लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील मावलगाव या छोटय़ा गावात गेल्या २५ वर्षांपासून गायीचा सांभाळ करत आर्थिक उत्पन्नाबरोबरच देशपातळीवरील तीन वेळा प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या शरद पाटील यांच्या मते शेतकऱ्याने एका गायीचा सांभाळ जरी केला तरी ती त्या शेतकऱ्याचा सांभाळ नक्की करते.
पुराणकाळापासून आपल्या देशात गायीचा सांभाळ होत असे. घरोघरी भरपूर दूध मिळत असे. कालांतराने पोषणाच्या ऐवजी शोषण अधिक होऊ लागले व हळूहळू गोसंगोपनाकडे दुर्लक्ष होत गेले. हरितक्रांतीनंतर दुधाच्या क्रांतीचे प्रयोग झाले व देशातील काही भागांत दुधाचा महापूर सुरू झाला. त्यांना त्याचे लाभही मिळत गेले. मात्र दुष्काळी भागात जिथे चारा उपलब्ध नाही अशा ठिकाणी गोसंगोपन परवडत नसल्याचा सर्वसाधारण समज आहे. लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील मावलगाव या छोटय़ा गावात गेल्या २५ वर्षांपासून गायीचा सांभाळ करत आíथक उत्पन्नाबरोबरच देशपातळीवरील तीन वेळा प्रथम पुरस्कार मिळविणाऱ्या शरद पाटील यांच्या मते शेतकऱ्याने एका गायीचा सांभाळ जरी केला तरी ती त्या शेतकऱ्याचा सांभाळ नक्की करते. आपल्या अनुभवातून हे सिद्ध झाले असल्याचे पाटील सांगतात.
शरद पाटील हे विज्ञानाचे पदवीधर. १९८६ साली घरातील पारंपरिक शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. एकत्र कुटुंबात ४० एकर कोरडवाहू जमीन होती. दुष्काळाचे चक्र हे आताचे नाही. अनेक वर्षांपासून दर तीन वर्षांनी दुष्काळ पडत होता. कधी अतिवृष्टी तर कधी कमी पाऊस यामुळे शेतीचे गणित नीट बसत नव्हते. वडिलोपार्जित गोठय़ामध्ये लालकंधारीच्या गायी होत्या. या गायीचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करण्याची कल्पना पाटील यांच्या मनात आली. त्या काळात लालकंधारी ब्रीडला मान्यता नव्हती. अतिशय कमी दूध देणारी ही गाय भाकड असल्याचा सार्वत्रिक समज होता. १९९० ते २०००च्या दशकात लालकंधारीचे ब्रीड संगोपन करण्यासाठी प्रयत्न झालेले नव्हते. त्यामुळे या गायीचे दूधही कमी होत गेले. शंकरराव चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात लातूर, नांदेड, परभणी या परिसरात लालकंधारीचे संगोपन होत होते. त्याच्या ब्रीडला प्रयत्नपूर्वक मान्यता मिळाली. ब्रीडला मान्यता मिळाली असली तरी या जातीची गाय ही देशातील अन्य जातींच्या तुलनेत कुठेही कमी नाही हे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवण्याची गरज होती.
पाटील यांना त्या काळात पशुवैद्यक नितीन मरकडेय, सुगणराव कदम यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी आपल्याकडील गायीला अखिल भारतीय पशुप्रदर्शनात नेण्याच्या जिद्दीने संगोपनास सुरुवात केली. १९९८ साली दिल्ली येथे झालेल्या पशुप्रदर्शनात संपूर्ण देशात शरद पाटील यांच्या गायीचा पहिला क्रमांक आला. २००१ साली बंगलोर येथील पशुप्रदर्शनात पुन्हा प्रथम क्रमांक मिळाला व त्यानंतर २००६ साली लातूर येथील सिद्धेश्वर यात्रेत झालेल्या अखिल भारतीय पशुप्रदर्शनात पुन्हा अव्वल क्रमांक मिळाला. लालकंधारी गाय दोन वेळा मिळून १२ लिटर दूध देते.
केंद्रीय मंत्री शरद पवार २००६ साली कृषीमंत्री होते. शरद पाटील यांचे गोसंगोपनातील काम पाहून त्यांना सवरेत्कृष्ट पशुपालनाचा बाबू जगजीवनराम किसान पुरस्कार दिल्लीत देण्यात आला.
अखिल भारतीय स्तरावरील सर्व पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पाटलांनी गोसंगोपनाचे महत्त्व शेतकऱ्याच्या लक्षात यावे, गायीच्या सांभाळातून कुटुंबाचा खर्च निघू शकतो हा आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केले. पुसद येथील नारायण देवबा पांढरीपांडे (नॅडॅप काका) यांच्या गावी ते गेले. नारायण पांढरीपांडे हे एका हाताने अपंग होते. त्यांना देशी गायी पाळण्याचा छंद होता.
