे तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रारंभी रोपे जळायला लागली. ५० टक्के रोपे जगत नसल्यामुळे पुन्हा त्याने संपर्क केला, तेव्हा मराठवाडय़ातील तापमानामुळे रोपे जगत नाहीत, त्यासाठी पॉलिहाऊस उभारण्याचा सल्ला मिळाला. त्यातून दोन महिन्यांपूर्वी दहा गुंठय़ाचे पॉलिहाऊस तयार करून त्यात १० हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.अडीच लाख रोपे या पॉलिहाऊसमध्ये तयार करण्याचे त्याने उद्दिष्ट ठेवले असून राज्यात चंदनाची पहिली रोपवाटिका सुरू करण्याचा मान त्याने मिळविला आहे. राजस्थान, गुजरात, केरळ आदी प्रांतांतून रोपांसाठी त्याला संपर्क होतो आहे. चंदनाची शेती करताना पहिली पाच-दहा वष्रे त्यापासून उत्पन्न मिळणार नाही. अंतरपिकातून उत्पन्न घ्यायचे व बँकेत जशी सुरक्षाठेव ठेवली जाते त्याप्रमाणे चंदनाच्या झाडाचा विचार करावा लागतो. आंब्याच्या झाडाच्या केवळ ३० टक्केच चंदनाच्या झाडाला पाणी लागते व तेही सुरुवातीची तीन वष्रे. त्यानंतर पावसाच्या पाण्यावरच हे झाड जगते. या शेतीचे संरक्षण करणे ही सर्वात मोठी जोखीम आहे. सौरकुंपण, सीसीटीव्ही, झाडांमध्ये जीपीएस चिप बसवणे यांसारख्या उपाययोजना कराव्या लागतात. या केल्या तर चंदनाची शेती अतिशय किफायतशीर होईल.चंदनाचे झाड हे मूलत बांडगूळ आहे. त्याला लिंबवर्गीय झाडांचा आधार लागतो. धनंजयने चंदनाच्या रोपाबरोबर मिलियाडुबीया या लिंबवर्गीय रोपाचे उत्पादनही सुरू केले आहे. एका एकरमध्ये १० फूट बाय १० फूट अंतरावर झिकझॅक पद्धतीने ४५० झाडे चंदनाची व तेवढीच मिलियाडुबीयाची लावावी लागतात. पाच वष्रे पारंपारिक अंतरपीक घेता येते. त्यानंतर सावलीत येणारी अंतरपीक या शेतीत घेता येऊ शकते. मिलियाडुबीया या झाडापासून प्लायवूड तयार केला जातो, त्यालाही चांगली मागणी बाजारात असते.मराठवाडय़ासारख्या पाण्याच्या दुíभक्ष्य असलेल्या भागात चंदनशेतीचा विचार आता रुजतो आहे. पाण्याच्या दुíभक्ष्यामुळे ऊसशेतीकडून शेतकरी अन्य पर्यायांकडे वळतो आहे. अशा शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच!

दु:खावर फुंकर
गेल्या २० वर्षांपासून शेती करताना शेतकऱ्यांचे दुख जाणणाऱ्या धनंजय राऊत याने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी चंदनाची शेती करण्याचे ठरवले तर एक एकरसाठी लागणारी रोपे आपण मोफत देणार असल्याचे जाहीर केले आहे. एका रोपाची ४० रुपये व मिलियाडुबीयाची २० रुपये किंमत आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आपल्यापरीने मदत करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतला असल्याचे धनंजयचे म्हणणे आहे.

प्रदीप नणंदकर – pradeepnanandkar@gmail.com