तीन गायींच्या संगोपनातून दरवर्षी २ लाख ४६ हजारांचे उत्पन्न मिळते असे ते सांगत व मिळालेल्या उत्पन्नावर १५ वर्षांपूर्वी कर भरणारे ते कदाचित देशातील एकमेव शेतकरी असावेत. त्यांच्याकडे राहून साबण, धूप, मंजन, कीटकनियंत्रक, गोबरगॅस, गांडूळ खत, गोमूत्रापासून फिनेल बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्या प्रशिक्षणानंतर नागपूर येथील देवळापारजवळील गोआधारित प्रशिक्षण केंद्रात पाटलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले व तेथून परतल्यानंतर संपूर्णपणे सेंद्रीय शेती करण्याचा निर्णय घेतला. आज पाटलांच्या घरी गोबरगॅस आहे. दहा गायी व एक वळू आहे. नॅडॅपआधारित केवळ दोन महिन्यांत तयार होणारी कंपोस्ट खताची निर्मिती होते. गोमूत्राचा अर्क, साबण, तूप अशी विविध उत्पादने घेतली जातात. पाटील यांच्या म्हणण्यानुसार गायीच्या संगोपनाच्या अर्थशास्त्रात वासरू व दूध याला दुय्यम महत्त्व आहे. प्रथम महत्त्व तिच्यापासून मिळणारे शेण व गोमूत्र याला आहे. एका गायीचे शेण व गोमूत्र वर्षभर साठवले तर त्यावर पाच एकर जमीन कसता येते. एका गायीचे फक्त सकाळी जरी गोमूत्र घेतले तरी ते तीन
लिटर मिळते. गोमूत्राच्या पाव लिटर अर्काची किंमत ६५ रुपये आहे. एक किलो तुपाला १८०० रुपये भाव मिळतो. कोल्हापुरातील कन्हेरी मठात तयार होणाऱ्या तुपास २ हजार रुपये भाव आहे. एका गायीपासून दररोज १० ते १२ लिटर दूध मिळते व दुधाचा भाव ७० रुपये लिटर आहे. एक गाय वर्षभरात एक टन शेणखत देते. त्याची सरासरी किंमत ३ हजार रुपये आहे. शेतातील फवारणीसाठी तयार होणाऱ्या शेण व गोमूत्रापासून बनणाऱ्या कीटकनाशकाची किंमत ५ हजार आहे.
एका वासराची किंमत २५ हजार रुपये आहे. १ लाख रुपये किमतीच्या लालकंधारी जातीच्या गायीपासून दरवर्षी शेतकऱ्याला किमान १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. या दुष्काळाच्या स्थितीतही शरद पाटील यांना ७ एकरमध्ये ५२ पोते खरीप हंगामातील ज्वारी व १२ क्विंटल तुरीचे उत्पादन झाले. कमी पाऊस झालेला असतानाही शेणखतामुळे जमिनीत पाणी मुरण्याची क्षमता वाढली व त्याचा लाभ पिकाला झाला असावा, असे पाटील यांचे म्हणणे आहे. रायगड जिल्ह्य़ातील मुरबाड येथील प्रद्युन्म आठले हा एमबीए झालेला तरुण अमेरिकेत नोकरी करत होता. घरी ८० गायींची गोशाळा होती. पाटील यांच्यामुळे सहा महिन्यांतच गायी न विकता गोशाळा चालवण्याचा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला.

‘घर तेथे गाय’ उपक्रम
गेल्या १५ वर्षांत पाटील यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मावलगावात २०० घरे आहेत. गावात ‘घर तेथे गाय’ असा उपक्रम त्यांनी राबवला व त्यांच्या गावात ३५० लालकंधारी जातीच्या गायी आहेत. गायीला लागणाऱ्या चाऱ्याचा गरवापर थांबावा यासाठी त्यांनी आपल्या गावात सामुदायिक कडबाकुट्टी घेतली असून त्याचा वापर संपूर्ण गाव करते. या वापरामुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक चाऱ्याची बचत होते. मराठवाडय़ातील शेतकऱ्यांसाठी पाटील यांच्या पुढाकाराने औरंगाबादजवळील पोटूळ या रेल्वे स्थानकाच्याजवळ सुधीर विध्वंस या शेतकऱ्याच्या शेतावर दर महिन्याला प्रशिक्षण दिले जाते. २६, २७ व २८ असे तीन दिवस हे प्रशिक्षण केंद्र सुरू असते व त्यात गायीचे शेण व गोमूत्रापासून घरच्या घरी बनवणाऱ्या उपपदार्थाची कृती शिकवली जाते.
प्रदीप नणंदकर – pradeepnanandkar@gmail.com

Story img Loader